|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » स्वच्छता विभागाच्या जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचा निकाल जाहीर

स्वच्छता विभागाच्या जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचा निकाल जाहीर 

अलिशा फेराव,  चैतन्या सावंत प्रथम क्रमांकाच्या मानकरी

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

जिल्हास्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेत वरिष्ठ महाविद्यालयीन गटात अलिशा जॅकी फेराव (ता. कुडाळ) हिने तर कनिष्ठ महाविद्यालयीन गटात चैतन्या चंद्रकांत सावंत (ता. सावंतवाडी) हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला. या दोन्ही विद्यार्थिनी राज्यस्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेत जिल्हय़ाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.

पाणीपुरवठा, स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन व जिल्हा पाणी, स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धाचे आयोजन 15 जानेवारीला जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर जि. प. अध्यक्ष रेश्मा सांवत, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चव्हाण आदी उपस्थित होते.

तालुकास्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व स्पर्धेत कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालय गटात प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवला. जिल्हास्तरीय स्पर्धेत कनिष्ठ गटात प्रथम क्रमांक सांवतवाडी येथील चैतन्या चंद्रकांत सावंत हिने पटकावला. वेंगुर्ला येथील कुमार श्रीराम संतोष गावडे याने द्वितीय, देवगड येथील अनधा प्रकाश पंडित हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला.

 वरिष्ठ महाविद्यालय गटात प्रथम क्रमांक कुडाळ येथील अलिशा जॅकी फेराव हिने पटकावला. देवगड येथील संध्या संजय देवरुखकर हिने द्वितीय, सावंतवाडी येथील गीताजंली गुरुनाथ पेडणेकर हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन गटातील विजेत्या पहिल्या तीन स्पर्धकांना अनुक्रमे रक्कम अकरा हजार, सात हजार व पाच हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी स्वच्छ संकल्प से स्वच्छ सिद्धी अंतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध व लघुचित्रपट स्पर्धांचा बक्षीस वितरण कार्यक्रमही झाला. 18 वर्षाखालील निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त वरद रामचंद्र कुबल याला पंधरा हजार रुपये, द्वितिय विनिता प्रशांत पांजरी हिला दहा हजार रुपये, तर तृतीय क्रमांक प्राप्त आभा राजाराम गवस याला पाच हजार रुपये रोख रकमेचे बक्षीस देण्यात आले. तीन्ही विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र ही प्रदान करण्यात आले.

18 वर्षावरील निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त सुनील शंकर जाधव यांना पंधरा हजार रुपये, द्वितीय क्रमांक प्राप्त मंदार सदाशिव चोरगे यांना दहा हजार रु., तर तृतीय क्रमांकाच्या प्रदीप मारुती मांजरेकर यांना पाच हजार रुपये रोख रकमेची बक्षिसे देण्यात आली. त्यांना प्रत्येकी सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

18 वर्षाखालील लघुचित्रपट स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त देवांग काळसेकर याला रुपये पंधरा हजार रु., द्वितीय क्रमांक प्राप्त आकाश आपटे याला रुपये दहा हजार रु. व दोन्ही विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

18 वर्षावरील लघुचित्रपट स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त शशिकांत कांबळी यांना पंधरा हजार रु., द्वितीय क्रमांक प्राप्त वैभव मेस्त्राr यांना दहा हजार रु., तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेल्या विरेन वालावलकर व संतोष बांदेकर यांना प्रत्येकी दोन हजार पाचशे रुपये बक्षीस देण्यात आले. या विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक दीपक चव्हाण यांनी तर सूत्रसंचालन नीलेश मठकर यांनी केले.