|Sunday, January 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » उद्धव ठाकरेंनी वालमना धमकावले

उद्धव ठाकरेंनी वालमना धमकावले 

प्रतिनिधी , मुंबई

नाणार (ता. राजापूर) येथील प्रस्तावित हरित तेलशुद्धीकरण प्रकल्पाला विरोध करणाऱया शेतकऱयांचे प्रतिनिधीत्व करणारे अशोक वालम यांना उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर बोलावून धमकी दिल्याचा खळबळजनक आरोप माजी मुख्यमंत्री आणि स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केला. यावेळी उपस्थित असलेले वालम यांचे चिरंजीव विनय यांनी ‘मातोश्री’वरच्या बैठकीचा घटनाक्रम कथन करून राणेंच्या आरोपाला दुजोरा दिला.

तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून शेतकऱयांवर दडपशाही सुरू आहे. पोलीस आणि महसूल खात्याचे अधिकारी शेतकऱयांना धमकावून जमिनीचे संपादन करीत आहेत. कोकणच्या मुळावर उठणाऱया तेल शुद्धीकरण प्रकल्पाला आपला विरोध आहे. या लढय़ात आपण शेतकऱयांसोबत आहोत. प्रकल्पासाठी अधिकाऱयांनी शेतकऱयांवर जबरदस्ती केल्यास त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा राणे यांनी यावेळी दिला. तेल शुद्धीकरणसारख्या प्रदूषणकारी प्रकल्पाद्वारे कोकण भस्मसात करण्याचा आणि आर्थिक फायदा लाटण्याचा शिवसेनेचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या आठवडय़ात रत्नागिरी दौऱयात नाणार प्रकल्पाला विरोध केला होता. आता नारायण राणे यांनीही प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेतल्याने प्रकल्पाचे भवितव्य अधांतरी सापडण्याची चिन्हे आहेत. राणे यांनी आज पत्रकार परिषदेत प्रकल्पावरून शिवसेनेला लक्ष्य केले. नाणार परिसरातील 16 गावातील शेतकऱयांची प्रकल्पाला असहमती आहे. प्रकल्पाला विरोध वाढू लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी वालम यांना ‘मातोश्रा’rवर बोलावून घेऊन प्रकल्पाच्या विरोधात आरडाओरड करू नका, शिवसेना नेत्यांच्या विरोधात बोलू नका, अशी धमकी दिल्याचे राणे म्हणाले. याशिवाय वालम यांना विरोध मागे घेण्यासाठी मोठय़ा आर्थिक लाभाचे आमिष देणारे निनावी पत्र ऑक्टोबरमध्ये पाठविण्यात आले. या पत्रात वालम आणि त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती राणे यांनी दिली. तर हे पत्र मिळाल्यानंतर आम्ही अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे विनय वालम यांनी सांगितले.

शिवसेनेची दुटप्पी भूमिका

तेल शुद्धीकरण प्रकल्प हा आंध्रप्रदेशला जाणार होता. मात्र, शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि स्थानिक खासदार विनायक राऊत यांनी हा प्रकल्प कोकणात आणण्याचा घाट घातला. त्यामुळे शिवसेनेचा प्रकल्पाला होणारा विरोध म्हणजे चोराच्या उलटय़ा बोंबा आहेत. गुजरातमधील भूमाफियांसाठी प्रकल्प आखला जात असल्याचा राऊत यांचा आरोप हास्यास्पद आहे. प्रत्यक्षात शिवसेनेचे कार्यकर्तेच दलालीचे काम करीत आहेत. स्वत: राऊत, आमदार राजन साळवी यांनी जमिनी घेऊन ठेवल्या आहेत. कमी भावात जमीन घेऊन त्या सरकारला मोठय़ा किमतीत दिल्या जाणार आहेत. प्रकल्पाला विरोध असेल तर तो लादला जाणार नाही असे उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणतात. मग उद्योगमंत्र्यांनी प्रस्तावावर सही कशी केली? भूसंपादनासाठी महसूल खात्याकडून नोटीसा का बजावल्या जात आहेत? असे सवाल राणे यांनी केले.

 

सहनशीलता संपण्याआधी निर्णय घ्या

राज्य मंत्रिमंडळातील समावेशाबाबत माझी सहनशीलता संपण्याआधी निर्णय घ्या, असा निर्वाणीचा इशारा नारायण राणे यांनी यावेळी दिला. राणे यांना मंत्रिपद देण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. परंतु, भाजपप्रणित एनडीएत सामील होऊन जवळपास तीन महिने होत आले तरी भाजपने राणेंना झुलवत ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर राणेंनी आज भाजपला थेट अल्टीमेटम दिला.

 

‘ग्रीन रिफायनरी प्रकल्पात मोठा व्यवहार झाल्याने प्रकल्प रेटला जात आहे. भूसंपादनासाठी शेतकऱयांवर लाठी उगारण्यात आली तर परिणामांना सामोरे जाण्यास तयार रहा’ – नारायण राणे

Related posts: