|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » जिल्हाधिकाऱयांच्या भरारी पथकाने वास्कोत धोकादायक डोंगरकापणी रोखली

जिल्हाधिकाऱयांच्या भरारी पथकाने वास्कोत धोकादायक डोंगरकापणी रोखली 

प्रतिनिधी/ वास्को

नवेवाडे वास्कोतील रेलमार्गाखालील भागात होणारी धोकादायक डोंगरकापणी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱयांच्या भरारी पथकाने बंद पाडली. त्यांचे जेसीबी वाहन व दगडांची वाहतुक करणारा एक ट्रकही या पथकाने जप्त केला. काल बुधवारी संध्याकाळी भरारी पथकाने ही कारवाई केली.

उपलब्ध माहितीनुसार नवेवाडे वास्कोतील सखल भागात असलेल्या लोहमार्गाच्या खाली एका इमारतीच्या शेजारी खडकाळ डोंगरकापला जात होता. तीथे एक व्यवसायीक शेड उभारण्यात आलेली असून या व्यवसायाच्या विस्तारासाठीच बाजुचा डोंगर पोखरला जात होता. या डोंगराच्या भागावर वास्कोतील लोह मार्ग असल्याने ही डोंगर पोखरणी रेल वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक होती. या भागात चाललेला हा प्रकार सहसा कुणाच्या नजरेस पडत नव्हता. मात्र, काही जागरूक नागरिकांनी या प्रकाराला वाचा फोडली. वास्कोतील नीज गोंयकार रिव्होल्युशनचे प्रवक्ते चंद्रशेखर वस्त यांनी या प्रकरणी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱयांकडे तक्रार केली होती.

त्यानुसार काल बुधवारी संध्याकाळी जिल्हाधिकाऱयांच्या भरारी पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व काम बंद पाडले.  या कामात वापरण्यात येणारे जेसीबी वाहन तसेच ट्रकही पथकाने जप्त केला. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालय या प्रकरणी अधिक तपास करीत आहे.