|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » इंद्रधनुष्य सन्मानाचे वितरण

इंद्रधनुष्य सन्मानाचे वितरण 

जय प्रभू, सिमरन गौंडळकर आणि निनाद हलगेकर ठरले मानकरी

प्रतिनिधी/ बेळगाव

इंद्रधनुष्य संस्थेतर्फे देण्यात येणाऱया ‘इंद्रधनुष्य सन्मान’ पुरस्कारांचे वितरण प्रजासत्ताक दिनी आयोजित विशेष समारंभात करण्यात आले. येथील मराठा मंदिरच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी विशेष अतिथी म्हणून निवृत्त मेजर जनरल के. एन. मिरजी हे उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय स्तरावर योगासन स्पर्धेत सहभागी होऊन दोन सुवर्णपदके मिळविलेला योगपटू जय प्रभू, विशेष मुलांच्या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केलेली खेळाडू सिमरन गौंडळकर, एनसीसीमध्ये सर्वोत्कृष्ट छात्र असा सन्मान मिळविणारा निनाद मिलिंद हलगेकर हे तिघे इंद्रधनुष्य पुरस्काराचे प्रथम तीन मानकरी ठरले. अन्य सात जणांचाही सन्मान यावेळी करण्यात आला.

या कार्यक्रमाप्रसंगी निवृत्त मेजर जनरल के. एन. मिरजी यांचे ‘आपण सुरक्षित आहोत का?’ या विषयावरील व्याख्यान उद्बोधक ठरले. त्यांनी देशाच्या संरक्षणविषयक मुद्दय़ांचा परामर्ष घेतला. भारतीय लष्कर सामर्थ्यशाली आहे. या लष्कराच्या सतर्कतेमुळे आपल्या देशाची सुरक्षाव्यवस्था भक्कम आहे. तसेच अलीकडच्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे संबंध आणि जगातील इतर राष्ट्रांसमोर आपली प्रतिमा सुधारणेचे पर्वही विकसित झाले आहे. याचा देशाला अधिक लाभ झाला आहे. दहशतवादाच्या विरोधातील लढा उभा करताना देशाच्या नागरिकांनी आपले योगदान देण्याची गरजही त्यांनी मांडली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला केएलई स्कूल ऑफ म्युझिकतर्फे स्वागतगीत सादर करण्यात आले. तसेच ‘वंदे मातरम्’ कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी कार्यक्रमाच्या संयोजनासाठी इंद्रधनुष्य परिवारातील सदस्यांनी परिश्रम घेतले.