|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » ज्ञानगंगा विद्यालयाचा होणार कायापालट

ज्ञानगंगा विद्यालयाचा होणार कायापालट 

प्रतिनिधी/ सातारा

सातारा पालिकेच्या असलेल्या शाळांमधील काही शाळांची दुरवस्था झाली आहे. त्यामध्ये प्रभाग 17 मधील पालिकेच्या 19 नंबर शाळेची दयनिय अवस्था घालवून तिचा कायापालट करण्यासाठी नगरसेवक विजय काटवटे यांनी मंत्रालयाची दारे ठोठावली. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा विषय घेण्यात आला. पन्नास लाख रुपये राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मंजूर केले आहेत. त्यातून शाळेच्या परिसरात खेळाचे मैदान, जिम, वॉकिंग ट्रक आदी बाबी होणार आहेत. परंतु शाळेच्या पाठीमागे पालिकेच्या जागेतील अतिक्रमण हटवणार कोण?, शाळेच्या आवारात दोन टाक्या आहेत. त्यामुळे शाळेचे शाळापण गेले आहे.

सातारा पालिकेच्या ज्ञानगंगा विद्यालयाच्या आवारात दोन पाण्याच्या टाक्या आहेत. एक जुनी टाकी तर नव्या टाकीचे अजूनही बांधकाम सुरु आहे. पाईपलाईनचे काम अर्धवट स्थितीत असल्याने पाईप तशाच आहेत. या शाळेच्या आवारात सुट्टीच्या काळात मद्यपींचा अड्डा असतो. या शाळेच्या पाठीमागे असलेली पालिकेची दोन गुंठे जागा चक्क पालिकेच्या एका कर्मचाऱयाने लाटून ती परस्पर विकली आहे. आजही त्या कर्मचाऱयास सहकार्य करणारे कर्मचारी पालिकेत कार्यरत आहेत. हे अतिक्रमण हटवणार कोण?, हा मुद्दा असताना तसेच शाळेच्या आवारात दोन टाक्या असल्याने ‘मुलांचा जीव टाकीखाली’ अशी तऱहा आहे. त्यातच या शाळेचा कायापालट करण्यासाठी नगरसेवक विजय काटवटे यांनी मंत्रालयाची दारे ठोठावून मंत्री विनोद तावडे यांच्याकडे पाठपुरावा करुन 50 लाख रुपयांचा निधी खेचून आणला. त्यासाठी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूरीही देण्यात आली असून यामधून शाळेमध्ये जीम, खेळाचे साहित्य, मैदान, जॉगिंग टॅक, संरक्षक भिंत, डिजीटल क्लासरुम आदी कामे होणार आहेत.

नगरसेवकांचे वॉर्डात नाही लक्ष

कात्रेवाडा शाळेच्या पाठीमागे अतिक्रमण आहे. ते पहिले नगरसेवकांनी हटवावे. वॉर्डात नगरसेवकांचे दुर्लक्ष असते. नगरसेवकांनी वॉर्डातील नागरिकांच्या हितासाठी सतत कार्यरत राहिले पाहिजे. परंतु हे वॉर्डातच नसतात. आम्हालाच पालिकेकडे भांडावे लागते. यांना निवडून देवून आम्ही चुकी केली असे आता आम्हाला वाटू लागले आहे.

धनंजय शिंदे नागरिक 

शाळेचा विकास होतोय

शाळेचा विकास होत आहे. ही चांगली बाब आहे. पालिकेच्या शाळेमध्ये ज्या सोयीसुविधा येणार आहेत. त्यामुळे निश्चितच आमच्या पालिकेच्या शाळेचे विद्यार्थ्यांसाठी होणारे काम योग्य आहे. लोकप्रतिनिधींनी शाळांना असेच सहकार्य करावे.

रमेश गमरे, प्रशासनाधिकारी

 

Related posts: