|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » क्रिडा » आयपीएल लिलावात बेन स्टोक्सला साडेबारा कोटींची ‘लॉटरी’

आयपीएल लिलावात बेन स्टोक्सला साडेबारा कोटींची ‘लॉटरी’ 

स्टोक्स राजस्थान रॉयल्सशी करारबद्ध, केएल राहुलला 11 कोटी तर रशीद खानला 9 कोटींची किंमत

वृत्तसंस्था/ बेंगळूर

बहुतांशी वादांच्या केंद्रस्थानी राहिल्यानंतरही केवळ मैदानातील पराक्रमाच्या बळावर इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्स आयपीएल लिलावात सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला. राजस्थान रॉयल्सने त्याच्यासाठी सर्वाधिक साडेबारा कोटींची किंमत मोजली. स्टोक्ससाठी किंग्स इलेव्हन पंजाब व चेन्नई सुपरकिंग्स यांच्यातही चुरस रंगली. मात्र, अंतिमतः राजस्थान रॉयल्सने ऐनवेळी बाजी मारली. याशिवाय, केएल राहुल व मनीष पांडे यांना अनुक्रमे किंग्स इलेव्हन पंजाब व सनरायजर्स हैदराबाद यांनी प्रत्येकी 11 कोटी रुपयांना करारबद्ध केले.

अफगाणिस्तानचा लेगस्पिनर रशीद खान अरमानला सनरायजर्स हैदराबादने आरटीएम (राईट टू मॅच) कार्ड वापरत तब्बल 9 कोटी रुपयांची किंमत मोजत करारबद्ध केले. कर्नाटकचा मध्यफळीतील फलंदाज करुण नायरला किंग्स इलेव्हन पंजाबने 5.60 कोटी रुपयांची किंमत मोजली. महेंद्रसिंग धोनीचा ‘किंग टू मॅन’ समजला जाणाऱया केदार जाधव आपल्या अष्टपैलू खेळाच्या बळावर 7.80 कोटी रुपयांच्या बोलीचा मानकरी ठरला. त्याला धोनीच्याच चेन्नई सुपरकिंग्सने करारबद्ध केले. अर्थात, चेन्नईने रविचंद्रन अश्विनसाठी मात्र अजिबात बोली लावली नाही. अश्विनला किंग्स इलेव्हन पंजाबने 7.60 कोटी रुपयांना खरेदी केले.

टी-20 स्पेशालिस्ट संजू सॅमसनला राजस्थान रॉयल्सने 8 कोटी रुपयांना तर रॉबिन उत्थप्पाला कोलकाता नाईट रायडर्सने 6.4 कोटी रुपयांना करारबद्ध केले. कर्ण शर्मा (5 कोटी, चेन्नई), यजुवेंद्र चहल (6 कोटी, आरसीबी) व कुलदीप यादव (5.8 कोटी, केकेआर) या फिरकीपटूंनाही विविध प्रँचायझींनी विशेष महत्त्व दिले. अगदी राहुल तेवातियासारख्या नवोदित गोलंदाजासाठी देखी दिल्लीने 3 कोटी रुपये मोजले. यष्टीरक्षकांच्या यादीत दिनेश कार्तिक पुन्हा एकदा महागडा ठरला. त्याला केकेआरने 7.4 कोटी रुपयांची बोली लावली. वृद्धिमान साहासाठी सनरायजर्स हैदराबादने 5 कोटी रुपये मोजले. पार्थिव पटेलला मात्र खरेदीदार लाभला नाही.

चेन्नई सुपरकिंग्सने 2 कोटी रुपये मोजले असले तरी हरभजनला इथे फारसे महत्त्व दिले गेले नसल्याचे स्पष्ट झाले. स्टोक्ससाठी किंग्स इलेव्हन पंजाब व चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात चुरस होती. पण, यापूर्वी पुणे प्रँचायझीचा कर्णधारपद भूषवणारा स्मिथ त्याच्यासाठी इथे विशेष आग्रही होता आणि राजस्थान रॉयल्सने त्याच्या विनंतीला मान दिला.

अन्य विदेशी खेळाडूत मिशेल स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सने 9.60 कोटी रुपयांची बोली लावली. ग्लेन मॅक्सवेलला दिल्ली डेअरडेव्हिल्सने 9 कोटी रुपये मोजले व हा अष्टपैलू खेळाडू या संघात पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा खेळेल, ते स्पष्ट झाले. केकेआरने गौतम गंभीरसाठी पुन्हा इच्छा दर्शवली नाही व दिल्ली डेअरडेव्हिल्सने त्याच्यासाठी 2.80 कोटी रुपये मोजले. अष्टपैलू ख्रिस वोक्सला आरसीबीने 7.40 कोटी रुपयांना करारबद्ध केले.

विंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल, इंग्लिश कसोटी कर्णधार जो रुट, इशांत शर्मा व मुरली विजय हे दिग्गज मात्र आश्चर्यकारकरित्या ‘अनसोल्ड’ राहिले. दिल्लीला गौतम गंभीरसाठी फारशी किंमत मोजली नसली तरी या संघाचे कर्णधारपद त्याच्याकडे भूषवले गेले तर त्यात आश्चर्याचे कारण असणार नाही.

युवराजसाठी किंग्स इलेव्हन पंजाबने 2 कोटी रुपये तर सीएसकेने डेव्हॉन ब्रेव्होसाठी 6.40 कोटी रुपये मोजले. केरॉन पोलार्डसाठी मुंबई इंडियन्सने आरटीएम कार्ड वापरत 5.40 कोटी रुपयांना त्याला करारबद्ध केले. सनरायजर्स हैदराबादने शिखर धवनला 5.2 कोटी रुपयांच्या किंमतीसह पुन्हा संघात घेतले. फॅफ डय़ू प्लेसिसला केवळ 1.60 कोटी रुपयात करारबद्ध करता आल्याने चेन्नईचा संघ बराच सुदैवी ठरला. राजस्थान रॉयल्सने आरटीएम कार्ड वापरत अजिंक्य रहाणेला 4.60 कोटी रुपयात करारबद्ध केले. केन विल्यम्सनला सनरायजर्स हैदराबादने 3 कोटी रुपयात पुन्हा संघात घेतले.