|Thursday, November 15, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » अनंत ब्रह्मांडे उदरिं

अनंत ब्रह्मांडे उदरिं 

पारमार्थिक दृष्टय़ा हा तृणावर्त कोण आहे? श्रीमद्भागवताच्या व्यासंगी अभ्यासकांनी विविध भावार्थ कथन केले आहेत. स्वामी तेजोमयानंदजी सांगतात-तृणावर्त हा कामनेचे प्रतीक आहे. जीवनात अविद्या, जडवाद असतील तर तृणावर्ताचे आगमन निश्चितच आहे. डोळय़ांमध्ये धूळ साचून राहणे म्हणजेच चित्तामध्ये विक्षेप आणि मनामध्ये भ्रमाचे आधिपत्य असणे. तृणावर्त उद्धाराचा आम्हाला संदेश हाच आहे की कामवासनेवर विजय प्राप्त केला पाहिजे. तर भागवताचार्य वै. पू. डोंगरे महाराज सांगतात-रजोगुणाचा फेराच तृणावर्त आहे. काम आणि क्रोध हे रजोगुणाचे पुत्र होत. रजोगुण मनांत आला की मन चंचल होते. तृणावर्तरूपी वावटळे मनांत येताच ते चंचल होते. बुद्धि जेव्हा ईश्वरापासून विन्मुख होते तेव्हा तृणावर्तरूपी रजोगुण मनांत शिरतो आणि त्याला चंचल करून टाकतो. यशोदेच्या, गोप, गोपींच्या डोळय़ांत धूळ शिरली असे कहाणी सांगते. जेव्हा आपल्याला सांसारिक सौंदर्य न्याहाळण्यातच सुख वाटू लागते तेव्हा समजावे की डोळय़ात तृणावर्त येऊन बसला आहे आणि मग परमेश्वर दिसत नाही.

यापुढे श्रीमद्भागवतात एक सुंदर प्रेमपूर्ण प्रसंग वर्णिला आहे. एकदा यशोदा बाळाला स्तन्य पाजित होती. त्याचें सुंदर रूपडे न्याहाळीत होती. आईचें प्रेम पाहून कान्हा जोराने दूध पिऊ लागला. जोपर्यंत वैष्णवाच्या मनांत प्रेम उसळू लागत नाही तोपर्यंत प्रभूना भूक लागत नाही. त्यांना प्रार्थना करून विचारा की आपल्यासाठी कोणते भोजन आणू? आपण सर्व जगाचें अन्नदाते आहांत. तरी पण मी जे कांही थोडे अन्न तयार केले आहे त्याचा आपण स्वीकार करावा.

यशोदामाईने पाहिले की बाळ दूध पीतच राहिले आहे, जास्त दूध प्यायले तर बाळाला अपचन होईल म्हणून बाळाचे दूध पिणे सोडविण्यासाठी ती त्याला कुरवाळू लागली. त्याच्या मुखाचे चुंबन घेऊ लागली. बाळाने मातेकडे पाहिले. माताही त्याच्याकडे पाहू लागली आणि बाळाने जांभई देण्यासाठी तोंड उघडले तसे यशोदामाईने बाळाच्या तोंडामध्ये काय पाहिले? त्या मुखात आकाश, ज्योतिर्मंडल, सूर्य, चंद्र, अग्नी, वायू, समुद्र, द्वीप, पर्वत, नद्या, वने आणि सर्व चराचर पदार्थ भरलेले आहेत असे तिने पाहिले. तुकाराम महाराजांनी एका अभंगात वर्णन केले आहे-

अनंत ब्रह्मांडे उदरिं ।  हरि हा बाळक नंदाघरी ।।

नवल केव्हडे केव्हडे ।  न कळे कान्होबाचें कोडे ।।

शुकदेव वर्णन करतात-आपल्या पुत्राच्या मुखामध्ये अशा प्रकारे अचानक सर्व जग पाहून हरिणाच्या पाडसाच्या डोळय़ासारखे डोळे असलेली यशोदा थरथर कापू लागली. तिने आश्चर्यचकित होऊन आपले डोळे बंद करून घेतले. तिला पुन्हा डोळे उघडण्याचे धाडसच होत नव्हते. तिला वाटत होते पुन्हा काय दिसेल कोणास ठाऊक? पण थोडय़ावेळाने तिने डोळे उघडून पाहिले तर कान्हा तिच्याकडे पाहून हसताना तिला दिसला. यशोदामाईला वाटू लागले, आपले आता वय होत चालले आहे म्हणून आपल्या मनालाच काही तरी भ्रम झाला असावा. आपले बालक तरी ठीक आहे.
– ऍड. देवदत्त परुळेकर

Related posts: