|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पणजीत 27 पासून स्वरानंद संगीत संमेलन

पणजीत 27 पासून स्वरानंद संगीत संमेलन 

प्रतिनिधी/ म्हापसा

कला आणि संस्कृती खाते गोवा आणि इन्स्टिटय़ुट मिनेझिस ब्रागांझा यांच्या संयुक्त विद्यमाने पं. सुरेश हळदणकर, पं. मुकुंदबुवा मडकईकर ल मास्टर अच्युतराव रायकर यांच्या स्मरणार्थ दहावा स्वरानंद संगीत संमेलन शनिवार 27 व रविवार 28 रोजी इन्स्टिटय़ुट मिनेझिस ब्रागांझा सभागृह पणजी येथे होणार आहे, अशी माहिती स्वरानंदचे अध्यक्ष परेश रायकर यांनी म्हापसा येथे पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी उपाध्यक्ष चंद्रकांत वेर्णेकर, पिनाक चोडणकर, आनंद रायकर, गोविंद रायकर आदी उपस्थित होते. शनिवार 27 रोजी दुपारी 2.45 वाजता दिपप्रज्वलननाने पहिल्या सत्राला प्रारंभ होणार आहे.

3 वाजता 20 ते 45 या वयोगाटासाठी नाटय़गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धकांनी आपल्या आवडीची 3 नाटय़गीते आयोजकांकडे सादर करावीत. त्यातील कोणतेही एक गाणे स्पर्धेला सादर करण्याची संधी देण्यात येईल. प्रथम विजेत्या तीन स्पर्धकांना अनुक्रमे 10 हजार, 7 हजार व 5 हजार रुपये तसेच तीन उत्तेजनार्थ क्रमांकांना अनुक्रमे 3000, 2000 व 1500 रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. विजेत्या स्पर्धकांना दुसऱया दिवशीच्या संमेलनात गीत सादर करण्याची संधीही देण्यात येईल.

रविवार 28 रोजी दुसऱया सत्राला प्रारंभ होणार आहे. सकाळी 9.30 वाजता पद्मश्री प्रसाद सावकार यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात येईल. कालिका संगीत विद्यालयातर्फे स्वागतगीत सादर केले जाईल. सकाळी 10 वाजता संदेश खेडेकर यांचे शास्त्रीय गायन, सकाळी 11 वाजता चारुदत्त गावस यांचे संवादिनीवादन, दुपारी 12.15 वाजता कौस्तुभकांती गांगुली (मुंबई) यांचे शास्त्रीय गायन होणार आहे.

दुपारी 3 वाजता नाटय़गीत गायन स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांची नाटय़गीत गायन मैफील, 4.15 वाजता मिलिंद रायकर गोवा यांचे व्हायोलिनवादन, सायं. 5 वाजता सुधाकर करंदीकर पर्वरी, रवींद्र शिवा चोडणकर (शिवोली) व विठ्ठल खांडोळकर (ताळगाव) यांचा जलस्रोतमंत्री विनोद पालयेकर यांच्या हस्ते सत्कार होणार आहे. मिनेझिस ब्रागांझाचे चेअरमन संजय हरमलकर, ऍड. सरेश लोटलीकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित असतील.

सायं. 6.30 वाजता रमाकांत गायकवाड (मुंबई) व यज्ञेश मिलिंद रायकर यांच्यात शास्त्रीय गायनाची जुगलबंदी होईल. त्यांना साथसंगत पांडुरंग गावस, प्रसन्न साळकर, दिलीप गडेकर, आनंद रायकर, गोरख मांद्रेकर करणार आहेत. सुदन फडते या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत. संगीतरसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन स्वरानंदचे अध्यक्ष परेश रायकर यांनी केले आहे.

Related posts: