|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पुढच्या पिढीच्या हातात देवू मराठी लढाऊपण !

पुढच्या पिढीच्या हातात देवू मराठी लढाऊपण ! 

प्रतिनिधी/ बेळगाव

मराठी शाळेत शिकणारी मुले नोकरी मिळाली नाही तर पुढे शेतीतरी करतील. इंग्रजी शाळेत शिकून नोकरी मिळाली नाही तर ती मुले अंधार पडण्याची वाट पाहून दरोडे घालतील. पोरांच्या साहाय्याने आम्हाला आपली मराठी जगवायला हवी. पुढच्या पिढीच्या हातात सर्वांना आपलं म्हणणारी सामान्य मराठी माणसाची संस्कृती आणि लढाऊपण देणे महत्त्वाचे ठरणार आहे, असे प्रतिपादन उचगाव मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स साताराचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांनी केले.

‘भाषा, संस्कृती व मानवी भवितव्य’ या विषयावर ते बोलत होते. आपल्याला वाङमय हा शब्द आवडतो. कारण तो वाणीचा व्यवहार आहे. हा व्यवहार ओवी, अभंग आणि पोवाडय़ांनी जपला. सामान्य जनताच या वाङमयाची अधिकारी आहे. शब्दांच्या साहाय्याने दंगली पेटविता येतात, माणसं उभी राहतात. माणसं हिरावून घ्यायची असेल तरी शब्दच कामी येतात. यामुळे सगळय़ांना बरोबर घेवून जातय ते साहित्य असा त्यांनी उल्लेख केला.

मराठी सारखं दिसणारं काहीसं आज साहित्याच्या हाती आहे. आजचे साहित्यिक वापरतात ते खरं मराठी कधीच नाही. पूर्वी मोजण्याच्या सातमान आणि वीसमान अशा दोन पद्धती होत्या. धनगरी आणि शेतकरी समाजाच्या वीसमान पद्धतीत अठरावीस्सं दारिद्रय़ म्हणजे वर्ष भराचं दारिद्रय़. आज त्याला अठराविश्वे दारिद्रय़ करण्याची पद्धत आली आहे. पूर्वी माणूस हे मोजण्याचं एकक होतं. साडेतीन हात हे पायाभूत एकक आणि पुरुष हे मुख्य एकक. मात्र बदल्या परिस्थितीत या साऱयाचे वाटोळेच करुन टाकले आहे.

ऐतिहासिक कागदपत्रे, शिलालेख, तांम्रपठ यांचे स्तोम इतिहासकारांनी माजविलं. एका ठिकाणी एक शिल्प होतं. त्यात माणूस सिंहाला बुक्क्मयांनी मारत होता. ते पाहून सिंह म्हणाला माणसाला कोरता येतं आम्हाला नाही. नाही तर आम्ही दाखवलं असतं कोण कुणाला मारत होतं. हे उदाहरण देताना दान मिळेल तो राजाला चंद्र, इंद्र काहीही म्हणेल. इतिहास हा ठिपक्मयांच्या रांगोळीसारखा. त्यामुळे हे ठिपके जोडणारा इतिहासकार जसा तहास इतिहास होणार. म्हणून लोककथा, गीतं, आचार हाच खरा इतिहास असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

काही लोक लोक साहित्य मानत नाहीत. कारण लोक साहित्यात कागदोपत्री काही नसतं. खरे साहित्य आणि संस्कृती रुप, रस, गंध संगीत आणि शब्द यांच्या सहाय्याने आकाराला येते. त्यावर राबणाऱया माणसाचाच अधिकार आहे. हा कर्मभाव संतांनी आणि बसवेश्वरांनी सांगितला आहे. भीक मागून जगणाऱयांचा निषेध त्यांनी केला. घोकलेले ग्रंथ सांगून ज्ञान येत नाही. असे सांगतानाच यापुढे संमेलनाच्या दिंडीत पालखीमध्ये ज्ञानेश्वरीबरोबरच तुकाराम गाथा हा 400 वर्षांतल्या नितीमान माणसांचा नितीग्रंथ आणि भारतीय संविधान हा 1950 नंतरचा वर्तन ग्रंथ जरुर ठेवा, असा सल्ला त्यांनी दिला.

गीता आणि ज्ञानेश्वरी यातील फरक सांगताना ज्ञानेश्वरी हे भाषांतर नाही तर गीतेची टिका आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. गीतेत कर्म विवेक नाही. ज्ञानेश्वरीत तो आहे. गीता अभिजन साहित्य आहे तर ज्ञानेश्वरी लोक साहित्य आहे. युध्द कर म्हणून सांगितल्यानंतर अर्जुन जेंव्हा नकार देतो तेंव्हा गीतेत कृष्ण सांगतो तुझे मन आणि बुध्दी मला अर्पण कर. म्हणजेच माझा गुलाम हो. ज्ञानेश्वरीत स्वतः विचार कर मग कृती कर आणि विवेकाने वाग असे सांगितले आहे.

ज्यांच्या भाषेची ओळख संपते ते गुलाम होवून बसतात. कोरीया 6 कोटी लोकांच्या देशात 1980 पर्यंत स्वतःची भाषा नव्हती. ते चीनी भाषा बोलायचे. विकास करायची अस्मिता स्वतःच्या भाषेशिवाय येणार नाही म्हणून तेथे कोरीयन भाषेची निर्मिती झाली. या भाषेंना ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान सारं काही आणून आज जगावर आधीराज केलंय. आजही जर्मन, कोरीया आणि रशियामध्ये इंग्रजी चालत नाही. तरीही ते देश प्रगत आहेत. अमेरिकन आणि पाश्चिमात्य देशांना नोकरी आणि हमाल हवे होते. यामुळे त्यांनी दुसऱयांच्या भाषा मोडून आपली भाषा लादली. आज सीमाभागातही तेच सुरु आहे.

स्त्राrपासून विश्व निर्माण झाले आहे. हे मान्य करु न इच्छिणाऱया व्यक्तींनी बायकांच्या हातून साऱया गोष्टी हिरावून घेतल्या. झाडायचं, सारवायचं स्त्रियांनी आणि दुधाचं बिल नवऱयाच्या नावावर हे परिस्थिती आजही चुकलेली नाही. दिवाळीत महिला शेणाच्या गवळणी घालतात. या शेणामध्ये रचलेलं एक कवित्व आहे. पहिल्या दिवशी एकच गवळण का? या प्रश्नावर वृध्द आजी गडी माणूस गरवार असत नाही म्हणून हे उत्तर देते. खरे तर वसुबारस हा सणच नाही. त्याचे खरे स्वरुप वाघ बारस हे आहे. माणसांनी सणसंस्कृती बाह्य करुन टाकले. हे वास्तव त्यांनी मांडले.

लोक संस्कृतीत गायी आणि म्हशी दोन्ही महत्वाच्या आहेत. मात्र काहींनी गायीला इतके महत्व दिले की म्हस उपेक्षित राहिली. आज तो रामदेव बाबा मिळेल ते तूप घेवून त्यात हाळद मिसळतो आणि विकतो. त्याच्या ब्रॅन्डखाली जितकं तूप विकतं तितकं तूप देण्यासाठी तितक्मया भारतात गायीच नाहीत. घाम यात्रेनी शब्दयात्री व्हायला हवे. सगळय़ा माणसांना एकत्र आणण्यासाठी संतांनी घेतलेल्या शब्दांचं पिकचं कामाला आलं. शिवरायांना स्वराज्याचे पाईक तुकारामांच्या पाईकीचे अभंग आणि किर्तनाने दिले. आजच्या राजकर्त्यांना खात्री असते आपल्याला डोक नाही म्हणून ते लिहिणाऱयांना घाबरतात. डोकं गहाण ठेवणाऱयांना पुरस्कार देतात आणि ठेवलं नाही तर गोळय़ा घालतात. यासाठीच महाराष्ट्रातल्या सर्व कविता आणि ग्रंथ डोहात बुडवावेत, लोकगंगेतून वर येतील तेवढेच खरे मानावेत, असा क्रांतीकारी विचार त्यांनी मांडला.

भाषा म्हणजे एकाच्या मनीचं दुसऱयाच्या मनीचं कळण्यासाठीची सांकेतीक  सोय असते. म्हणूनच भाषेचा दुस्वास करणाऱया त्या कन्नड वेदीकेचा मला राग नाही तर दया येते. ज्यांना कन्नडच समजलं नाही त्यांना मराठीचं काय येणार. आजचं मराठी साहित्य व्यभिचारी झालयं. आपली भाषा आणि संस्कृती प्राचिनच नाही तर ती समर्थ आहे. तिच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान पेलण्याची ताकद आहे. ती पेलू नये हा आंतरराष्ट्रीय कट आहे. यासाठी साऱयांनीच काही तर करण्याची गरज आहे, असे अध्यक्ष म्हणाले.