|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » पॅडमॅन 9 फेब्रुवारीला प्रदर्शित

पॅडमॅन 9 फेब्रुवारीला प्रदर्शित 

प्रतिनिधी , मुंबई

बराच वाद आणि विरोध झाल्यानंतर आता पद्मावत हा चित्रपट येत्या 25 जानेवारीला प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. अक्षय कुमारचा पॅडमॅन यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने खास आकर्षण होते. पद्मावतला हिरवा कंदील मिळाल्यानंतर पॅडमॅन आणि पद्मावतची टक्कर होणार हे निश्चितच होते. पण अखेरीस पॅडमॅनच्या निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली असून 9 फेब्रुवारीला पॅडमॅन रिलीज होणार आहे. त्यामुळे 25 जानेवारीला केवळ पद्मावतचा बोलबाला बॉक्सऑफिसवर असणार आहे.

राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश अशा राज्यांमधून पद्मावतला झालेला विरोध, सेन्सॉर बोर्डाने तांत्रिक कारण पुढे करून चित्रपटाला नाकारलेले प्रमाणपत्र, कलाकारांना इजा पोहोचविण्याची धमकी अशा अनेक कठीण प्रसंगांमधून पद्मावत चित्रपट गेला आहे. सेन्सॉर बोर्डाने शीर्षकात तसेच प्रसंगांमध्ये काही बदल सुचविल्यानंतर चित्रपटाला परवानगी दिली. तरीही काही राज्यांनी चित्रपटावर बंदी घातली. पद्मावतच्या निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने चित्रपटाच्या बाजूने निर्णय दिला. त्यामुळे पद्मावत येत्या 25 जानेवारीला संपूर्ण देशामध्ये प्रदर्शित होणार हे निश्चित झाले आहे. अक्षय कुमारच्या पॅडमॅनची पद्मावतसोबत होणारी टक्करही आता टळली आहे. पद्मावतचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी अक्षय कुमारची भेट घेऊन पॅडमॅन प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी अशी विनंती केली आणि अक्षय कुमारनेही विनंती मान्य करून पॅडमॅन पुढे ढकलला आहे. शुक्रवारी संध्याकाळी पॅडमॅनच्या निर्मात्यांनी याची अधिकृत घोषणा केली. पद्मावत 25 जानेवारीला रिलीज होणार याची चर्चा सुरू झाल्यानंतर नीरज पांडे दिग्दर्शित अय्यारीचे प्रदर्शन पुढे ढकलून याआधीच 9 फेब्रुवारी केले आहे. तर 9 फेब्रुवारीला मराठीतील बहुचर्चित अजय देवगणची निर्मिती असलेला आणि नाना पाटेकर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘आपला मानूस’ हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे खरी स्पर्धा येत्या 9 फेब्रुवारीला पाहायला मिळणार आहे. पॅडमॅनचे दिग्दर्शक आर. बाल्की यांनी केले असून अक्षय कुमारसोबत सोनम कपूर आणि राधिका आपटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Related posts: