|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » उद्योग » सहा दिवसांच्या तेजीला ओहोटी

सहा दिवसांच्या तेजीला ओहोटी 

वृत्तसंस्था /मुंबई :

तंत्रज्ञान, वाहननिर्मिती, औषधनिर्मिती आणि सार्वजनिक बँक क्षेत्रांचे समभाग घसरल्यामुळे मुंबई शेअरबाजाराच्या सलग सहा दिवसांच्या तेजीला लगाम बसला आहे. गुरुवारी दिवसअखेर मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 111 अंकांनी घसरून 36050.44 अंकांवर बंद झाला. घसरण होऊनही 36 हजार पेक्षा अधिक पातळी त्याने कायम ठेवली. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टीनेही 11 हजाराची पातळी कायम राखण्यात यश मिळविले. दिवसअखेर हा निर्देशांक 16.30 अंकांनी घसरून 11069.70 अंकांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही किरकोळ घसरण दिसून आली.

1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यापूर्वी नफा कमाईचे प्रमाण वाढण्याची शक्मयता आहे. त्यामुळे अर्थसंकल्प सादरीकरणापर्यंत शेअरबाजारात चढउतार होत राहतील, असे तज्ञांचे मत आहे. अर्थसंकल्पात गुंतवणूकक्षम तरतुदी असल्यास त्यानंतर शेअरबाजारात सकारात्मक वातावरण दिसून येईल, अशीही शक्मयता आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरात आणखी वाढ झाली आहे. गुरुवारी ब्रेंट क्रूड ऑईलचा दर 71.20 डॉलर्स प्रतिबॅरलपर्यंत पोहोचला आहे. डिसेंबर 2014 पासूनचा हा उच्चांक आहे. तेल दरवाढीचा परिणाम आगामी काळात भारतातील शेअरबाजारांवरही दिसून येण्याची शक्मयता आहे.

गुरुवारच्या व्यवहारात पंजाब नॅशनल बँक, सिंडिकेट बँक, इंडियन बँक, बँक ऑफ बरोडा, स्टेट बँक आणि कॅनरा बँकेच्या समभागांमध्ये 5 ते 7 टक्के घसरण दिसून आली. तथापि, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक आणि ऍक्सिस बँक या खासगी बँकांच्या समभागांमध्ये 0.88 टक्के ते 2.3 टक्के वाढ झाली. माहिती-तंत्रज्ञान, वाहननिर्मिती, औषधनिर्मिती कंपन्यांच्या समभागांना 1 टक्क्मयाची घसरण सोसावी लागली. तथापि, धातूनिर्मिती कंपन्यांच्या समभागांची स्थिती सुधारली.

मारुती सुझुकी 1.66 टक्के तर डॉ. रेड्डीज लॅबच्या समभागांमध्ये 2 टक्के घसरण झाली. डॉ. रेड्डीज लॅब या औषध कंपनीने आपल्या नफ्यात 29 टक्के घट झाल्याचे म्हटले आहे. ही घट उत्तर अमेरिकेतील व्यवसायातील आहे. सर्वाधिक घसरण युपीएलच्या समभागांमध्ये झाली. ती 6.7 टक्के इतकी मोठी होती. टीसीएस, अदानी पोर्ट्स, अरबिंदो फार्मा, हिरो मोटर्स, इन्फोसिस आणि भारती एअरटेल यांनाही 1 ते 3 टक्के फटका बसला. तर लार्सन अँड टुब्रो, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट आणि गेल या कंपन्यांचे समभाग 1 ते 2 टक्के वधारले.

जागतिक क्षेत्रात आशियाई शेअरबाजारांमध्ये घसरण दिसून आली. अमेरिकेच्या डॉलरमध्येही घसरण झाली. युरोपियन शेअरबाजारांमध्ये जैसे थे परिस्थिती दिसून आली.