|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रत्नागिरी विमानतळाचे काम मार्च अखेरपर्यंत पूर्णत्वाला!

रत्नागिरी विमानतळाचे काम मार्च अखेरपर्यंत पूर्णत्वाला! 

कोस्टगार्ड कमांडिंग ऑफीसर कॅप्टन एस.आर.पाटील

जान्हवी पाटील /रत्नागिरी

केंद्र सरकारच्या रिजनल कनेक्टिव्हीटी स्किम अंतर्गत पहिल्या टप्प्यात रत्नागिरी विमानतळाचा समावेश झाला असून मार्च अखेरीस धावपटीचे काम पूर्णत्वाला जाणार असल्याची माहिती कोस्टगार्डचे कमांडींग ऑफीसर कॅप्टन एस. आर.पाटील यांनी दिली.

विमानतळाची धावपट्टी 1 हजार 372 मीटर लांबीची आहे, योजनेंतर्गत रत्नागिरी विमानतळ बॉम्बर किंवा एटीआर 72 प्रकारच्या विमान वाहतुकीसाठी व इतर अनुषंगिक सेवा पुरवण्यास सक्षम व्हावे, या दृष्टीने धावपट्टीची लांबी वाढवून ती 20135 मीटर करण्याची मागणी भारतीय तटरक्षक दलाने केली आहे. मध्यंतरी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव शु. सु. आगाशे यांनी यासंदर्भात पाहणीदेखील केली होती. विमानतळाचे नूतनीकरणाचे काम वेगाने सुरू असून 2018 मध्ये पहिले विमान या धावपट्टीवरून झेपावेल, असा विश्वास आगाशे यांनी व्यक्त केला होता. या कामकाजाविषयी कोस्टगार्ड विभागाकडून माहिती घेण्यात आली असता मार्च अखेरपर्यंत या धावपट्टीचे कामकाज पूर्ण होणार असल्याचे माहिती कॅप्टन पाटील यांनी दिली.

या विमानतळाचे कामकाज गतीने सुरू असल्याने लवकरच रत्नागिरी जिल्हय़ाला पर्यटनाच्या दृष्टीने आणखीन एक महत्व प्राप्त होणार आहे. केंद्रीय नागरी हवाई मंत्रालयाच्या ‘उडान’ योजनेच्या दुसऱया टप्प्याच्या यादीत कोल्हापूर विमानतळाचा समावेश करण्यात आला आहे. राज्यात 19 मार्गावर नव्याने विमानसेवा आणि विमान कंपनीकडून प्रस्ताव मागितल्याने कोल्हापूरची विमानसेवा पुन्हा लांबणीवर गेली आहे. नव्या निर्णयामळे कोल्हापूरच्या विमानसेवेला खो बसला आहे, तर रत्नागिरीचे विमानतळ पहिल्याच टप्प्यात पूर्ण होणार आहे. यासाठी कोस्टगार्ड यंत्रणेने पाठपुरावा करून लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने याविषयी महत्वपूर्ण बैठक घेतली होती. त्यानंतर या विमानतळाच्या कामकाजाने गती घेतली असून येत्या दोन महिन्यात रत्नागिरीत आंतरराष्ट्रीय स्तरावरचे विमानतळ प्रवाशांना सेवा देण्यासाठी सज्ज होणार आहे.

या विमानतळामुळे रत्नागिरीचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचणार आहे. अत्याधुनिक सोयी-सुविधांयुक्त असे हे हायटेक विमानतळ असेल. मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणी विमानतळ सेवा असल्याचे सर्वज्ञात होते मात्र आता ही अत्याधुनिक सेवा रत्नागिरीतही सुरू होत आहे. या विमानतळमध्ये इतर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तळावर असणाऱया सर्व सुविधा मिळण्याच्या दृष्टीने कामकाज सुरू आहे. कोटय़ावधीं रूपये खर्च करून हे भव्य दिव्य विमानतळ रत्नागिरीत साकारण्यात येत आहे. फेब्रुवारी 2018 पर्यंत हे कामकाज पूर्णत्वाला जाणार होते मात्र अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याठिकाणी करण्यात येणार असल्याने वाढीव एक महिन्याचा कालावधी लागणार आहे.