|Sunday, July 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » कोकणातील शेतकऱयांच्या सूचनांची जल आराखडय़ात दखल

कोकणातील शेतकऱयांच्या सूचनांची जल आराखडय़ात दखल 

जलसंपदा कोकण विभाग मुख्य अभियंता खलिल अन्सारी यांचे प्रतिपादन

वाशिष्ठी, काजळी, कोदवली, मुचकुंदी उपखोऱयांचा प्रारूप आराखडा

प्रतिनिधी /रत्नागिरी

जल व्यवस्थापनाबाबत येथील शेतकऱयांच्या सूचनांची तसेच विषयतज्ञांनी सूचवलेल्या गोष्टींची दखल घेतली जाणार आहे. त्या बाबत केल्या जाणाऱया जल व्यवस्थापन आराखडय़ात सूचवण्यात आलेल्या बाबी समाविष्ट करण्यात आल्याचे प्रतिपादन जलसंपदा विभाग कोकण विभाग मुख्य अभियंता खलिल अन्सारी यांनी केले आहे.

रत्नागिरीतील जलसिंचन भवन, कुवारबाव येथे जल आराखडय़ाबाबत शनिवारी एकात्मिक राज्य जल आराखडय़ाबाबत जनसुनावणी घेण्यात आली. या कार्यक्रमाला मुख्य अभियंता खलिल अन्सारी यांच्यासमवेत निवृत्त कार्यकारी संचालक, तापी विकास महामंडळाचे भाऊसाहेब कुंजीर, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे, कोकणभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव, देवरूखमधील ज्येष्ठ व सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते, नळपाणी पाणी वापर समिती झापडेचे मधुकर पाल्ये, माजी सभापती धनश्री मोरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

जल आराखडय़ाबाबत बोलताना कोकण प्रदेश मुख्य अभियंता खलिल अन्सारी यांनी सांगितले की, पश्चिम वाहिनी खोऱयातील वाशिष्ठी, शास्त्री, काजळी, कोदवली, मुचकुंदी या उपखोऱयांचा एकात्मिक राज्य जल आराखडा प्रारूप स्वरूपात तयार करण्यात आला आहे. जल आराखडय़ाबाबत केलेल्या सूचनांची योग्य ती दखल घेण्यात येईल. येत्या मार्च अखेरीस त्या बाबत आराखडय़ाला योग्य ती मंजुरी मिळेल.

त्या बाबत कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी आपली मते व सूचना मांडल्या. यावेळी जलसंपदा विभागाच्या कार्यपध्दतीवर ताशेरेही ओढण्यात आले. शेतकरी आणि अधिकारी यांच्यामध्ये समन्वय राहिला पाहिजे. पाण्याचा परिणामकारक वापर करण्याची जबाबदारी सर्वांचीच असल्याचे संजय यादवराव यांनी सांगितले. त्याचप्रमाणे धरणे किंवा बंधारे बांधताना एकूण खर्चापैकी 2 ते 3 टक्के तिथल्या शेतकऱयांवर खर्च करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

..नंतरच उद्योगांना पाणी देण्याचा विचार व्हावा

सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते यांनी जलव्यवस्थापनाचे महत्व पटवून देत असताना जलसंपदा विभागाच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केले. येथील शेतकऱयांनी मानसिकता बदलण्याचे आवाहन त्यांनी केले. कोकणात कोकण टाईपचे बंधारे बांधण्याची आवश्यकता आहे. इतर शेतकऱयांनीही यावेळी धरण उशाला, पण कोरड घशाला.. अशी अवस्था असल्याने अगोदर येथील शेतकऱयाना आणि जनतेला पाणी कसे मिळेल, याकडे शासनाने लक्ष द्यावे. नंतरच उद्योगांना पाणी देण्याचा विचार व्हावा, असेही मत त्यांनी व्यक्त केले.