|Friday, February 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » दहशतवाद, वातावरण बदल गंभीर धोके

दहशतवाद, वातावरण बदल गंभीर धोके 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दावोस येथे प्रतिपादन, एकत्र येण्याचे आवाहन

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

दहशतवाद, वातावरण बदल आणि जागतिकीकरण विरोध हे आज जगासमोरचे तीन महत्वाचे धोके आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते मंगळवारी दावोस आर्थिक परिषदेत प्रमुख भाषण करत होते. हे धोके टाळण्यासाठी भारताने ठोस पावले उचलल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.

दहशतवाद हा सर्वात गंभीर धोका आहे. काही देश त्यात चांगला दहशतवाद आणि वाईट दहशतवाद असा फरक करतात. त्यामुळे त्याचा धोका अधिकच वाढतो. तरुणही कट्टर धार्मिकतेकडे आकर्षित होताना दिसतात. ही दुःखदायक बाब आहे. वातावरणात होणाऱया बदलांमुळे निसर्गचक्र बदलले आहे. याचा फटका कृषीक्षेत्रातला बसत आहे. काही देशांच्या जागतिकीकरण विरोधी भूमिकेमुळे मुक्त जागतिक व्यापारात अडथळे येत आहेत. सीमापार व्यापार आणि पुरवठा साखळी यांवर यामुळे परिणाम झाला आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

सहा पट वाढ

1997 मध्ये भारतीय पंतप्रधानांनी दावोसचा दौरा केला होता. त्यानंतर 30 वर्षांनी याची पुनरावृत्ती घडत आहे. 1997 पासून आतापर्यंत भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात सहा पट वाढ झाली असून ते साधारण 26 लाख कोटी रुपयांवरून 1 कोटी 60 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहचले आहे. भारताने गेल्या दोन वर्षात वस्तू-सेवा करासारख्या महत्वाच्या आर्थिक सुधारणा केल्या आहेत. 1 हजार 400 निरुपयोगी कायदे रद्द केले आहेत. याचा परिणाम म्हणून अर्थव्यवस्था गतिमान होत असून जागतिक संस्थांनीही विकासदर सर्वाधिक राहणार असल्याची भाकिते व्यक्त केली आहेत, असे अनेक मुद्दे त्यांनी मांडले.

आर्थिक परिषदेच्या या सत्राचा प्रारंभ अध्यक्ष क्लाऊस चेवाब यांनी केला. यांनी भारताची भलावण केली. मोदींच्या नेतृत्वातील भारत गतिमानता, सकारात्मकता आणि उद्योजगता यांचे चमकदार प्रतीक बनला आहे, अशा शब्दात त्यांनी भारताची स्तुती केली. मोदींच्या आधी स्वित्झर्लंडचे अध्यक्ष अलाईन बेरसेट यांचे भाषण झाले. प्रगतीत सातत्य राखायचे असेल तर 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि बहुविधता या संकल्पना वर्धिष्णू व्हाव्या लागतील, असा मुद्दा त्यांनी मांडला.

कंपनी अधिकाऱयांची भेट

परिषदेसमोर भाषण करण्यापूर्वी मोदींनी जगभरातून आलेल्या मान्यवर कंपनी अधिकाऱयांशी संवाद साधला. भारतात व्यवसायाची उत्कृष्ट संधी आहे. याचा लाभ घेऊन भारतात गुंतवणूक करावी, असे आवाहन त्यांनी केले.

आरोग्यम् धनसंपदा…

चांगली प्रकृती आणि उत्तम धन कमवायचे असेल तर भारतासारखे दुसरे स्थान नाही. आर्थिक सुधारणा कार्यक्रमामुळे आता विदेशी गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. सरकारी लाल फितीची जागा गुंतवणूकदारांच्या स्वागताने घेतली आहे. याचा लाभ उद्योगपतींनी उठवावा आणि भारतात मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करून तंत्रज्ञान आणावे असे आवाहन त्यांनी केले.

मोदी, ट्रम्प भेट शक्य

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांची दावोस येथे येत्या दोन दिवसात भेट होणे शक्य आहे. ट्रम्प यांचेही परिषदेसमोर भाषण होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेते एकमेकांची भेट घेऊन सहकार्य वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

Related posts: