|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » बिबटय़ाचे पुन्हा दर्शन

बिबटय़ाचे पुन्हा दर्शन 

प्रतिनिधी/ कराड

मलकापुरातील आगाशिवनगर येथील शिवपार्वती कॉलनीत बिबटय़ा दिसल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास चचेगाव येथील टाकेवस्तीलगत पुन्हा बिबटय़ाचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली. त्यामुळे बिबटय़ाचा वावर कायम असल्याचे स्पष्ट झाले असून सर्वत्र घबराटीचे वातावरण आहे.

दरम्यान, आगाशिवनगर येथे बुधवारी सायंकाळी डोंगरात बिबटय़ाच्या दोन बछडय़ांचा वावर असल्याचे समोर आले. नागरिकांनी बछडय़ांना पाहिल्यानंतर वनविभागाशी संपर्क साधला. मानवीवस्तीपासून दोनशे फुटांवर बिबटय़ाचे बछडे बराचवेळ असल्याचे दिसून आले. वनविभागाचे जाधवर यांच्यासह कर्मचाऱयांनी त्या परिसरात जाऊन पाहणी केली. नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या.

आगाशिवनगर येथील तुषार पवार यांच्या बंगल्याच्या आवारात सोमवारी रात्री बिबटय़ा घुसला होता. भक्ष्याच्या शोधात असलेला बिबटय़ा कुत्र्याचा पाठलाग करत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱयात दिसल्यानंतर पवार यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांची गाडी सायरन वाजवत शिवपार्वती कॉलनीत दाखल झाली. बिबटय़ा काहीवेळानंतर डोंगराच्या दिशेने पळाला. या प्रकाराने आगाशिवनगर परिसरात खळबळ उडाली होती. दरम्यान, मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास चचेगावच्या टाकेवस्ती येथील सटवाई मंदिराजवळ बिबटय़ाचे दर्शन झाले. काही महिला व ग्रामस्थांना बिबटय़ा दिसल्याने त्यांनी आरडाओरडा केला. गोंधळ उडाल्याने बॅटऱया घेऊन ग्रामस्थ सटवाई मंदिराकडे धावले. बॅटरीच्या उजेडात बिबटय़ा डोंगराकडे पळाल्याचे निदर्शनास आल्यानंतर काहींनी वनविभागाला फोन करून माहिती दिली.

Related posts: