|Friday, February 22, 2019
You are here: Home » क्रिडा » आव्हान 287 धावांचे, भारत 3 बाद 35

आव्हान 287 धावांचे, भारत 3 बाद 35 

सेंच्युरियन कसोटी, चौथा दिवस : आफ्रिकेतर्फे डिव्हिलियर्सची 80 धावांची खेळी, शमीचे 4 बळी

सेंच्युरियन/ वृत्तसंस्था

कसोटी मालिकेत यापूर्वीच पिछाडीवर असलेल्या विराटसेनेसमोर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियन कसोटीत पुन्हा एकदा नामुष्कीजनक पराभवाचे संकट आ वासून उभे राहिले आहे. विजयासाठी चौथ्या डावात 287 धावांचे आव्हान असताना भारताची मंगळवारी चौथ्या दिवसअखेर 3 बाद 35 अशी दाणादाण उडाली असून चेतेश्वर पुजारा 11 तर पार्थिव पटेल 5 धावांवर खेळत होते.

दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव येथे 258 धावात संपुष्टात आला. मात्र, त्यानंतर 287 धावांच्या आव्हानाला सामोरे जाताना भारताला प्रारंभीच जोरदार झटके सोसावे लागले. मुरली विजय (9) रबाडाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला तर केएल राहुलने (4) एन्गिडीच्या गोलंदाजीवर महाराजकडे झेल दिला. कर्णधार विराट 20 चेंडूत 5 धावांवरच पायचीत झाला त्यावेळी तर भारताच्या संकटात आणखी भर पडली. या कसोटी सामन्यात आता 7 गडी बाकी असताना भारताला विजयासाठी आणखी 252 धावांची गरज आहे.

डिव्हिलियर्सचा झंझावात

प्रारंभी, दक्षिण आफ्रिकेने 2 बाद 90 धावांवरुन डावाला पुढे सुरुवात केल्यानंतर 91.3 षटकात सर्वबाद 258 धावांपर्यंत मजल मारली. एबी डिव्हिलियर्सने 121 चेंडूंना सामोरे जात 10 चौकारांसह सर्वाधिक 80 धावांचे योगदान दिले. शिवाय, 61 धावा करणाऱया एल्गारसमवेत तिसऱया गडय़ासाठी त्याने  141 धावांची दणकेबाज भागीदारी साकारली. एल्गारने 121 चेंडूत 8 चौकार, एक षटकार मारला.

शमीचा भेदक स्पेल

शमीचा भेदक स्पेल दिवसभरातील ठळक वैशिष्टय़ ठरले. त्याने डावातील 42 व्या षटकात अपेक्षेपेक्षा अधिक उसळलेल्या चेंडूवर एबीडीला यष्टीमागे झेल देणे भाग पाडले तर एल्गारला देखील अशाच चेंडूवर डीप स्क्वेअरलेगवरील केएल राहुलकडे झेल देत परतावे लागले. केएल राहुलचा अंदाज येथे चुकला होता. पण, दुसऱया प्रयत्नात त्याने झेल पूर्ण केला. पार्थिव पटेलचे यष्टीमागे अनेक अंदाज चुकले व एकदा त्याने प्लेसिसला जीवदानही दिले. प्लेसिस यावेळी 6 धावांवर खेळत होता. अर्थात, आफ्रिकेला एकेवळ 39 चेंडूंच्या अंतरात 19 धावात 3 फलंदाज गमवावे लागले व इथून त्यांच्या घसरगुंडीला सुरुवात झाली.

तसे पाहता, डी कॉक (12), फिलँडर (26), केशव महाराज (6), रबाडा (4) व एन्गिडी (1) यांना फारशी चमक दाखवता आली नाही. पण, एबी डिव्हिलियर्स व एल्गार यांच्या शतकी भागीदारीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेला सर्वबाद 258 धावांपर्यंत पोहोचता आले व यामुळे भारतासमोर 287 धावांचे लक्ष्य असेल, हे स्पष्ट झाले. गोलंदाजीच्या आघाडीवर भारतातर्फे शमीने सर्वात भेदक मारा साकारताना 16 षटकात 49 धावात 4 बळी घेतले तर बुमराहने 70 धावात 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. याशिवाय, इशांतने 40 धावात 2 व अश्विनने 78 धावात 1 बळी घेतले. अर्थात, अश्विनला आपल्या एकमेव बळीसाठी अगदी शेवटच्या फलंदाजापर्यंत प्रतीक्षा करावी लागली. त्याने एन्गिडीला मुरली विजयकरवी झेलबाद केले होते.

धावफलक

दक्षिण आफ्रिका पहिला डाव : सर्वबाद 335.

भारत पहिला डाव : सर्वबाद 307.

दक्षिण आफ्रिका दुसरा डाव : (2 बाद 90 वरुन पुढे) एडन मॅरक्रम पायचीत गो. बुमराह 1 (8 चेंडू), डीन एल्गार झे. राहुल, गो. शमी 61 (121 चेंडूत 8 चौकार, 1 षटकार), हाशिम आमला पायचीत गो. बुमराह 1 (10 चेंडू), एबी डिव्हिलियर्स झे. पटेल, गो. शमी 80 (121 चेंडूत 10 चौकार), फॅफ डय़ू प्लेसिस झे. व गो. बुमराह 48 (141 चेंडूत 4 चौकार), डी कॉक झे. पार्थिव, गो. शमी 12 (5 चेंडूत 3 चौकार), फिलँडर झे. विजय, गो. इशांत 26 (85 चेंडूत 3 चौकार), केशव महाराज झे. पटेल, गो. इशांत 6 (8 चेंडूत 1 चौकार), रबाडा झे. कोहली, गो. शमी 4 (29 चेंडूत 1 चौकार), मॉर्कल नाबाद 10 (11 चेंडूत 2 चौकार), एन्गिडी झे. विजय, गो. अश्विन 1 (10 चेंडू). अवांतर 8. एकूण 91.3 षटकात सर्वबाद 258.

गडी बाद होण्याचा क्रम

1-1 (मॅरक्रम), 2-3 (आमला, 5.3), 3-144 (डिव्हिलियर्स, 41.1), 4-151 (एल्गार, 45.5), 5-163 (कॉक, 47.4), 6-209 (फिलँडर, 73.4), 7-215 (महाराज, 75.6), 8-245 (रबाडा, 87.2), 9-245 (प्लेसिस, 88.4), 10-258 (एन्गिडी, 91.3).

गोलंदाजी

अश्विन 29.3-6-78-1, बुमराह 20-3-70-3, इशांत शर्मा 17-3-40-2, शमी 16-3-49-4, हार्दिक पंडय़ा 9-1-14-0.

भारत दुसरा डाव : मुरली विजय त्रि. गो. रबाडा 9 (25 चेंडूत 1 चौकार), केएल राहुल झे. महाराज, गो. एन्गिडी 4 (29 चेंडू), चेतेश्वर पुजारा खेळत आहे 11 (40 चेंडूत 1 चौकार), विराट कोहली पायचीत गो. एन्गिडी 5 (20 चेंडूत 1 चौकार), पार्थिव पटेल खेळत आहे 5 (24 चेंडू). अवांतर 1. एकूण 23 षटकात 3 बाद 35.

गडी बाद होण्याचा क्रम

1-11 (मुरली विजय, 7.5), 2-16 (केएल राहुल, 11.1), 3-26 (विराट, 15.6)

गोलंदाजी

फिलँडर 6ö3-6-0, रबाडा 5-2-9-1, एन्गिडी 6-2-14-2, मॉर्कल 5-3-4-0, केशव महाराज 1-0-1-0.

बॉक्स

दुखापतीमुळे साहा बाहेर, दिनेश कार्तिकला संधी

भारतीय यष्टीरक्षक वृद्धिमान साहा दुखापतीमुळे तिसऱया व शेवटच्या कसोटी सामन्यातून बाहेर फेकला गेला असून दिनेश कार्तिकला त्याच्या जागी तातडीने पाचारण केले गेले आहे. साहाचा सध्या सुरु असलेल्या दुसऱया कसोटी सामन्यात समावेश नाही. त्याला दि. 11 रोजी सराव सत्रादरम्यान धोंडशिरेची दुखापत झाली होती. बीसीसीआयचे हंगामी सचिव अमिताभ चौधरी यांनी एका पत्रकाद्वारे सदर बदलाची माहिती दिली. या मालिकेतील तिसरी व शेवटची कसोटी दि. 24 जानेवारीपासून खेळवली जाणार आहे.

32 वर्षीय कार्तिकने 23 कसोटी सामने खेळले. पण, यापूर्वी शेवटची कसोटी त्याने 2010 साली बांगलादेशविरुद्ध खेळली आहे. सध्या त्याच्या खात्यावर 51 झेल व 5 यष्टीचीतचे बळी आहेत. दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर फेकल्या गेलेल्या साहाच्या खात्यावर 32 सामन्यात 75 झेल व 10 यष्टीचीत असे 85 बळी आहेत.

पंचांशी गैरवर्तणूक, विराटला 25 टक्के मानधन कपातीचा दंड

येथील कसोटी सामन्यात सोमवारी तिसऱया दिवसाच्या खेळात मैदानी पंच मायकल गॉफ यांच्याशी गैरवर्तणूक केल्याबद्दल विराट कोहलीला 25 टक्के मानधन कपातीचा दंड ठोठावला गेला. पावसाचा व्यत्यय येऊन गेल्यानंतर पुन्हा खेळ सुरु झाल्यानंतर चेंडू ओलसर खेळपट्टीमुळे खराब होत असल्याची तक्रार विराटने पंचांकडे सातत्याने केली होती. त्या पार्श्वभूमीवर आयसीसी रेफ्री पॅनेलने ही कारवाई जाहीर केली. मैदानी पंच डेव्हिड गॉफ, पॉल रायफेल, तिसरे पंच रिचर्ड केटलबर्ग व चौथे पंच अलाहुद्दीन पालेकर यांनी रेफ्री पॅनेलकडे याबाबत रितसर तक्रार दाखल केली होती.

Related posts: