|Thursday, January 17, 2019
You are here: Home » क्रिडा » चौरंगी हॉकी मालिकेत भारत अंतिम फेरीत

चौरंगी हॉकी मालिकेत भारत अंतिम फेरीत 

तिसऱया लढतीत जपानवर 4-2 ने मात, आज जेतेपदासाठी बेल्जियमशी झुंजणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

चौरंगी हॉकी मालिकेतील दुसऱया सत्रात भारतीय हॉकी संघाने सलग तिसऱया विजयासह अंतिम फेरी गाठली. शनिवारी झालेल्या लढतीत भारताने जपानला 4-2 असे नमवले. भारतातर्फे विवेक प्रसाद, वरुण कुमार, मनदीप सिंग व रमणदीप सिंग यांनी प्रत्येकी 1 गोल करत विजयात मोलाची भूमिका बजावली. अंतिम फेरीत भारताची लढत ऑलिम्पिक रौप्यजेत्या बेल्जियमशी होईल.

चौरंगी हॉकी स्पर्धेतील भारताचा हा सलग तिसरा विजय ठरला. सामन्यातील 12 व्या मिनिटाला भारताच्या विवेक प्रसादने शानदार गोल करत 1-0 अशी आघाडी घेतली. मात्र लगेचच जपानच्या सेरेन तनाकाने गोल करत 1-1 अशी बरोबरी साधून दिली. यानंतर, 30 व्या मिनिटाला वरुण कुमारने पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवत भारताला पुन्हा 2-1 असे आघाडीवर नेले.

मध्यंतरानंतरही भारतीयांनी आपला आक्रमक धडाका कायम ठेवला. 43 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर शोटा यामादाने चेंडूला जाळय़ाची दिशा दाखवत जपानला 2-2 अशी बरोबरी साधून दिली. अखेरच्या सत्रात मात्र मनदीप सिंग व रमणदीप सिंग यांनी लागोपाठ गोल करत भारताला 4-2 अशी महत्वपूर्ण आघाडी घेऊन दिली. अखेरपर्यंत जपानला ही गोलबरोबरी साधण्यात अपयश आल्याने भारताने 4-2 अशा विजयासह अंतिम फेरीत प्रवेश केला.

 

Related posts: