|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » जोधपूर एक्सप्रेसमध्ये गुंगीचे औषध देऊन तिघांना लुटले

जोधपूर एक्सप्रेसमध्ये गुंगीचे औषध देऊन तिघांना लुटले 

प्रतिनिधी/ मिरज

बेंगलोर-जाधपूर एक्सप्रेसमध्ये बेंगलोरच्या व्यापारी दाम्पत्यासह अन्य एका प्रवाशाची शितपेयातून गुंगीचे औषध देऊन चोरटय़ांनी सुमारे दीड लाख रुपयांची  लुबाडणूक केली. सदर तिघांना अत्यवस्थ अवस्थेत मिरज रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. एकाची प्रकृती गंभीर आहे.

बेंगलोर येथील गंगाबाई राजपुरोहित (वय 50) आणि त्यांचा पती भवरलाल राजपुरोहित (वय 55) हे दोघे सोमवारी रात्री दहा वाजता बेंगलोर रेल्वे स्टेशनवर जोधपूरकडे जाण्यासाठी बेंगलोर-जाधपूर एक्सप्रेसमध्ये बसले. त्यांच्याबरोबर प्रभुराम रायाजी (वय 26) हा त्यांच्या ओळखीचाच एक व्यक्ती होता. सदर तिघेही एस-9 आरक्षित बोगीतून आसन क्रमांक एक, दोन आणि आठ वरून प्रवास करीत होते. रात्री गाडी दावणगिरी स्टेशनच्या अगोदर बिरुर जंक्शनवर आली असता, तेथे असणाऱया एका तरुण इसमाने त्यांच्याशी गप्पा मारत ओळख वाढविली. सदर इसम 30 ते 35 वयोगटातला होता. तो पुरोहित यांच्याशी गुजराती भाषेत बोलत होता. काही काळाने त्याने त्याच्याकडे असणाऱया ‘माझा’ हे शितपेय तिघांना प्यावयास दिले. काही काळाने या तिघांना गुंगी आली. हे तिघेजण बेशुध्दावस्थेत पडले. याचा फायदा घेत सदर तरुणाने त्यांच्याकडे असणारी बॅग लांबविली. सकाळी प्रवाशी जागे झाल्यावर त्यांना हे तिघे बेशुध्दावस्थेत पडल्याचे दिसून आले. संबंधीत प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाशी याबाबत संपर्क साधला. दुपारी पावणे एकच्या सुमारास रेल्वे गाडी मिरज जंक्शनवर आली असता, रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी , कर्मचारी व रेल्वे पोलिसांनी सदर बोगीत जावून तिघांना ऍम्ब्यूलन्सद्वारे शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यापैकी प्रभूराम रायाजी यांची प्रकृती गंभीर आहे. प्राथमिक चौकशीत राजपुरोहित हे व्यापाराच्या काही कामानिमित्त राजस्थानकडे निघाले होते. त्यासाठी त्यांनी बॅगेमध्ये मोठी रक्कम ठेवली होती. ही बॅगच चोरटय़ांनी गुंगीचे औषध देऊन पळविली आहे. या बॅगेत सुमारे दीड लाखांचा ऐवज असावा, अशी प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी मिरज रेल्वे पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Related posts: