|Thursday, May 24, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मसाल्यांनी जेवणाची चवच खूप न्यारी!

मसाल्यांनी जेवणाची चवच खूप न्यारी! 

ऑस्ट्रेलियातील विद्यार्थ्यांचा निवजेत अभ्यास दौरा

स्थानिक खाद्यसंस्कृतीने घातली भुरळ

फास्ट फूडपेक्षा इथले खाद्यपदार्थ पचनासही हलके!

हरिश्चंद्र पालव / माणगाव:

कोकणातील जेवण काटय़ाचमच्याने जेवण्यापेक्षा हाताने जेवतानाचा आनंद वेगळाच आहे. इथले जेवणातील खाद्यपदार्थ आरोग्याला ‘हेल्दी’ असल्याची जाणीव होते. इथले चिकन, माशांचे तिकले, फ्राय केलेले मासे चविष्ट आणि स्वादिष्ट लागतात. अशाप्रकारे मांसाहारी पदार्थ ऑस्ट्रेलियात मिळत नाहीत. या चवीमुळे इथल्या खाद्यसंस्कृतीचे वेगळेपण वाटते. उलट ऑस्ट्रेलिया देश इंग्रजांनी वसविला आहे. जगातील सर्व प्रकारचे लोक या देशात आहेत. इंग्रजांच्या संस्कृतीत या देशाचा जन्म झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची वेगळी अशी खाद्यसंस्कृती देशाच्या कुठल्याच भागात पाहायला मिळत नाही, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाहून कुडाळ तालुक्यातील निवजे येथे अभ्यास दौऱयासाठी आलेल्या जेम्स आयर्स याने व्यक्त केली.

ऑस्ट्रेलिया येथून तेरा विद्यार्थी व विद्यार्थिनी इथल्या परिसरातील राहणीमान, संस्कृती व व्यावसायिकतेविषयी अभ्यास दौऱयासाठी आले आहेत. शाकाहारी व मांसाहारी जेवणात वापरण्यात येणाऱया मसाल्यांनी जेवणाची चवच न्यारी वाटते. ऑस्ट्रेलियातील फास्ट फूडपेक्षा इथले खाद्यपदार्थ पचनासही हलके आहेत. आम्हाला कुणालाच इथल्या जेवणाचा त्रास झालेला नाही, असेही तो म्हणाला.

आमच्या शेतातले तंत्रज्ञानही प्रगत

इथल्या शेतीविषयी तो म्हणाला, तीसचाळीस वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात व्यक्तिगत शेती केली जात होती. मात्र, नंतर सर्वांनी कंपनीला शेते विकली. त्यामुळे आमच्याकडे मोठय़ा प्रमाणात व्यावसायिक शेती होते. तसेच आमच्या शेतातले तंत्रज्ञानही प्रगत आहे. इथे शेती तंत्रज्ञानात नुकतीच सुरुवात आहे, असे वाटते आहे. ऑस्ट्रेलियात मोठय़ा प्रमाणात गहू व बारलीचे उत्पादन होते. उत्तर ऑस्ट्रेलियात पाऊस असल्याने मोठय़ा प्रमाणात फळे पिकवितात. तसेच बटाटा, टोमॅटो, रताळे, भोपळा या भाजीची पिकेही हंगामात होतात. ऑस्ट्रेलियातील व इथल्या बटाटा, टोमॅटोमध्ये चवीत फरक जाणवत नाही. मात्र, ऑस्ट्रेलियात इतर देशातून आयात केलेला बटाटा वेगळा लागतो.

इथले जीवन शांत व सुखदायक

इथले जीवन शांत व सुखदायक वाटते. इथल्या वातावरणात आम्ही खूप एन्जॉय करतोय. रात्री थंडी, दुपारची उष्णता याचा अनुभव घेत आहोत. मात्र, आताची उष्णता पाहून कदाचित उन्हाळय़ात आम्ही एवढं एन्जॉय करू शकलो नसतो, असे मत त्याने व्यक्त केले.

स्वागताने भारावलो

इथले इतर व्यवसायही लहान स्वरुपाचे वाटतात. ऑस्ट्रेलियात प्रगत शेती आहेच. पण पोल्ट्रीफार्मही खूप मोठय़ा स्वरुपाचे आहेत. दळणवळणही सुधारलेले आहे. ऑस्ट्रेलियातील खेडी इथल्या खेडय़ांसारखीच आहेत. अभ्यास दौऱयाबरोबरच इथल्या भौगोलिक, व्यावसायिक स्थितीबद्दलही आम्हाला निरीक्षण करण्यास मिळाल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. भात मळणीचे मशिन, वीटभट्टय़ा, बायोगॅस असे वेगळे विषय अभ्यासता आले. इथल्या लोकांनी केलेले स्वागतही खूप मोठे आहे. कोकण दौऱयातील अभ्यासक्रमात बरेच काही शिकता आले असल्याचेही त्याने आवर्जून सांगितले.

Related posts: