|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » बापू बिरु वाटेगांवकर यांचे वृद्धपकाळाने निधन

बापू बिरु वाटेगांवकर यांचे वृद्धपकाळाने निधन 

गुन्हेगारी, अध्यात्मातील वादळ शमले : इस्लामपुरातील हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास

प्रतिनिधी/ इस्लामपूर/बोरगांव

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले व कारागृहातून मुक्तता झाल्यानंतर आपला वृध्दापकाळ अध्यात्मिक क्षेत्रात व्यथित करीत असतानाच वाळवा तालुक्यातील बोरगावचे बापू बिरु वाटेगावकर (95) यांचे मंगळवारी दुपारी येथील खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले. ते सहकाऱयांत आप्पा महाराज म्हणून परिचत होते. त्यांच्या रुपाने वाळवा तालुक्यातील एक वादळ शमले. बुधवारी बापू बिरु यांच्यावर बोरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गेल्या 60 ते 70 दशका पासून बापू बिरु वाटेगावकर म्हटले की, संपूर्ण सांगली जिल्हा किंबहुना पश्चिम महाराष्ट्रात धडकी भरत असे. गावातील एका टग्याचा अन्याय-अत्याचार वाढला होता. महिलांना त्रास देत होता. त्याच प्रमाणे उभे पीक कापून नेत होता. त्याला कुणी रोखायचे हा प्रश्न उपस्थित झाला. यावेळी दणकट व पैलवान असणाऱया बापू बिरु वाटेगावकर यांचे नाव पुढे आले. बापू बिरुनीही त्या टग्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो अधिकच चवताळला. सन 1964 च्या सप्टेंबर महिन्यात धनगरी ओव्यांचा कार्यक्रम सुरु असतानाच त्या टग्याने बापूवर चाल केली. बापू बिरु वाटेगावकर हे त्याला संपवून बाहेर पडले.  तेंव्हापासून घोंघावत राहीलेले बापू बिरु नावाचे वादळ मंगळवारी वृद्धपकाळाने शांत झाले.

फरारी काळ व पलायन नाटय़ गाजले

 खून करुन बाहेर पडलेले बापू बिरु हे अनेक गुह्यांच्या केंद्रस्थानी राहिले. त्यांच्या विरुद्ध इस्लामपूरसह विविध पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद झाले. गुह्यांबरोबरच त्यांचा फरारी काळ अधिक गाजला. गुन्हेगारी क्षेत्रात असूनही निर्व्यसनी व चारित्र्य जपलेल्या बापू बिरु वाटेगावकर यांना बोरगाव व परिसराने फरारी काळात जपले. या फरारी काळातच बापू बिरु तथा आप्पा यांनी हुंडय़ाच्या बळी ठरणाऱया व नवऱया पासून पिचलेल्या अनेक मुली व महिलांना न्याय मिळवून दिला असल्याचे बोरगाव परिसरात सांगण्यात येते. त्यामुळे ते अनेक वर्षे पोलीसांच्या हाती लागले नव्हते. इस्लामपूर उपविभागात व पोलीस ठाण्यात येणाऱया प्रत्येक अधिकाऱयापुढे बापू बिरु नावाचे वादळ हेच मोठे आव्हान असायचे. अखेर तत्कालीन पोलीस निरीक्षक व निवृत्त पोलीस उपाधिक्षक मदन पाटील यांनी हे वादळ जेरबंद केले. जुनेखेडच्या शिवारात ते पोलीसांच्या हाती लागले. पोलीसांच्या तावडीत असूनही हे वादळ शांत होत नव्हते. त्यांच्या सहकाऱयांनी बापू बिरुंना पोलीसांच्या ताब्यातून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. त्यांचे हे पलायन नाटय़ ही संपूर्ण महाराष्ट्रात गाजले.

कुटुंबाला अखेर पर्यंत गुन्हेगारीचे चटके

पोलीसांनी पुन्हा जेरबंद केल्यानंतर बापू बिरु वाटेगावकर यांना एका गुह्यात जन्मठेपेची शिक्षा झाली. ही शिक्षा भोगून काही वर्षापुर्वी ते मुक्त झाले. बापू बिरु हे मुळगावी बोरगावलाच राहात होते. जेलमुक्ती नंतर त्यांनी आपला वृध्दापकाळ अध्यात्मात व्यथित करण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही महिन्यांपर्यत ते सांगली जिह्यासह बाहेरील जिल्हात ही व्याख्यानासाठी जात होते. बापू बिरु हे शाकाहारी होते. तसेच त्यांनी पैलवानकी केल्याने शरीरही मजबूत होते. गुन्हेगारीत असून ही ते विठ्ठल भक्त राहीले. त्यांच्या गळयात सुरुवाती पासून पांडूरंगाची माळ होती.  अखेर पर्यंत त्यांची प्रकृती काटक होती. अलिकडील काही वर्षात मुलगा शिवाजी व सुनेवरील प्राणघातक हल्लाही त्यांना पहावा लागला. तसेच गटबाजीतून मुलगा शिवाजी यांच्या मेहूण्याचा खून पहावा लागला. अखेर पर्यंत वाटेगांवकर यांच्या कुटुंबाला गुन्हेगारीचे चटके सोसावे लागले. त्यांची दुसरी व तिसरी पिढीही गुन्हेगारीतच गुरफटून राहीली. मात्र बापू बिरु हे शेवट पर्यंत आपली प्रकृती राखून होते.

वर्षभरापासून गुडघेदुखी

गेल्या काही वर्षांपासून बापू बिरु वाटेगांवकर यांना गुडघेदुखीचा त्रास सुरु झाला होता. जुलै 2017 मध्ये त्यांच्यावर मावळातील सोमटणे फाटा इथल्या पवना हॉस्पिटलमधे सांधे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. इतके वय झाले असताना  शस्त्रक्रिया केली जात नाही. मात्र त्यांच्या काटक पणामुळे ते शक्य झाले. गेल्या आठवडाभरापासून बापू बिरु वाटेगावकर यांची प्रकृती अत्यवस्थ बनली होती.  त्यांच्यावर इस्लामपुरातील आधार हॉस्पीटल मध्ये उपचार सुरु होते. उपचारा दरम्यान मंगळवारी त्यांचे निधन झाले. त्यांचा मृत देह येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागरात ठेवण्यात आला असून बुधवारी सकाळी त्यांच्यावर बोरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा शिवाजी, सून, नातवंडे असा परिवार आहे. 

चित्रपट वगनाटय़े

बापू बिरु वाटेगांवकर हे जन्मठेपेची शिक्षा भोगून आल्या नंतर त्यांच्याकडे चित्रपट, लोकनाटय़, शाहीरी क्षेत्रातील लोकांचे लक्ष वेधले. त्यांच्या जीवनावर ‘बापू बिरु वाटेगांवकर’ हा चित्रपट प्रदर्शीत झाला. त्यांची भूमिका प्रसिद्ध कलावंत मिलींद गुणाजी यांनी केली. तसेच त्यांच्या जीवनचरित्रावर अनेक पोवाडे, वगनाटय़े  बनले आहेत. तमाशा सम्राज्ञी मंगला बनसोडे यांचे ‘कृष्णाकाठचा फरारी’ हे वगनाटय़, तर शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांनी रचलेला आणि गायलेला पोवाडा गाजला. करारी व भेदक नजर कल्लेदार मिशा, डोईवर पटका, अंगात बाराबंदी, खांद्यावर घोंगडे, कपाळी भंडारा, कमरेला धोतर, पायात जाडजुड वहाणा, असे त्यांचे व्यक्तिमत्व होते.

गुन्हेगारीवर ओझरता दृष्टीक्षेप

  • खूनांसह अनेक गुन्हय़ात समावेश.
  • बऱयाशा गुन्हय़ातून निर्दोष मुक्तता.
  • सन 1989 ला पहिल्यांदा अटक.
  • सन 1993 ला पलायनाचा प्रयत्न व पुन्हा अटक.
  • जन्मठेपेची शिक्षा.
  • सन 2002 ला कारागृहातून मुक्तता.
  • वृद्धपकाळात भजन, किर्तन, प्रवचन यामध्ये रममाण.

Related posts: