|Friday, January 18, 2019
You are here: Home » क्रिडा » सायना-सिंधू आमनेसामने

सायना-सिंधू आमनेसामने 

वृत्तसंस्था /जकार्ता :

सायना नेहवाल व पीव्ही सिंधू यांची इंडोनेशिया मास्टर्स बॅडमेंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत गाठ पडणार आहे. पी. कश्यपचे आव्हान मात्र संपुष्टात आले.

लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य मिळविलेल्या सायनाने केवळ 37 मिनिटांत जागतिक 20 व्या मानांकित चेन झियाओझिनचा 21-12, 21-18 असा पराभव केला तर सिंधूने मलेशियाच्या गोह जिन वेईचा 21-12, 21-9 असा धुव्वा उडवित आगेकूच केली. पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रनकिरेड्डी व चिराग शेट्टी यांनीही उपांत्यपूर्व फेरी गाठली असून त्यांनी दुसऱया फेरीत चिनी तैपेईच्या लियाओ मिन चुन व सु चिंग हेंग यांचा 21-17, 21-16 असा पराभव केला. पुरुष एकेरीत पी. कश्यपचे आव्हान मात्र संपुष्टात आले. मलेशियाच्या चाँग वेई फेंगकडून त्याला 18-21, 18-21 असा पराभव स्वीकारावा लागला.

सायना व सिंधू यांच्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर आतापर्यंत दोनदा गाठ पडली असून दोघींनी एकेकदा विजय मिळविला आहे. 2014 मध्ये सईद मोदी ग्रां प्रि गोल्ड स्पर्धेत सायनाने सिंधूचा पराभव केला होता तर सिंधूने गेल्या वर्षी इंडिया ओपन सुपर सिरीजमध्ये या पराभवाची परतफेड केली होती. गेल्या वर्षीच्या राष्ट्रीय स्पर्धेत मात्र सायनाने सिंधूला हरवून राष्ट्रीय जेतेपद मिळविले होते. याशिवाय प्रिमियर बॅडमिंटन लीगमध्येही त्या आमनेसामने आल्या आहेत. मागील वर्षी पीबीएल 2 च्या उपांत्य फेरीत सिंधूने सायनाला हरविले.

Related posts: