|Friday, February 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » मोठय़ांच्या छोटय़ा गमती

मोठय़ांच्या छोटय़ा गमती 

गेल्या आठवडय़ात बर्नार्ड शॉ यांचा एक ऐकीव किस्सा सांगितला होता. आंतरजालावर त्यांचे खरेखुरे किस्से देखील उपलब्ध आहेत. शॉ भारदस्त लेखक, नाटककार असले तरी त्यांचा स्वभाव थट्टेखोर होता. त्यांच्या ओळखीतला एक तपशील सांगायचा तर-शॉ यांच्या ‘द पिग्मॅलियन’ नाटकाचे पुलंनी ‘ती फुलराणी’ हे रूपांतर केले होते.

एका तरुण संपादकाने आपल्या संग्रहात शॉ यांचे लेखन समाविष्ट करण्याची परवानगी मागताना लिहिले, “तुम्हाला योग्य मानधन देणे मला परवडणार नाही, मला सवलत द्या, मी खूप लहान आहे…’’ शॉनी उत्तर दिले, “तुम्ही मोठे होईतो मी वाट बघीन, (आणि मग परवानगी देईन).’’ 

शॉना फुलांची खूप आवड असते हे ठाऊक असलेला एक पाहुणा त्यांच्या घरी आला तेव्हा त्याला घरात कुठेही फुलदाणी किंवा फुले दिसली नाहीत. त्याने त्यावर आश्चर्य व्यक्त केले. तेव्हा शॉ उत्तरले, “होय, मला फुले आवडतात खरी. पण झाडावरून त्यांची मुंडकी छाटून ती टेबलवर किंवा फुलदाणीत खोचून ठेवणे मला क्रौर्याचे वाटते.’’

शॉच्या पत्नीने सांगितलेला एक किस्साआमचे लग्न ठरले तेव्हा माझ्या नवऱयावर प्रेम करणारी एक अभिनेत्री येऊन त्याला म्हणाली की तुझे दुसऱया कुणा स्त्रीशी लग्न झाले तर मी जगू शकणार नाही…. आणि आमचे लग्न झाल्यावर ती खरोखरच मरण पावलापण आमच्या लग्नानंतर पन्नास वर्षांनी!  

एका शिल्पकाराने शॉच्या चेहऱयाचे शिल्प बनवून त्यांना भेट दिले. काही दिवसांनी शॉ त्याचे वर्णन करताना म्हणाले, “काय गंमत आहे. मी म्हातारा होत चाललोय आणि हे शिल्प तरुणच राहिलेय.’’

एका चटोर स्त्रीने शॉना चिठ्ठी पाठवली, “अमुक दिवशी दुपारी 4 ते 6 मी माझ्या घरात असेन.’’ शॉनी चिठ्ठीचे उत्तर पाठवले, “मी देखील.’’.

शॉनी आपल्या पुस्तकाची प्रत एका ज्ये÷ स्नेह्याला सप्रेम भेट दिली होती. तिच्या पहिल्या पानावर त्यांनी लिहिले होते, “ यांना आदरपूर्वक भेट,’’ आणि खाली सही केली होती. काही दिवसांनी जुन्या पुस्तकांच्या दुकानात फेरफटका मारताना त्यांना ती प्रत दिसली. त्यांनी ती विकत घेतली. तिच्या पहिल्या पानावरचा स्वतः लिहिलेला मजकूर आणि सहीच्या खाली लिहिले,

“यांना अधिक आदरपूर्वक,’’ आणि खाली नव्याने सही करून आणि तारीख टाकून त्यांनी पुस्तक त्या स्नेह्याला परत नेऊन दिले.

Related posts: