|Monday, January 21, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » शिवसेनेचा स्वतंत्र बाणा

शिवसेनेचा स्वतंत्र बाणा 

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत याबाबतच्या ठरावाला मंजुरी देण्यात आल्याने भविष्यात शिवसेना आणि भाजपमध्ये कडवी टक्कर पाहायला मिळेल, असा एकूणच रागरंग आहे. अर्थातच या निर्णयाचे महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता संभवते.  मोदी व फडणवीस सरकारचा घसरता आलेख पाहता सेनेसोबत भाजपालाही स्वबळाचा फटका बसू शकतो. शिवसेनेची स्थापना झाली, ती प्रामुख्याने मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी. या माध्यमातून राज्याच्या विविध भागांत, गावागावांत शिवसेनेचा विस्तार झाला. त्यानंतरच्या टप्प्यात सेनेने ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार केला. या मुद्दय़ावरच भाजपा व सेना 1984 मध्ये सर्वप्रथम एकत्र आले. तर 1989 पासून या दोन पक्षांमध्ये खऱया अर्थाने युती पर्व सुरू झाले. या बळावरच 1995 मध्ये युतीचे सरकारही महाराष्ट्रात सत्तेवर आले. सत्ता गमावल्यानंतरही ही युती कायम राहिली होती. मात्र, 2009 पासून सुरू झालेल्या बदलत्या समीकरणांतच ही युती भंगण्याची बीजे रोवली गेली, असे म्हणता येईल. वास्तविक युतीच्या जन्मापासून सेना मोठय़ा भावाच्या भूमिकेत वावरलेली. मात्र, 2009 च्या निवडणुकीत भाजपाने 46 जागा पटकावल्या, तर सेनेला 44 जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद सेनेला गमवावे लागले. तरीदेखील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दराऱयामुळे ज्येष्ठत्वाचा मान पक्ष टिकवून होता. मागील विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरून मतभेद झाल्याने 25 वर्षांची युती तुटली अन् दोन्ही पक्ष प्रथमच एकमेकांना भिडले. मोदी लाटेमुळे भाजपाने या निवडणुकीत सर्वाधिक 122 जागा पटकावल्या तर 63 जागा पटकावत सेनेनेही चमकदार कामगिरी केली. भाजपा विरूद्ध शिवसेना असाच हा सामना झाल्याचे दिसून आले. आता स्वबळातून पुन्हा हीच स्टॅटेजी वापरण्याचा मनसुबा नाही ना, अशी शंका घ्यायला नक्कीच जागा आहे. पण आता पुलाखालून बरेच पाणी वाहिले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. 15 वर्षांचा सत्ताकाळ, भ्रष्टाचाराचे प्रकरणे यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीबाबत मोठी नाराजी होती. त्यात मोदी लाटेमुळे युतीकरिता एक भुसभुशीत भूमी तयार झाली होती. त्यातूनच या निवडणुकीत सबंध फोकस आपल्यावरच ठेवण्यात दोन्ही पक्ष यशस्वी ठरल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीला सपाटून मार खावा लागला. आता मोदींची लाट ओसरली असून, लोकप्रियतेलाही ओहोटी लागल्याचे दिसत आहे. जलयुक्त शिवारचा काही प्रमाणात अपवाद वगळता मागच्या 3 वर्षांतील सरकारची कामगिरीही फारशी समाधानकारक नाही. दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांना गृहखात्याचा कारभार नीट सांभाळता आलेला नाही. भीमा कोरेगाव प्रकरणामुळे यावर झगझगीत प्रकाशच पडलेला आहे. सरकारमधील मंत्र्यांनीच आता पुन्हा सरकार सत्तेवर येईल, असे वाटत नसल्याकडे लक्ष वेधले आहे. त्यामुळे 2014 चा फॉर्म्युला 2019 मध्ये चालेलच असे नाही. नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांनी मिळवलेले यश, मोदींचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये काँग्रेसने मारलेली मजल, हे पाहता विरोधकांमध्ये उत्साह संचारला आहे. दुसऱया बाजूला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांनी समविचारी पक्षांनी एकत्र यावे, अशी साद घातली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हेदेखील आघाडीसाठी अनुकूल दिसतात. याचा विचार करता हे दोन पक्ष पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाल्यास मतविभाजनाचा सर्वाधिक लाभ काँग्रेस व राष्ट्रवादीला होऊ शकेल. भाजपा व शिवसेनाही मागीलप्रमाणे निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र येऊ शकतील. मात्र, या दोन पक्षांना 100 जागांपर्यंतच मर्यादित ठेवण्यात विरोधकांना यश आले, तर सत्तापरिवर्तन शक्य आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र होणार, अशीही सध्या चर्चा आहे. त्याचाही निकालावर परिणाम होऊ शकतो. मागील लोकसभा निवडणुकीत सेना व भाजपाने एकत्र निवडणूक लढली होती. या निवडणुकीत सेनेने 18 जागांवर, तर भाजपाने 22 जागांवर बाजी मारली होती. युती तुटली, तर दोन्ही पक्षांना इतके निर्भेळ यश मिळण्याची सूतराम शक्यता नाही. भाजपाचे खासदार संजय काकडे म्हणतात, त्याप्रमाणे यात सेनेचे अधिक नुकसान होईल, यात शंका नाही. किंबहुना, भाजपालाही याची झळ बसेल. आपला विस्तार व्हावा, असे प्रत्येक पक्षाला वाटते. अर्ध्याहून अधिक भारत व्यापलेल्या भाजपानेही सध्या पक्षविस्तार अधिकाधिक व्यापक करण्याचा चंग बांधला आहे. एकेकाळी प्रादेशिक पक्षांशी जुळवून घेत राजकारण करणाऱया या पक्षाला भविष्यात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत स्वतंत्रपणे राजकारण करायचे आहे, हे आता लपून राहिलेले नाही. भाजपाची ही नीती मागील निवडणुकीपासून सेनेला चांगलीच कळून चुकली असेल. म्हणूनच आपल्या अस्तित्वासाठीही त्यांना स्वतंत्र बाण्याची आवश्यकता वाटली असावी. भाजपाशी युती केल्यामुळे सेना सडली, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात. खरे-खोटे दोघांनाच माहीत. मात्र, सेनेच्या सहकार्याने भाजपा महाराष्ट्रात फोफावला, ही वस्तुस्थिती आहे. किंबहुना, केवळ स्वबळाचे नारे देऊन भागणार नाही. तर निश्चित अजेंडा समोर ठेऊन रणांगणात उतरावे लागेल. फक्त हिंदुत्वाचा मुद्दा सेनेला तारू शकत नाही, हे मागील निवडणुकीनेही दाखवून दिले आहे. भाजपा हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे हा मुद्दा विचारात घेऊन मतदान करायचे झाल्यास मतदार स्वाभाविकपणे भाजपालाच अधिक पसंती देतील, हे वेगळे सांगायला नको. दुसऱया बाजूला शिवसेनेच्या नेतेपदी आदित्य ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे. भविष्यातील स्थिती अधिक आव्हानात्मक असल्याने आदित्य यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. सत्तेसाठी भाजपाशी तडजोड करणाऱया, मनाजोगती खाती वा अधिकार न मिळाल्याने विरोधी पक्षाच्या आवेशात वावरणाऱया अन् आता स्वाभिमान जागा झालेल्या आपल्या सेनेला ते विजयपथावर नेऊन ठेवतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Related posts: