|Saturday, April 20, 2019
You are here: Home » क्रिडा » नदाल, किरगॉईस, स्विटोलिना चौथ्या फेरीत

नदाल, किरगॉईस, स्विटोलिना चौथ्या फेरीत 

वृत्तसंस्था / मेलबोर्न

स्पेनचा टॉप सिडेड राफेल नदाल तसेच ऑस्ट्रेलियाचा निक किरगॉईस यांनी पुरुष एकेरीत तसेच युपेनच्या स्विटोलिनाने महिला एकेरीत ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत चौथ्या फेरीत प्रवेश मिळविला. भारताच्या रोहण बोपण्णा, डी. शरण यांनी दुहेरीची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

पुरुष एकेरीच्या तिसऱया फेरीत शुक्रवारी राफेल नदालने बोस्नियाच्या 28 व्या मानांकित डेमिर झुमेरचा दोन तासांच्या कालावधीत 6-1, 6-3, 6-1 अशा सेट्समध्ये पराभव करत चौथ्या फेरीत स्थान मिळविले. गेल्यावर्षी या स्पर्धेत स्विझर्लंडच्या रॉजर फेडररने नदालला अंतिम सामन्यात पराभूत करून विजेतेपद मिळविले होते. यावेळी नदालने या स्पर्धेतील गेल्या तीन सामन्यांमध्ये 21 गेम्स गमवित चौथी फेरी गाठली आहे. रविवारी नदालचा चौथ्या फेरीतील सामना अर्जेंटिनाच्या शुवार्झंमनशी होणार आहे. नदाल आता आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत 17 वे प्रमुख विजेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे. 2017 च्या टेनिस हंगामात त्याला गुडघा दुखापतीने चांगलेच दमविले होते. एटीपीच्या क्रमवारीत आपले पहिले स्थान राखण्यासाठी नदालला या स्पर्धेत उपांत्यपूर्वफेरी गाठणे जरूरीचे आहे.

तिसऱया फेरीतील अन्य एका सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या निक किरगॉइसने फ्रान्सच्या त्सोंगाचा 7-6 (7-5), 4-6, 7-6 (8-6), 7-6 (7-5), असा पराभव करत चौथी फेरी गाठली. फ्रान्सच्या 15 व्या मानांकित त्सोंगाचे आव्हान तिसऱया फेरीतच समाप्त झाले. किरगॉइस आणि डिमिट्रोव्ह यांच्यात चौथ्या फेरीतील सामना होईल.

पुरुष दुहेरीच्या सामन्यात भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा फ्रान्सचा साथीदार व्हॅसेलिन यांनी पोर्तुगालचा सोसा आणि अर्जेंटिनाचा मेअर यांचा 6-2, 7-6 (7-3), असा पराभव केला. बोपण्णा आणि व्हॅसेलिन या जोडीने हा सामना 80 मिनिटात जिंकला. अन्य एका सामन्यात पेव्हिक आणि मॅरेक यांनी न्यूझीलंडचा सिटेक आणि हॉलंडचा कुहॉफ यांचे आव्हान 6-7 (5-7), 6-4, 6-4 असे संपुष्टात आणले. डी. शरन आणि अमेरिकेचा रॅम या जोडीने फॉगनेनी व ग्रेनोलर्स यांचा दोन तासांच्या कालावधीत 4-6, 6-7 (7-4), 6-2 असा पराभव करत पुरुष दुहेरीची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली.

महिला एकेरीच्या तिसऱया फेरीतील सामन्यात युक्रेनच्या चौथ्या मानांकित इलिना स्विटोलिनाने आपल्याच देशाच्या कोस्टूकचा 6-2, 6-2 असा फडशा पाडत चौथ्या फेरीत स्थान मिळविले. या स्पर्धेत गेल्या 20 वर्षांमध्ये महिला एकेरीची तिसरी फेरी गाठणारी कोस्टूक ही सर्वात तरुण महिला टेनिसपटू ठरली.

Related posts: