|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » भवानीनगर भुयारी रेल्वे मार्गासाठी खा.शेट्टींचा निर्वाणीचा इशारा

भवानीनगर भुयारी रेल्वे मार्गासाठी खा.शेट्टींचा निर्वाणीचा इशारा 

धनंजय राजहंस/ भवानीनगर

वाळवा तालुक्यातील भवानीनगर येथील भुयारी रेल्वे मार्गाचा प्रश्न व सोडविता रेल्वेने पुणे-मिरज मार्गाचे विस्तारीकरण करुन दाखवावेच असा निर्वाणीचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी रेल्वे प्रशासनाला मिरज येथे दिला.

गेली 60 ते 70 वर्षे अनेक लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासने आणि गोड बोलण्याने भुलवून लोंबकळत ठेवलेला भवानीनगर येथील भुयारी रेल्वे मार्गाचा प्रश्न सोडविण्यासाठी खा.शेट्टी यांच्यासह भवानीनगर रेल्वे क्रॉसिंग गेट कृती समितीने 13 फेब्रुवारी पर्यंत प्रश्न न सोडविल्यास रेल रोको, रेल्वेचे विस्ताकरणाचे काम बंद असा आंदोनाचा इशारा दिला आहे. मिरज येथे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के.शर्मा, पुणे विभागाचे रेल प्रबंधक मिलिंद देऊसकर यांनी लोकप्रतिनिधीच्या मागणीकडे दुर्लक्ष करतानाच उडवाउडवीचे उत्तर देताच ‘मी पंतप्रधान मोदींना घाबरत नाही’, तर तुम्ही कोण, असा सज्जड दम देत प्रश्न न सोडविता काम करुन दाखवाच, असा इशाराही त्यांनी दिला. एखादे काम तडीस नेण्यासाठी लोकप्रतिनिधी कसा असावा यांचे उदाहरण त्यांनी जनतेला दाखवून दिले.

ब्रिटीशकालीन रेल्वे स्थानक असणाऱया भवानीनगर रेल्वे स्थानकालगत असणाऱया अरुंद आणि कमी उंचीच्या पुलामुळे रेल्वे लाईनच्या वरील शेतकऱयांस ऊस वाहतुकीबरोबरच कोणतेही मोठे वाहन नेता येत नाही. भवानीनगर, बिचूद, येडेमच्छिंद्र, रेठरेहरणाक्ष, शिरटे, लवंडमाची, नृसिंहपूर या गावातील ग्रामस्थांना कडेगाव, विटा येथे जाण्यास अतिशय सोयीचा आणि जवळच्या मार्ग असल्याने दुचाकी अथवा जीप, कारसाठीसारखी लहान चार चाकी वाहने गणेशखिंड मार्गे वाहतूक करीत असतात.

अरंद पुलामुळे येथून मोठी वाहने जावू शकत नाहीत. 15 ते 20 किलोमिटर जास्त अंतर ओलांडून ग्रामस्थांना विटा-कडेगाव येथे जावे लागत असून भवानीनगर येथे रेल्वे क्रॉसिंग गेट व्हावे, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱयांची आहे. या मागणीसाठी रास्ता रोको, गाव बंद, रेल रोको या सारखी आंदोलने करीत असतानाच रेल्वे मंत्री, रेल्वेचे वरिष्ठ अधिकाऱयांना निवेदन देणे याबरोबरच लोकप्रतिनिधीच्याकडे सततचा पाठपुरावा करुन देखील गेली 60 ते 70 वर्षे फक्त आश्वासनाशिवाय ग्रामस्थांच्या हाती काहीच पडले नाही.

सध्या पुणे-मिरज ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण व विद्युतीकरणाचे काम सुरु आहे. ‘आत नाही, तर परत कधीही नाही’ हे ओळखून भवानीनगर रेल्वे गेट कृति समितीचे निमंत्रक उद्योगपती रघुनाथराव मोहिते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सयाजीराव मोरे यांनी दि. 11 जानेवारी रोजी कराड-तासगाव रास्ता रोको करत रेल प्रशासनाला 12 फेंबुवारीची इशारा नोटीस दिली.

एकूणच या भुयारी रेल्वे मार्गाचा अंतिम अंक सुरु झाला असून ग्रामस्थांनी साथ दिल्यास ही मागणी पूर्ण होणार असून खा.शेट्टी यांच्यासह उद्योगपती मोहिते, मोरे, सुनिल सावंत, रमाकांत कुलकर्णी, शंकर चव्हाण, बाबा पाटील, सुनिल मोहिते, संपत मोहिते, रोहित मोहिते यासाठी प्रयत्नशील आहेत.