|Sunday, January 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » हेल्मेटसक्तीच्या अंमलबजावणीस प्रारंभ

हेल्मेटसक्तीच्या अंमलबजावणीस प्रारंभ 

प्रतिनिधी/ बेळगाव

संपूर्ण राज्यभरात हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी कठोरपणे करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. बेळगावच्या पोलीस यंत्रणेनेही याची घोषणा केली. मंगळवारपासून कारवाईस प्रारंभ झाला आहे. यामुळे हेल्मेट हे स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आहे असे मानणाऱया व्यक्तींकडून सकारात्मक प्रतिक्रिया ऐकावयास मिळत आहेत. याच बरोबरीने वाढत्या धकाधकीच्या जीवनात पडलेली हेल्मेटची वाढीव भर अनेकांचे चेहरे त्रासिक करून जावू लागली आहे. फक्त हेल्मेट नव्हे तर आयएसआय मार्क हेल्मेट आवश्यक असल्याचा दंडक लावण्यात आल्याने सध्या तरी साधे हेल्मेट डोक्मयावर असले तरी दंड भरावा लागत आहे.

दुचाकी चालविताना हेल्मेट वापरणे बंधनकारक हा सर्वोच्च न्यायालयाचाच निकाल असल्याने त्यावर आक्षेप घेण्याचे धाडस कोणालाही कायदेशीर भाषेत करता येत नाही. वाढत्या अपघातांवर आणि त्यामध्ये मोटारसायकल स्वार आणि पाठीमागे बसणाऱयांच्या वाढत्या मृत्यूंवर हेल्मेट हा चांगला पर्याय ठरू शकतो, हे जागरुक नागरिकांना कळते आहे. याचवेळी बाजारपेठेत खरेदी करताना पिशवी सांभाळू की हेल्मेट असा प्रश्न महिलांमध्ये निर्माण झाला आहे. फिरतीची कामे करणाऱयांना हेल्मेट अडचण ठरू लागली असून अडचण म्हणून हेल्मेट न घातल्यास दंडांचा सामना करावा लागत आहे.

बेळगाव पोलीस आयुक्तालयाने मंगळवारपासून कारवाईसत्राला प्रारंभ केला आहे. फक्तच रहदारी पोलीस नव्हे तर इतर पोलीस स्थानकांनाही आयएसआय मार्क हेल्मेटसक्तीच्या अंमलबजावणीसाठी आयुक्तालयाने रस्त्यावर उतरविले. यामुळे जिकडे पाहावे तिकडे तपासणी करणारे पोलीस अशी अवस्था दिसून आली. यापूर्वी डोक्मयावर हेल्मेट असले की पोलीस सोडत होते. मात्र यावेळी ते साधे आहे की आयएसआय मार्क याचीही पाहणी सुरू झाल्याने डोकेदुखीत वाढ झाली आहे.  एक तर हेल्मेट वापरायचे किंवा दंड भरत सुटायचा, अशी वेळ नागरिकांवर आली आहे.  

कर्नाटक सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची बाजू पुढे करून अचानक सक्तीचे धोरण राबविले आहे. यावरूनही सध्या वेगवेगळे संशय व्यक्त होत आहेत. हेल्मेटसक्ती हे राजकीय व्यक्ती आणि हेल्मेट कंपन्या यांच्यामधील साटय़ालोटय़ाचा भाग तर नाही ना? हा यामधील सर्वात प्रमुख संशय आहे. यापूर्वीच्या अनेक अनुभवांनुसार वेगवेगळ्या मोसमांप्रमाणे अधूनमधून हेल्मेटचाही मोसम येतो आणि जातो. यामुळे यावेळी कडक अंमलबजावणी होणार की हेल्मेट खपासाठी काढलेल्या आदेशाचा कालांतराने फार्स ठरणार? असे प्रश्नही निर्माण होऊ लागले आहेत. सध्या रस्त्यावर हेल्मेट विकणारी मंडळी गायब झाली असून आयएसआय मार्क हेल्मेट तयार करणाऱया कंपन्यांच्या मार्केटिंगसाठी हा नवा मार्ग शोधण्यात आल्याचा आरोपही होत आहे.

अपघात होऊ नयेत म्हणून रहदारीच्या समस्या सोडविण्यासाठी वाढीव पोलीस दल व इतर उपाय राबविता येतात. चांगले रस्ते, रहदारीच्या नियमांची अंमलबजावणी आदींकडे प्रशासनाने लक्ष द्यायला हवे, असे नागरिकांना वाटते. मात्र साधे अल्प किमतीचे हेल्मेट अपघातात कुचकामी ठरते. यामुळे एक वेळ अपघात झाले तरी त्यामध्ये मृत्यू होऊ नये यासाठी दर्जेदार हेल्मेट वापरणे गरजेचे आहे. यावेळी सक्तीची अंमलबजावणी कठोरपणे केली जाईल, असे पोलीस आयुक्तालयाने स्पष्टपणे सांगितले आहे.

Related posts: