|Thursday, November 15, 2018
You are here: Home » क्रिडा » भारताची उपांत्यपूर्व फेरीत धडक!

भारताची उपांत्यपूर्व फेरीत धडक! 

दुबळय़ा पापुआ न्यू गिनिया संघाचा 10 गडी राखून धुव्वा, अनुकूल रॉयचे 14 धावात 5 बळी

वृत्तसंस्था/ माऊंट मॉनगनुई

तीनवेळा चॅम्पियन्स ठरलेल्या भारताच्या युवा संघाने आयसीसी यू-19 विश्वचषकात दुबळय़ा पापुआ न्यू गिनियाचा तब्बल 10 गडी राखून अक्षरशः धुव्वा तर उडवलाच. शिवाय, या सलग दुसऱया विजयासह स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतही जोरदार धडक मारली. येथील लढतीत प्रारंभी अनुकूल रॉयने 14 धावांमध्येच निम्मा संघ गारद केल्यानंतर पीएनजीचा जेमतेम 64 धावांमध्ये धुव्वा उडाला. प्रत्युत्तरात भारताने 8 षटकातच एकही गडी न गमावता विजयी लक्ष्य गाठले. कर्णधार पृथ्वी शॉने 39 चेंडूत 12 चौकारांसह नाबाद 57 धावा झळकावत विजयात सिंहाचा वाटा उचलला तर सहकारी सलामीवीर मनजोत कालरा 9 चेंडूत 9 धावांवर नाबाद राहिला.

विजयासाठी अवघ्या 65 धावांचे किरकोळ आव्हान असताना पृथ्वी शॉने पुन्हा एकदा आक्रमक फलंदाजी करत पीएनजीच्या गोलंदाजांना अक्षरशः सैरभैर करुन टाकले. त्याने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली आणि प्रतिस्पर्धी गोलंदाजीच्या मर्यादा प्रकर्षाने स्पष्ट केल्या. यापूर्वी, संयुक्त अरब अमिरातमध्ये 2014 साली आपली शेवटची कनिष्ठ विश्वचषक स्पर्धा खेळणाऱया पीएनजीचा डाव येथे 21.5 षटकातच 64 धावात संपुष्टात आला. या विश्वचषक स्पर्धेतील ही सर्वात निचांकी धावसंख्याही ठरली.

पीएनजीतर्फे ओव्हिया सॅम (15), सलामीवीर सिमॉन अटाई (13) व सिनाका अरुआ (12) या तिघांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. पीएनजीचा संघ सामोआ येथे संपन्न झालेल्या ईस्ट आशिया पॅसिफिक पात्रता फेरीत अपराजित राहत विश्वचषकासाठी आठव्यांदा पात्र ठरला होता. पण, पहिल्याच लढतीत बलाढय़ भारताकडून त्यांचा चांगलाच फडशा पाडला.

या स्पर्धेत यापूर्वी सलामीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाचा 100 धावांनी धुव्वा उडवल्यानंतर तोच फॉर्म भारताने साहजिकच पीएनजीविरुद्ध देखील कायम राखला. शॉने अवघ्या 39 चेंडूतच 57 धावांची आतषबाजी केल्यानंतर भारताचा एकतर्फी विजय ही निव्वळ औपचारिकता होती.

तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकल्यानंतर पीएनजीला प्रथम फलंदाजीला पाचारण केले आणि फिरकीपटू अनुकूल रॉयने हा निर्णय चांगलाच सार्थ ठरवला. त्याने 6.5 षटकात 2 षटके निर्धाव टाकली व 14 धावात पीएनजीचा निम्मा संघ तंबूत धाडला. याशिवाय, जलद गोलंदाज शिवम मावीने 2 तर कमलेश नागरकोटी व अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

पीएनजीच्या 5 फलंदाजांचे ‘भोपळे’

प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर पीएनजीचा एकही फलंदाज समर्थपणे उभा ठाकू शकला नाही. त्यांचे थोडेथोडके नव्हे तर 4 फलंदाज शून्यावर बाद झाले तर एक फलंदाज शून्यावरच नाबाद राहिला. उर्वरित फलंदाजांपैकी केवळ तिघांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली व ते तिघेही अगदी 20 धावांचा टप्पाही गाठू शकले नाहीत.

डावातील तिसऱया षटकात शिवमने महुरुला पायचीत केले व इथून पीएनजीची पडझड सुरु झाली. नंतर त्याने हेगी टोआला शून्यावर बाद केले तर नागरकोटीने अटाईला पुढील चेंडूवरच धावचीत केल्यानंतर पीएनजीची 7 षटकात 3 बाद 27 अशी स्थिती झाली. कर्णधार व्हॅगी काराहो अर्शदीपच्या गोलंदाजीवर यष्टीमागे जोयलकडे झेल देत तंबूत परतला. अरुआला रॉयने त्रिफळाचीत केले, त्यावेळी पीएनजीचे निम्मे खेळाडू 15.2 षटकात 61 धावात तंबूत परतले होते.

सॅम पुढे रॉयचे सावज ठरला तर नागरकोटीने लेके मोरियाला तंबूचा रस्ता दाखवल्यानंतर पीएनजीची 7 बाद 62 अशी स्थिती झाली. रॉयने नंतर जेम्स ताऊ (0), केवायू ताऊ (2) व सेमो कामिया (0) या तळाच्या फलंदाजांना तंबूत धाडल्यानंतर पीएनजीचा संघ सर्वबाद 64 धावांवर संपुष्टात आला होता.

प्रत्युत्तरात पृथ्वी शॉच्या आक्रमणाचा धडाकाच इतका होता की, नाबाद 57 धावांच्या खेळीतील 48 धावा त्याने केवळ चौकाराच्या माध्यमातूनच वसूल केले होते. शॉचे हे या स्पर्धेतील सलग दुसरे अर्धशतकही ठरले.

संक्षिप्त धावफलक

पीएनजाr : 21.5 षटकात सर्वबाद 64 (सिमॉन अटाई 13, ओव्हिया सॅम 15, सिनाका अरुआ 12. अवांतर 12. अनुकूल रॉय 6.5 षटकात 14 धावात 5 बळी, शिवम मावी 2/16, नागरकोटी, अर्शदीप सिंग प्रत्येकी 1 बळी).

भारत : 8 षटकात 0/67 (पृथ्वी शॉ 39 चेंडूत 12 चौकारांसह नाबाद 57, मनजोत कलरा 9 चेंडूत एका चौकारासह नाबाद 9. अवांतर 1. कमिया 0/27, ताऊ 0/28, मोरिया 0/11).

ब्लर्ब

भारताची पुढील लढत शुक्रवार दि. 19 रोजी झिम्बाब्वेविरुद्ध होईल.

 

Related posts: