|Saturday, November 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मतदार याद्यातील दोष तात्काळ निवारा

मतदार याद्यातील दोष तात्काळ निवारा 

प्रतिनिधी / बेळगाव

मतदार यादीशी संबंधित येणाऱया तक्रारी त्वरित आणि समर्पकरित्या सोडविण्यात याव्यात, कोणत्याही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीतून चुकता कामा नये, याकडे अधिकारी वर्गाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी सूचना बेळगाव जिल्हा मतदार याद्यांचे परिवेक्षक आणि भूमापन व भूदाखला खात्याचे आयुक्त मौनिश मौदगील यांनी केली.

रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार याद्या पडताळणीबाबत विशेष सभा घेण्यात आली. यावेळी मौदगील यांनी पात्र मतदारांची मतदार यादीत नाव नोंदणी करणे, अपात्र मतदारांची नावे कमी करणे, मृत झालेल्या मतदारांची नावे यादीतून कमी करणे, यासह घरचा पत्ता आणि नावामध्ये असणाऱया दुरुस्तीबाबत अधिकारी वर्गाने जागरूकपणे काम करावे, अशी सूचना केली. एकाच नावाने अनेक मतदार असतील, तर संबंधितांचे आधारकार्ड तपासून मतदार यादीत नावे कायम ठेवावी, अशी सूचना मौदगील यांनी यावेळी केली.

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार याद्यांच्या तपासणीचे विशेष अभियान दि. 22 जानेवारी रोजी संपणार आहे. मात्र मतदार यादीत नाव नोंदणीसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापासून सात दिवस आधी मतदार यादीत नव्याने नाव नोंदणी करण्याची संधी असल्याचे मौनिश मौदगील यांनी यावेळी सांगितले.

आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्या

मागील वेळेस मतदान कमी झालेल्या मतदार केंद्रांमध्ये नाव नोंदणीसाठी प्राधान्य देण्यात यावे, मतदानास येणाऱया मतदारांना अनकुल ठरण्यासाठी मतदार केंद्रावर आवश्यक मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. मतदार याद्या पडताळणीचे काम समर्पकरित्या होण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी बुथस्तरावर आपल्या निवडणूक एजंटांची नेमणूक करावी, अशी विनंती मौदगील यांनी केली.

बेळगाव उत्तर मतदार क्षेत्रातील काही केंद्रांवर एकाच घराच्या पत्त्यावर शेकडो मतदारांची नाव नोंदणी करण्यात आली आहे, अशी तक्रार भाजपच्या नेत्यांनी केली होती. ही मतदार यादी तपासण्यात आली आहे. हे प्रकरण गंभीरपणे घेण्यात आले असून मतदार यादीतील या नावाबाबत चौकशी करावी, अशी सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला यांना मौदगील यांनी यावेळी केली.

जिल्हय़ामध्ये विशेष ग्रामसभा

मतदार यादीतील पडताळणीच्या विशेष अभियानाबाबत आणि मतदान केंद्रावरील मुलभूत सुविधा पुरविण्याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी एस. झियाउल्ला यांनी माहिती दिली. तसेच जिल्हय़ातील कोणत्याही भागात मतदार यादीत दोष आढळून आल्यास आपल्या नजरेस आणावे, अशी सूचना राजकीय पक्षाच्या नेत्यांना यावेळी करण्यात आली. जिल्हा स्वीप समितीचे अध्यक्ष आणि जि. पं. चे मुख्यकार्यकारी अधिकारी रामचंद्रन आर. यांनी मतदार यादीतील पडताळणीबाबत सर्व सामान्यांना माहिती देण्यासाठी जिल्हय़ामध्ये विशेष ग्रामसभा घेण्याबाबत तयारी सुरु असल्याचे सांगितले.

अप्पर जिल्हाधिकारी डॉ. सुरेश इटनाळ आणि महापालिका आयुक्त शशिधर कुरेर, प्रांताधिकारी डॉ. कविता योगप्पण्णवर, गीता कौलगी, विजयकुमार व्हनकेरी यांच्यासह सर्व तहसीलदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे मुख्य अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

Related posts: