|Sunday, January 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » महसूलमंत्र्यांच्या निवासस्थानावर धडक मोर्चा

महसूलमंत्र्यांच्या निवासस्थानावर धडक मोर्चा 

महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते आणि पोलिसांत झटापट

प्रतिनिधी/कोल्हापूर

गोकाक येथील एका खासगी कार्यक्रमात कर्नाटकचे गेडवे गाणाऱया महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानावर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी धडक मोर्चा काढून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. काळे झेंडे घेऊन प्रचंड घोषणाबाजी करत महसूलमंत्री पाटील यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱया समितीच्या कार्यकर्त्यांना यावेळी पोलिसांनी रोखले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात झटापट झाली. चंद्रकांत पाटील यांचा निषेध करत कार्यकर्त्यांनी ‘रहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेल मे’, ‘निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, अशा घोषणा देत संभाजीनगर परिसर दणाणून सोडला. अखेर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सुटका केली. दरम्यान, या आंदोलनामुळे संभाजीनगर परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

    महसूलमंत्री तथा सीमाप्रश्नाचे समन्वयमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गोकाक येथील एका कार्यक्रमात जन्माला यावे तर कर्नाटकात अशा आशयाचे गाणे गात काढून कर्नाटकचे गुणगान गायिले होते. त्यानंतर सिमावासियांत संतापाची लाट उसळली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या या कर्नाटकप्रेमाचा सीमाभागासह महाराष्ट्रातून निषेध केला जात आहे. सीमाभागातील कार्यकर्त्यांतून तर संताप व्यक्त होत असताना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली जात आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि समितीच्या युवा आघाडीच्या वतीने मंगळवारी महसूलमंत्री पाटील यांच्या कोल्हापूरातील संभाजीनगर परिसरातील नाळे कॉलनीतील निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.  या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री पाटील यांच्या निवासस्थानासह नाळे कॉलनी आणि संभाजीनगर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

     दरम्यान, सकाळी 11. 30 वाजता महाराष्ट्र एकीकरण समिती आणि युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांचे कोल्हापुरात आगमन झाले. यामध्ये बेळगावच्या माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, विक्रम पाटील, मदन बामणे, सूरज कणबरकर, अमर येळळूरकर, रत्नप्रसाद पवार, श्रीकांत कदम, सागर कुंभार, पियुष हावळ, राजू मर्वे, सुनिल बाळेकुंद्री, संजय सांगावकर, अजित कोकणे, रुपा नावलेकर, संजय देवळे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश होता. संभाजीनगर बसस्थानकात समितीच्या कार्यकर्त्यांची वाहने पार्क करण्यात आली. याठिकाणी पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी समितीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा  करुन शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले. यानंतर कार्यकर्ते महसूलमंत्री पाटील यांच्या निषेधाच्या घोषणा देत आणि राजीनाम्याची मागणी करत संभाजीनगर मुख्य रोडवरुन हॉटेल समाधान जवळ आले. याठिकाणी पोलिसांनी बॅरिकेटस लावून कार्यकर्त्यांना अडवले. यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत मंत्री पाटील यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याची परवानगी मागितली. यानंतर पोलिसांनी त्यांना सोडून काही अंतरावर पुन्हा अडवले. यावेळी माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर आणि कार्यकर्त्यांनी पुन्हा आपण शांततेत आंदोलन करणार असून मंत्री पाटील आणि महाराष्ट्र शासनाला सीमावासियांच्या भावना कळण्यासाठी त्यांच्या निवासस्थानापर्यंत सोडण्याची मागणी केली. पण पोलीस अधीक्षक मोहिते यांनी कार्यकर्त्यांची ही मागणी साफ धुडकावून लावली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केली. सीमाप्रश्नाच्या लढय़ात हुतात्मा झालेल्या शहीदांची शपथ घेत मंत्री पाटील यांच्या निवासस्थानासमोर घोषणाबाजी करणार नाही, अशी ग्वाही पोलिसांना दिली. पण पोलीसांनी कार्यकर्त्यांना पुढे सोडले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत पोलिसांचे कडे तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि समितीच्या कार्यकर्त्यांत जोरदार झटापट झाली. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडण्याचा प्रयत्न केला. यामुळे  पोलिसांनी बळाचा वापर करत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळीही जोरदार झटापट झाली. त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांना पोलीस व्हॅनमधून पोलीस कवायत मैदान येथील अलंकार हॉलमध्ये नेण्यात आले. तेथे चर्चा झाल्यानंतर चहापान देऊन कार्यकर्त्यांना सोडून देण्यात आले. यावेळी विशेष पोलीस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते.

…..तर त्यांच्याकडे आणखी एक पुरावा होईल…

  सीमाप्रश्नी सुरू असलेल्या लढय़ामध्ये कोल्हापूर पोलीसांनी जर एकीकरण समितीच्या सदस्यांवर दडशाही करून त्यांना आंदोलनापासून रोखले तर महाराष्ट्रामध्येही आंदोलन दडपले जात असल्याचा संदेश जाईल. यामुळे कर्नाटक सरकारकडे आंदोलन रोखण्यास आणखी एक पुरावा होईल, यामुळे पोलीस प्रशासनाने सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनी पोलीस प्रशासनास केली.

कर्नाटक पोलीसांच्या लाठय़ा  खाल्ल्या, आता महाराष्ट्र पोलीसांचा  मार खाऊ

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानासमोर आंदोलनास पोलीसांनी परवानगी नाकारली. यामुळे कार्यकर्त्यांनी निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा चंग बांधला. सीमाप्रश्नासाठी आतापर्यंत कर्नाटक पोलीसांच्या लाठय़ा खाल्ल्या, आता महाराष्ट्र पोलीसांचा मार खाऊ अशा प्रतिक्रिया आंदोलकांनी व्य्

दादांनी असे बोलायला नको होते

पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे खासगी निवासस्थान असून याठिकाणी आंदोलन न करता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचे आवाहन केले. यावर कार्यकर्त्यांनी चंद्रकांतदादा आमच्या घरात येवून बोलून जातात, आम्ही त्यांच्या घरासमोर बोलल्यावर काय होते? अशी विचारणा केली. त्यांच्यासाठी बेळगावचा कुंदा आणल्याची टिपणी करत चंद्रकांतदादांनी असे बोलायला नको होते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Related posts: