|Friday, February 22, 2019
You are here: Home » क्रिडा » फेडरर, ज्योकोव्हिक, शरापोव्हा, केर्बर, हॅलेप विजयी

फेडरर, ज्योकोव्हिक, शरापोव्हा, केर्बर, हॅलेप विजयी 

कोन्टा, बुचार्ड, प्लिस्कोव्हा, वावरिंका, व्हेरेव्हही दुसऱया फेरीत, रेऑनिक, क्विटोव्हा स्पर्धेबाहेर

वृत्तसंस्था/ मेलबोर्न

विद्यमान विजेता रॉजर फेडरर, नोव्हॅक ज्योकोव्हिक, स्टॅन वावरिंका, मारिया शरापोव्हा, अँजेलिक केर्बर, सिमोना हॅलेप, जोहाना कोन्टा, युजीन बुचार्ड, कॅरोलिना प्लिस्कोव्हा यांनी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला. मिलोस रेऑनिक, पेत्र क्विटोव्हा यांचे आव्हान मात्र पहिल्याच फेरीत संपुष्टात आले.

फेडररने स्लोव्हेनियाच्या ऍलाझ बेडेनेवर पूर्ण वर्चस्व राखत 6-3, 6-4, 6-3 असा सहज विजय मिळवित विजयी सलामी दिली. गेल्या वषी ही स्पर्धा जिंकणाऱया फेडररने नंतर विम्बल्डन स्पर्धा जिंकून 19 वे ग्रँडस्लॅम अजिंक्मयपद मिळविले होते. ग्रँडस्लॅम स्टेजवर दीर्घ काळानंतर परतलेल्या सर्बियाच्या ज्योकोव्हिकने धडाकेबाज सुरुवात करीत अमेरिकेच्या डोनाल्ड यंगचा 6-1, 6-2, 6-4 असा फडशा पाडत दुसरी फेरी गाठली. गेल्या वर्षीच्या विम्बल्डन स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीनंतर त्यान् खेळलेला हा पहिलाच सामना होता. स्वित्झर्लंडच्या वावरिंकाने लिथुआनियाच्या रिकार्डस बेरान्किसवर 6-3, 6-4, 2-6, 7-6 (7-2) अशी मात केली. त्याच्या डाव्या गुडघ्यावर गेल्या वषी शस्त्रक्रिया झाली आहे. या सामन्यावेळी त्याला अजूनही वेदना होत असल्याचे त्याने सांगितले.

पुरुषांच्या अन्य सामन्यांत स्पेनच्या फर्नांडो व्हर्डास्कोने आपल्याच देशाच्या रॉबर्टो बॉटिस्टा ऍगटचा 6-1, 7-5, 7-5, चौथ्या मानांकित अलेक्झांडर व्हेरेव्हने  थॉमस फॅबिआनोचा 6-1, 7-6 (7-5), 7-5 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. याशिवाय मार्टिन डेल पोट्रो, गेल मोनफिल्स यांनीही दुसऱया फेरीत स्थान मिळविले आहे.

शरापोव्हा, हॅलेप, प्लिस्कोव्हा विजयी

महिला एकेरीत माजी विजेत्या मारिया शरापोव्हाने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विजयी पुनरागमन करताना जर्मनीच्या ताताना मारियाचा 6-1, 6-4 असा पराभव केला. शरापोव्हाने दहा वर्षांपूर्वी या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. जागतिक अग्रमानांकित रोमानियाच्या हॅलेपला दुसरी फेरी गाठण्यासाठी संघर्ष करावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या 17 वषीय डेस्टानी आयव्हाचा 7-6 (7-5), 6-1 असा पराभव केला. हॅलेपला सहापैकी चार वेळा या स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभूत होण्याची वेळ आली होती. तिची पुढील लढत स्पेनच्या युजीन बुचार्डशी होईल. जर्मनीच्या केर्बरने दुसरी फेरी गाठताना आपल्याच देशाच्या ऍना लेना फ्रीड्समनचा 6-0, 6-4 असा धुव्वा उडविला तर सहाव्या मानांकित प्लिस्कोव्हाने पराग्वेच्या व्हेरोनिका सेपेड रॉयगवर 6-3, 6-4 अशी मात केली. ब्रिटनच्या जोहाना कोन्टाने अमेरिकेच्या मॅडिसन बेन्गलचा 6-3, 6-1 असा पराभव केला. कॅनडाच्या बुचार्डने  टूरवरील सहा सामन्यांची पराभवाची मालिका खंडित करीत फ्रान्सच्या ओशीन डोडिनवर 6-3, 7-6 (7-5) अशी मात केली. ऑस्टेलियाच्या ऍश्ले बार्टीने बेलारुसच्या एरीना साबालेन्काचा पराभव करून दुसरी फेरी गाठली.

रेऑनिक, क्विटोव्हाला पराभवाचा धक्का

माजी अग्रमानांकित कॅनडाच्या मिलोस रेऑनिकला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. स्लोक्हाकियाच्या लुकास लॅकोने त्याचा 6-7 (5-7), 7-5, 6-4, 7-6 (7-4) असा पराभव केला. मागील तीन वर्षी रेऑनिकने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. महिलांमध्ये  दोनदा विम्बल्डन स्पर्धा जिंकलेल्या झेकच्या पेत्र क्विटोव्हाला पहिल्याच फेरीत स्पर्धेबाहेर पडावे लागले. तिला जर्मनीच्या आंदेया पेटकोव्हिकने 6-3, 4-6, 10-8 असे पराभूत केले.

Related posts: