|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » पोलीस संरक्षणात प्रदर्शीत होणार पद्मावत

पोलीस संरक्षणात प्रदर्शीत होणार पद्मावत 

प्रतिनिधी, मुंबई

पद्मावत सिनेमाचा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला असला तरी याला अद्याप  करणी सेनेचा विरोध असल्याने, या चित्रपटाला पोलीस संरक्षण देण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतला आहे. ज्या-ज्या ठिकाणी हा चित्रपट प्रदर्शीत होणार आहे, त्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवणार असल्याचे पोलीस उपायुक्त देवराज यांनी सांगितले.

करणी सेनेचा विरोध पाहता मुंबई पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सिनेमा रिलीज करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन केलं जाईल, असे पोलिस उपायुक्त दीपक देवराज यांनी स्पष्ट केले. गेली दोन म]िहन्यापासून पद्मावत सिनेमा भोवती सुरु असलेले वादळ अद्याप घोंगावत आहे. मात्र सेन्सॉर बोर्डाने नावासह काही बदल करण्यास सांगितल्याने, तसेच हे बदल केल्याने, सर्वोच्च न्यायालयाने देखील या सिनेमाला ग्रीन सिग्नल दिला आहे. तसेच चार राज्यातील पद्मावतच्या बंदीला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे देशभरातील सर्व राज्यात पद्मावत प्रदर्शित होणार आहे.

सिनेमाच्या घोषणेपासूनच करणी सेना विरोध करत आहेत. जर पद्मावत सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घातली नाही तर सामूहिक आत्महदहन करु, अशी धमकी करणी सेनेच्या कार्यर्त्यानी दिली आहे. एवढंच नव्हे, सिनेमा प्रदर्शित झाल्यास तलवारी घेऊन सिनेमाचे प्रदर्शन रोखण्यासाठी थिएटरमध्ये जाऊ, असेही करणी सेनेने म्हटले आहे. यामुळे पद्मावत सिनेमाला वाढता विरोध पाहता, राजस्थान सरकारने आधीच सिनेमावरील बंदीची घोषणा केली होती. त्यापाठोपाठ मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा या राज्यांमध्येही सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी आणण्यात आली होती. दरम्यान, येत्या 25 जानेवारी रोजी पद्मावत सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमात दीपिका पादूकोण, रणवीर सिंह आणि शाहीद कपूर मुख्य भूमिकेत आहेत. संजय लीला भन्साळी यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे.

Related posts: