|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » केरीत शनिवारपासून 13 शेकोटी संमेलन

केरीत शनिवारपासून 13 शेकोटी संमेलन 

सांस्कृतिक प्रतिनिधी/ फोंडा

कोकण मराठी परिषद गोवाचे 13 वे वार्षिक शेकोटी साहित्य संमेलन केरी फोंडा येथील श्री विजयादुर्गा देवस्थानच्या प्रांगणात शनिवार 20 व रविवार 21 जाने. रोजी आयोजित करण्यात आले आहे. दोन दिवसांच्या या संमेलनात काव्य मैफल, परिसंवाद व साहित्य विषयक इतर विविध भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.

परिषदेच्या सल्लागार मंडळाचे अध्यक्ष ऍड. रमाकांत खलप यांनी फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत संमेलनाचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला. यावेळी परिषदेचे अध्यक्ष सागर जावडेकर, कार्यवाहक चित्रा क्षीरसागर, कोषाध्यक्ष अजित नार्वेकर व मंगेश काळे हे उपस्थित होते.

वाङमयीन अभिरुचीवर परिसंवाद

यंदा प्रथमच शेकोटी संमेलन फोंडा परिसरात होत आहे. शनिवार 20 रोजी सायं. 4.30 वा. साहित्य दिंडीने संमेलनाला सुरुवात होईल. सायं. 5 ते 6.30 वा. यावेळेत ‘बदलत्या काळातील वाङमयीन अभिरुची’ या विषयावर परिसंवाद होईल. प्रा. शोभा नाईक (बेळगाव) यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱया या परिसंवादात डॉ. सोमनाथ कोमरपंत, प्रा. संजय भास्कर जोशी, विलास कुवळेकर व प्रा. कृष्णाजी कुलकर्णी यांचा सहभाग असेल.

सायं. 6.30 वा. सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष प्रा. संजय भास्कर जोशी (पुणे), तर प्रमुख पाहुणे म्हणून विजयादुर्गा संस्थानचे अध्यक्ष अरुण देसाई हे उपस्थित असतील. सल्लागार अध्यक्ष ऍड. रमाकांत खलप, अध्यक्ष सागर जावडेकर, कार्यकारी अध्यक्ष प्रा. नारायण महाले यांची उपस्थिती असेल.

तीन पुस्तकांचे प्रकाशन

गुरुदास नाटेकर यांच्या ‘दैव किती अविचारी’, ‘कवितेच्या गावा’ आणि ‘विचारनामा’ या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. प्रा. अनिल सामंत या पुस्तकावर भाष्य करतील.  रात्री 8 वा. सहभोजन व त्यानंतर 9.30 वा. ‘रणमाले’ हा सत्तरी तालुक्यातील लोककलेचा कार्यक्रम होणार आहे.

चाफा कविसंमेलन

रविवार 21 रोजी सकाळी 6.30 ते 8.30 वा. यावेळेत ‘चाफा’ कविता संमेलन होणार आहे. ज्येष्ठ कवी दादा मडकईकर यांच्या अध्यक्षतेखाली हे कवी संमेलन होईल. सकाळी 8.30 वा. न्याहारी व त्यानंतर 9.30 ते 11.30 वा. यावेळेत ‘मिळून साऱयाजणी’ या विषयावर महिलांसाठी सत्र होईल. त्यात प्रा. पौर्णिमा केरकर, सोनाली सावळ देसाई, प्रज्वलीता गाडगीळ, अपूर्वा ग्रामोपाध्ये, जागृती पाटकर, विद्या शिकेरकर, दीपा मिरिंगकर, मेघना कुरुंदवाडकर व अपूर्वा कर्पे यांचा सहभाग असेल. चित्रा क्षीरसागर या संवादिका म्हणून काम पाहतील.

‘गजर मराठीचा सोडू नये’

त्यानंतर 11.30 ते दुपारी 1.30 वा. यावेळेत ‘गजर मराठीचा सोडू नये’ या विषयावर परिसंवाद होईल. प्रा. कृष्णाजी कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱया या परिसंवादात मच्छिंद्र च्यारी, रमेश वंसकर, लीना पेडणेकर, गो. रा. ढवळीकर, नारायण महाले, महेश नागवेकर व मोहन वेरेकर यांचा सहभाग असेल. दुपारी 1.30 वा. भोजन, दुपारच्या सत्रात 2.30 ते 3 वा. यावेळेत आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा होईल. यावेळी अर्जुन जयराम परब व रेखा उपाध्ये या शिक्षकांना प्रा. संजय जोशी यांच्याहस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल. दुपारी 3 वा. समारोप सोहळा व त्यानंतर 4.30 ते 5.30 वा. यावेळेत निमंत्रित कवींचे कवी संमेलन होणार आहे. परभणी महाराष्ट्र येथील गझलकार डॉ. अविनाश कासंडे यांच्या अध्यक्षतेखाली हे कवी संमेलन होणार आहे. या संमेलनात गोव्यातील साधारण पन्नास नामवंत कविंचा सहभाग असेल.

शेकोटी संमेलन निवासी स्वरुपाचे असल्याने ज्या साहित्यप्रेमींना निवास व्यवस्था हवी असल्यास त्यांनी चित्रा क्षीरसागर किंवा अजित नार्वेकर 7588453536 यांच्याशी संपर्क साधावा. संमेलनस्थळी जाण्यासाठी पाटो कॉलनी पणजी येथून दुपारी 2.30 वा. बसची व्यवस्था करण्यात आली आहे. बाणस्तारी माशेलमार्गे ही बस केरी येथील संमेलनस्थळी निघणार आहे.

Related posts: