|Friday, February 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » छान वेळ गेला

छान वेळ गेला 

दादरला चाललो होतो. शेअर कॅब मिळाली. मी चालकाशेजारी बसलो. पाठीमागे माझ्याच वयाची साठीपार दोन जोडपी चढली. मधल्या रांगेत दोघी आणि अगदी मागे त्यांचे पती. गाडीत बसल्यावर महिलांनी चालकाला ‘एसी लावा’, ‘थोडा कमी करा’, ‘किंचित वाढवा’ वगैरे सूचना दिल्या. तोवर गाडी हाय वेला लागली होती.

वयामुळे आलेल्या सौम्य बहिरेपणामुळे म्हाताऱया अंमळ मोठय़ा आवाजात बोलत होत्या. मराठी कौटुंबिक मालिकांमध्ये पुरुष जसे शुंभ आणि मौनस्थ स्थितीत दाखवतात तसे त्यांचे नवरे मागच्या रांगेत शांत बसले होते. 

 मला त्यांच्या गप्पांवरून इतकेच कळले की त्या जावा होत्या. परवाच त्यांच्या नणदेचे दीर्घ आजाराने वयाच्या नव्वदाव्या वषी निधन झाले होते. तिची मरणाने सुटका केली होती. आता सांत्वनाला आणि नंतर दहाव्याला जाण्याच्या खर्चाच्या कल्पनेने जावांना छळले होते. दोघींनी दिवंगत नणंद, तिचा घाणेरडा स्वभाव, लग्नानंतर श्रीमंत नवरा मिळाल्यावर तिने वेळोवेळी दाखवलेला ताठा, नणंदेच्या नातीने इंटरकास्ट लग्न करून नणंदेचे ठेचलेले नाक वगैरे आठवणी काढल्या. नणंदेचा थोरला मुलगा मुंबईत आणि धाकटा अतिदूर विलायतेत असतो. नणंदेचा धाकटय़ावर फारच जीव असूनही तो आईकडे फिरकत नाही.

थोरला नणंदेला सांभाळतो. पण शिष्ट आहे. त्याची बायको भोचक आणि हलकट आहे. त्याने एकुलत्या मुलाचे लग्न केले तेव्हा जावांचे मानपान नीट केले नाही, त्यांना जेवताना आग्रह देखील केला नाही. आता आत्याबाई (उर्फ नणंद) निवर्तली आहे. आता किनई या थोरल्या मुलाला आणि त्याच्या आगाऊ बायकोला अजिबात किंमत द्यायची नाही. हळूहळू संबंधच तोडायचे. एक वेळ आत्याबाईचा मधला किंवा धाकटा मुलगा भेटला तर त्याच्याशी चांगलं वागू. वगैरे परराष्ट्रीय धोरण दोघींनी जाहीर केले. 

सायनपाशी त्यातल्या एकीचा फोन खणखणला. त्यांनी चालकाला फोन दिला. त्यानुसार एका अरुंद रस्त्याच्या तोंडाशी कॅब थांबली. जावा आणि त्यांच्या पतींना नेण्यासाठी नणंदेचा थोरला मुलगा आला होता. त्याने डिकीतून सामान उतरवले आणि चौघांना वाकून नमस्कार केला.

त्या क्षणी जावांनी जोरदार हंबरडा फोडून त्याला मिठीत घेतले आणि त्याचे सांत्वन करू लागल्या.

त्यांच्या मघाच्या गप्पा आणि आताचा हंबरडा माझ्या मते दोन्ही उत्कट आणि खरे होते.

Related posts: