|Friday, January 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » आज मुंबई धावणार….

आज मुंबई धावणार…. 

प्रतिनिधी, मुंबई

आशियातील प्रतिष्ठित ‘टाटा मुंबई मॅरेथॉन’ 2018 च्या स्पर्धेसाठी मुंबई सज्ज झाली असून 15 व्या आवृत्तीमध्ये तब्बल 44 हजार 407 स्पर्धक धावणार आहेत. यंदाच्या स्पर्धेचे वैशिष्टय़ म्हणजे यावर्षी स्पर्धा पूर्ण करणाऱया प्रत्येक स्पर्धकाला इन्स्पिरेशन मेडल देण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये 10 किमी गटाचा समावेश करण्यात आला आहे. मुंबई मॅरेथॉनच्या मुख्य प्रायोजक म्हणून टाटा यांना मान मिळाला असून यंदाच्या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये एकूण बक्षीस रकमेत वाढ करण्यात आली आहे. उंच उंचीचा विक्रमादित्य म्हणून ओळख असलेले सर्गेई बुबका हे मुंबई मॅरेथॉनचे आंतरराष्ट्रीय ब्रंण्ड ऍम्बेसीडर आहेत.

टाटा मुंबई मॅरेथॉन 2018 मध्ये सहभागी होणाऱया धावपटूंमध्ये इथिओपियाचा सोलोमन देकसीसा सहभागी होणार असून मुंबईमध्ये आपली पहिली मॅरेथॉन जिंकण्याचा त्याचा प्रयत्न असेल. त्याला इथिओपियाच्या 24 वर्षीय यितायल अत्नाफु आणि 23 वर्षीय आयच्यु बांटी या दोन युवा तरुणांचे आव्हान असणार आहे. केनियाच्या धावपटूमध्ये जोशूआ कीपकोरीर आणि एलीउड बार्णगेटने यांनी गेल्या स्पर्धेत अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान मिळवले होते.

महिला विभागात गेल्या दोन मुंबई मॅरेथॉन विजेत्या इथिओपियाची 2016 सालची चॅम्पियन शुको गेनेमो आणि तिची केनियन साथीदार बोरनेस कीतुर या दोघीही सहभागी होणार आहेत. मॅरेथॉनमध्ये आंतरराष्ट्रीय ऍथलीट्ससोबत भारतीय ऍथलीटसही दरवर्षीप्रमाणे यंदाही आपली चमक दाखवण्यास सज्ज झाले आहेत. यामध्ये लष्करातील नितेंद्र सिंग रावत, 2017 आशियाई मॅरेथॉन चॅम्पियन गोपी. टी, तर एलिट गटातील भारतीय महिला ऍथलीट्समध्ये सुधा सिंग व ज्योती गवते सहभाग नोंदवणार आहेत. अर्ध मॅरेथॉनमध्ये मोनिका आथरे देखील यावर्षी आपले जेतेपद कायम राखण्याच्या प्रयत्नात असेल.

 

वेळापत्रक

पूर्ण मॅरेथॉन : 42 किमीची मॅरेथॉन असून सीएसएमटीपासून पहाटे 5.40 वाजता सुरू होईल. हाजी अली, वांद्रे-वरळी सी लिंक मार्गे वरळी डेअरी करत शेवट सीएसएमटी असेल.

अर्ध मॅरेथॉन – 21 किलोमीटरची असेल. पहाटे 5.40 वाजता वरळी डेअरीपासून सुरुवात होऊन सी लिंककडून परत वरळी डेअरी, महालक्ष्मी रेस कोर्स, बाबुलनाथ मंदिर ते सीएसएमटी शेवट असेल.

10 किमी अंतराची मॅरेथॉन : यंदाचे आकर्षण असून यामध्ये 10 किमी अंतर स्पर्धकांना धावावे लागेल. सकाळी 6.10 वाजता ही मॅरेथॉन सीएसएमटीवरून सुरू होईल. जी मरिन ड्राईव्ह करत मफतलाल स्विमिंग क्लबपासून त्याच मार्गे सीएसएमटीपर्यंत असेल.

मॅरेथॉन एलिट रेस : 42 किमीची मॅरेथॉन 7.10 वाजता सीएसएमटीपासून सुरू होईल याचा मार्ग पूर्ण मॅरेथॉन प्रमाणे असेल.

ज्येष्ठ नागरिक गट : ही मॅरेथॉन ज्येष्ठ नागरिकांसाठी असून 4 किलोमीटर अंतर धावावे लागणार आहे. 7.25 वाजता सीएसएमटीपासून सुरू होऊन मेट्रो सिनेमा हे शेवट असेल.

दिव्यांगांसाठी राखीव शर्यत : 1 किमी 500 मीटरची मॅरेथॉन दिव्यांगांसाठी असेल. 7.45 वाजता सीएसएमटीला सुरू होऊन डळ रोडला संपेल.

ड्रीम रन : ड्रीम रनमध्ये 6 किलोमीटर अंतर असेल. या मॅरेथॉनची सुरुवात 8.20 वाजता सीएसएमटी स्टेशनपासून सुरू होईल.

 

मार्गात थोडासा बदल

यावर्षी 30 किमीपर्यंतच्या मार्गामध्ये थोडासा बदल करण्यात आला आहे. डॉ. ऍनी बेसंट मार्ग वापरण्यात येणार आहे. यावेळी दोन यु टर्न्स वगळले असून तीन राईट अँगल टर्नचा समावेश आहे. दोन 180 डीग्रीचे टर्न ब्लॉक असून शेवटच्या 770 मीटर कोर्समध्ये तीन टर्न्सचा समावेश करण्यात आला आहे.

 

Related posts: