|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » विटय़ात विषय समिती सभापती निवडी बिनविरोध

विटय़ात विषय समिती सभापती निवडी बिनविरोध 

प्रतिनिधी/ विटा

येथील नगरपालिकेच्या विषय समिती आणि सभापती निवडी बिनविरोध झाल्या. बांधकाम समिती सभापतीपदी नेहा किशोर डोंबे यांची तर पाणी पुरवठा सभापती म्हणून अरूण गायकवाड यांची वर्णी लागली. शिक्षण समिती सभापती म्हणून वंदना शिंदे तर आरोग्य समिती सभापती पदावर फिरोज तांबोळी आणि महिला बालकल्याण समितीवर सानिका दिवटे यांची निवड झाली. पिठासीन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी काम पाहिले. निवडीनंतर माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या उपस्थितीत नुतन पदाधिकाऱयांचा सत्कार करण्यात आला.

येथील नगरपालिका विषय समिती निवडी मंगळवारी पार पडल्या. नगरपालिकेवर माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसची सत्ता आहे. विषय समितीवर देखिल काँग्रेसचे वर्चस्व राहिले. अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱया स्थायी समितीत नगराध्यक्ष हे पदसिद्ध सभापती असतात. उपनगराध्यक्ष आणि सर्व सभापती पदसिद्ध सदस्य असतात. समितीत निवडायच्या तीन नगरसेवकांमध्ये वैभव पाटील, संजय तारळेकर आणि सुभाष भिंगारदेवे यांची वर्णी लागली.

बांधकाम समिती सभापतीपदी नेहा किशोर डोंबे यांची वर्णी लागली आहे. या समितीत किरण तारळेकर, ऍड. विजय जाधव, अजित गायकवाड, दहावीर शितोळे आणि मनिषा शितोळे यांचा समावेश आहे. शिक्षण, क्रिडा सांस्कृतिक कार्य समितीच्या सभापतीपदी वंदना शिंदे यांची निवड झाली. या समितीत अजित गायकवाड, मालती कांबळे, वैशाली सुतार, आशा पाटील, रूपाली पाटील यांची निवड झाली आहे.

स्वच्छता आणि आरोग्य समितीवर सभापती म्हणून फिरोज तांबोळी यांना संधी मिळाली आहे. या समितीवर विजय जाधव, किरण तारळेकर, मिनाक्षी पाटील, रूपाली पाटील आणि सुभाष भिंगारदेवे यांची निवड झाली आहे. तर पाणी पुरवठा समितीच्या सभापती पदी अरूण गायकवाड यांची निवड झाली. या समितीत दहावीर शितोळे, सारिका सपकाळ, मिनाक्षी पाटील, प्रगती कांबळे आणि मनिषा शितोळे यांना संधी मिळाली आहे.

नियोजन समितीवर उपनगराध्यक्ष पदसिद्ध सभापती असतात. त्यामुळे प्रतिभा चोथे या समितीच्या सभापती असतील. या समितीवर किरण तारळेकर, प्रगती कांबळे, सारिका सपकाळ, दहावीर शितोळे आणि संजय तारळेकर यांची वर्णी लागली आहे. तर महिला व बालकल्याण समिती सभापती म्हणून सानिका दिवटे तर उपसभापती म्हणून प्रगती कांबळे यांना संधी मिळाली. या समितीवर आशा पाटील, सारिका सपकाळ, वैशाली सुतार आणि मालती कांबळे यांची निवड झाली आहे.

निवडीनंतर नुतन सभापतींचा सत्कार प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, उपनगराध्यक्षा प्रतिभा चोथे, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, ज्येष्ठ नगरसेवक किरण तारळेकर, किशोर डोंबे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

समितीच्या चाव्या महिला नगरसेविकांकडे

विटय़ाच्या नगराध्यक्षपदी प्रतिभा पाटील, उपनगराध्यक्षपदी प्रतिभा चोथे कार्यरत आहेत. आता सभापतीपदी नेहा डोंबे, वंदना शिंदे आणि सानिका दिवटे तर उपसभापतीपदी प्रगती कांबळे यांची निवड झाली आहे. यामुळे पालिकेच्या बहुतांश विषय समित्यांची सुत्रे महिला नगरसेविकांच्या हातात गेली आहेत.

Related posts: