|Friday, July 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अमेरिकेची तुर्कस्तानला ताकीद

अमेरिकेची तुर्कस्तानला ताकीद 

वॉशिंग्टन / वृत्तसंस्था :

सीरियात अमेरिकेला भिडू नका, अशी ताकीद अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तुर्कस्तानला दिली आहे. याच्या उत्तरादाखल तुर्कस्तानने व्हाइट हाउसने प्रसारित केलेला संदेश योग्य नसून ट्रम्प यांनी अध्यक्ष एर्दोगन यांच्यासोबतच्या चर्चेत सीरियातील सैन्य कारवाई रोखण्याचा मुद्दा मांडला नसल्याचे म्हटले.

तुर्कस्तानचे सैन्य आणि वायूदल मागील 5 दिवसांपासून सीरियाच्या आफरीन भागात कुर्द वायपीजी जवानांच्या विरोधात कारवाई करत आहे. तुर्कस्तान या जवानांना कुर्द मिलिशियाचे समर्थक मानते. कुर्द मिलिशियाला तुर्कस्तानातील हिंसक कारवायांसाठी जबाबदार धरले जाते.

सीरियातील कुर्द वायपीजी जवानांनी बशर अल-असाद सरकारच्या विरोधात आघाडी उघडली आहे. त्यांना अमेरिकेचे समर्थन प्राप्त आहे. याचमुळे ट्रम्प यांनी सीरियात अमेरिकेच्या हितसंबंधांना हानी न पोहोचविण्याची ताकीद तुर्कस्तानला दिली. तुर्कस्तान अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो सैन्य आघाडीचा सदस्य देश आहे. तरीही तुर्कस्तानचे रशियासोबत अतिशय चांगले संबंध आहेत.

तुर्कस्तानचे सैन्य सीरियाच्या मनबिजमध्ये कारवाईची कक्षा वाढविणार असल्याचे एर्दोगन यांनी जाहीर केले. या अगोदर व्हाइट हाउसने वक्तव्य प्रसिद्ध करत ट्रम्प यांनी एर्दोगन यांच्याशी फोनवरून चर्चा करत सीरियात सैन्य कारवाई कमी करण्याचे आवाहन केल्याचे सांगितले.

अमेरिका आणि तुर्कस्तानचे सैनिक समोरासमोर ठाकण्याची स्थिती निर्माण करू नका असे ट्रम्प यांनी तुर्कस्तानला कळविले आहे. अमेरिकेचे जवळपास 2 हजार सैनिक सीरियात असून ते असादविरोधी जवानांना प्रशिक्षण, दारूगोळय़ाची मदत आणि व्यूहनीती आखून देण्यास मदत करत आहेत.