|Thursday, August 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » चिंता आरोग्याची

चिंता आरोग्याची 

डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा सहावा दीक्षांत सोहळा कोल्हापुरात नुकताच साजरा झाला. या सोहळ्यासाठी माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम् यांनी मुख्य अतिथी म्हणून जे मार्गदर्शन केले ते म्हणजे चिंता आरोग्याची असे होते. खरोखरच आरोग्यम् धनसंपदा म्हणून भागणार नाही. भारत विश्वात सर्वश्रेष्ठ करायचा असेल आणि ‘युवा’ लोकसंख्या ही शक्ती बनवायची असेल तर पी. चिदंबरम् यांच्या इशाऱयाकडे गंभीरपूर्वक लक्ष देउढन, आरोग्याकडे गंभीरपूर्वक लक्ष देऊन हे  प्रश्न प्राधान्याने सोडवावे लागतील. लोकांच्या सहज चर्चेतही अनेक गोष्टी व्यक्त होत असतात. तुम्ही जुन्या जमान्यात चांगले, निर्जंतूक अन्न खाले, स्वच्छ हवा, पाण्यात तुम्ही वाढलात म्हणून तुम्हाला चांगले आयुष्य जगता आले. आम्हाला चांगली हवा, पाणी नाही आणि सेंद्रिय धान्ये-भाजी नाही. आमचे काही खरे नाही. भारत जगातला सर्वात तरूण देश आहे. आणि पुढचे शतक भारताचे आहे असे मानून भारताची पावले पडत असली तरी आरोग्याचे प्रश्न आणि बालक व तरूणांच्या समस्या गंभीर आहेत. तंबाखू, गुटखा व तत्सम व्यसनांनी पिढीच्यापिढी पोखरली जात आहे. सांगली, कोल्हापूर, बेळगाव, सातारा, कोकण हा सारा परिसर गेली अनेक वर्षे गुटख्याने पोखरला आहे. मद्य, मदिरा यांचेही सेवन वाढत आहे. तोंड उघडत नाही. तोंडाचा कर्करोग झाला आहे. अल्कोहोलिक रूग्ण आहे. आणि ताण-तणावाचे मानसिक रूग्ण बनला आहे. असे अनेक रूग्ण आपल्या अवती-भोवती वावरताना दिसत आहेत. खाण्या-पिण्याच्या चांगल्या सवयी नाहीत, व्यायाम व मेहनतीचे काम करत नाही. आणि प्रदुषित हवा, पाण्याचा फटका बसलेली अनेक माणसे आपण रोज बघतो. शाळेतून खेळ थांबले आहेत आणि मोबाईलवर गेम सुरू आहेत, दिवसभरात एकदाही घाम येत नाही. चालणे थांबले आहे. दूरचित्रवाणीसंच असो, लॅपटॉप असो वा स्मार्टफोन अनेकांचा दिवस स्क्रिनसमोर खर्च होत आहे. त्यातुन अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. डोळे कोरडे पडणे, रेडियेशनचा त्रास होणे, वजन वाढणे, रक्तदाब वाढणे, मधूमेहासारखे आजार बळावणे. त्वचेचा कर्करोग हेणे, अशा अनेक आजारांना चुकीचे आहार व राहणीमानच कारणीभूत आहे. या पार्श्वभूमिवर देशभरात जागृती व्हायला हवी. पी. चिदंबरम् यांनी कोल्हापुरात जी चिंता व्यक्त केली ती लक्षात घेण्यासारखी आहे. ते म्हणाले, देशातील मुलांचे आरोग्य आणि आहार याबाबत कमालीचे दुर्लक्ष आहे. देशाच्या दृष्टीने ही अतिशय लाजीरवाणी बाब आहे. आरोग्य व्यवस्थेत असमतोल आहे. अपुरे अन्न, हलक्या प्रतिचा आहार, अशुद्ध पाणीपुरवठा आणि मल निस्सारण सुविधांचा बोजवारा यामुळे आरोग्याचा समतोल बिघडला आहे. आणि सरकारचे याकडे दुर्लक्ष आहे. चिदंबरम् यांच्या भाषणातील राजकीय संदर्भ आणि पक्षभिन्वेष दूर होऊनही या मुद्दय़ांचा विचार केला पाहिजे कारण त्यातच देशहित सामावले आहे. कोणताही विचार  न करता किंवा आम्ही उद्याच्या पिढीसाठी काय ठेवणार याचा विचार न करता वसुंधरा प्रदूषित, विद्रूप करण्यावर आम्हा सर्वांचा पुढाकार आहे. पाणवठे प्रदूषित आहेत. नद्यांना गटारीचे स्वरूप आले आहे. अन्न-धान्ये रासायनिक खत आणि प्रक्रियेतून समोर येत आहेत. कीटकनाशक, जंतूनाशके विषांचा शेतात प्रचंड वापर होत आहे. दूध, भाजीपाला,अन्न-धान्ये, पाणी या सर्वांना या रासायनिक खते, औषधांचा फटका बसत आहे. पण करणार काय अशी समस्या आहे. शाळेच्या मुलांच्या आहारात जंकफूड आहेत. कोल्ड्रींक्स आहे. गेमचा कीबोर्ड आहे. आई-बाप स्मार्टफोनवर आहेत. बेकरी ऍटमवर पेटपूजा होत आहे. असे चित्र अनेक घरात दिसत आहे. त्यांची चिंता आहेच पण सरकारचेही अनेक योजना आणि सेवा याकडे दुर्लक्ष असल्याने आरोग्य व्यवस्थेचा समतोल बिघडला आहे. आरोग्याचा प्रश्न तीव्र बनला आहे. पी. चिदंबरम् यांनी सांगितले सरकारकडून अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी नीट केली जात नाही. केंद्र आणि राज्य सरकारकडून बालकांच्या आरोग्याबाबत करण्यात येत असलेल्या उपाय योजनेबाबत संशयाचा वाव आहे. मनुष्यबळ विकास, आरोग्य, कुटुंबकल्याण, महिला आणि बालविकास निधीला कात्री लावण्यात आली आहे. चांगले मनुष्यबळ तयार करण्यास सरकारचा भर नाही, गर्भवती, स्तनपान करणारी बालके व माता याकडे लक्ष नाही. वेगवेगळ्या आरोग्य सुविधा, आहार अणि आरोग्यबाबतीचे कायदे याकडेही सरकारचे लक्ष नाही. त्यामुळेच हा समतोल बिघडतो आहे. आणि याचा मोठा फटका बसण्याची भिती आहे. आपण उघडय़ा डोळ्यांनी आजूबाजूस बघितले तर पी. चिदंबरम् यांच्या म्हणण्यातील तथ्य लक्षात येईल. त्यांनी त्यांच्या राजवटीत काय केले आहे, असे प्रतिप्रश्न करून हा विषय राजकीय धुणे म्हणून बडविण्यात अर्थ नाही. देश मजबूत, भक्कम आणि संपन्न करायचा असेल तर देशातील नवी पिढी सक्षम, संस्कारित, कौशल्यपूर्ण आणि आरोग्यपूर्ण हवी. त्यासाठी केवळ निधी व योजना असून भागणार नाही. केवळ घोषणांनी काही साध्य होणार नाही. आपण सर्वांनी एकत्र येऊन पाणी, हवा, जमीन प्रदूषणापासून चांगला आहार, विहार, संस्कारापर्यंत प्रत्येक गोष्टीत लक्ष घातले पाहिजे व देशाची नवीपिढी आरोग्यक्षम संस्कारक्षम केली पाहिजे. अन्नसुरक्षा आणि सुरक्षित अन्न यावर भर दिला पाहिजे. केवळ पदव्या उपयोगाच्या नाहीत. या त्यांना राष्ट्रभक्तीची आणि मानवकल्याणाची बैठक हवी.पी. चिदंबरम् यांनी हे सहजपणे म्हटले तरी त्यांच्या म्हणण्याचा तोच अर्थ आहे. पर्यावरणाचा समतोल राखत मनुष्यबळ विकासावर भर दिला पाहिजे. आज अनेकांना उपचार  महागडे  झाल्याने आरोग्य सेवेचा लाभ घेता  येत नाही. त्यात उंदीर-घुशी मोठय़ा प्रमाणावर धुमाकूळ घालत आहेत. या सर्व परिस्थितीचा साकल्याने विचार करून आरोग्यम् धनसंपदा हा विचार बळावयास हवा.