|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » सीढियाँ शुरू हो गई हैं…

सीढियाँ शुरू हो गई हैं… 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वादाशिवाय पार पडले, तर तीच बातमी असते! वाद नसले, तर त्यात रंगत येत नाही. अलीकडे तर फारशी लोकमान्यता नसलेले लोक संमेलनाध्यक्ष होतात अन् मग गर्दी जमवण्यासाठी आयोजकांना कोणीतरी बडा नेता वा परभाषिक साहित्यिक आणून संमेलनाची आकर्षकता वाढवावी लागते. खरं तर आजकाल मराठी साहित्य संमेलनापेक्षा टाइम्स लिटफेस्ट वा जयपूर फेस्टिव्हल (जेएलएफ) आशय-विषयाच्या दृष्टीने शंभर पटीने सरस असतात. त्यामध्ये साहित्य-नाटय़-नृत्य-संगीत-समीक्षा-पत्रकारिता यातले देश विदेशांतील दिग्गज उपस्थित असतात. देश-विदेशातील समकालीन राजकीय-सामाजिक-साहित्यिक प्रवाहांचा त्यात मागोवा घेतला जातो. त्या तुलनेत आपलं मराठी साहित्य संमेलन एका चाकोरीतच अडकलं आहे. परंतु ‘जेएलएफ’मध्येही वादंग होत नाहीत, असं थोडंच आहे…मागे सलमान रश्दी यांना आमंत्रित करण्यात आलं असूनही, देवबंद मदरशाचे मौलाना अब्दुल कासिम नोमानी यांनी रश्दींच्या तेथील  सहभागास विरोध करण्याचं आवाहन भारतीय मुसलमानांना केलं होतं. खरं तर रश्दी तेव्हा व्हिडिओ लिंकद्वारे जयपूर महोत्सवातील उपस्थित प्रेक्षकांशी संवाद साधणार होते. मात्र रश्दी यांचा व्हिडिओ लिंकवरील संवादही होऊ देणार नाही, अन्यथा हिंसक निदर्शनं होतील, अशी धमकी देण्यात आली आणि रश्दींचा आवाज दाबण्यात आला.

आणखी एकदा अशोक वाजपेयी, उदय प्रकाश व के. सच्चिदानंदन या साहित्यिकांनी देशातील वाढत्या असहिष्णुतेचा निषेध करून पुरस्कार परत केल्यामुळे त्यांना महोत्सवात बोलावण्यात आलं नाही. एका वषी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मनमोहन वैद्य व दत्तात्रेय होसबाळे यांना ‘जेएलएफ’मध्ये आमंत्रित करण्यात आलं. त्यांचं राजकीय-सामाजिक कार्य असलं, तरी त्यांचा साहित्याशी कोणताही संबंध नाही, या कारणाने साहित्यप्रेमींच्या भुवया उंचावल्या गेल्या. पाच वर्षांपूर्वी समाजशास्त्रज्ञ आशिष नंदी यांनी दलित-ओबीसींबद्दल महोत्सवात व्यक्त केलेल्या मतामुळे तीव्र नाराजी निर्माण झाली. या वषी प्रसिद्ध गीतकार व कवी, जाहिरातपटू आणि सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांना ‘जेएलएफ’मध्ये आमंत्रित करण्यात आलं होतं. परंतु ‘पद्मावत’ चित्रपटास सेन्सॉर बोर्डाने मंजुरी दिल्यामुळे करणी सेना संतप्त झाली. जयपूरमध्ये पाऊल टाकाल, तर याद राखा, अशी धमकी करणी सेनेने दिली. आपल्यामुळे महोत्सवाचा रसभंग होऊ नये यासाठी प्रसूनने तिथे न जाण्याचा निर्णय घेतला. तसं पहिलं तर, त्याने या प्रश्नात खूप सामंजस्याची भूमिका घेतली. चित्रपटाबद्दलचे आक्षेप विचारात घेतले. इतिहासकारांच्या सूचनांची दखल घेऊन ‘पद्मावत’मध्ये बदल सुचवले. प्रसंगांना कात्री लावली. तरीही करणी सेनेची असहिष्णुता इतकी टोकाची की, त्यांनी ज्याचा ‘पद्मावत’शी थेट कसलाही संबंध नाही, त्या प्रसूनलाच प्रवेशबंदी केली… आता तर करणी सेनेचे प्रमुख कवली यांनी संजय लीला भन्साळी यांच्या आईवर आम्ही चित्रपट बनवणार आहोत, अशी घोषणा करून आपली लायकी दाखवून दिली आहे. 

आपल्याकडच्या सर्व क्षेत्रांमधलं वातावरण कमालीचं प्रदूषित झालं आहे. राजकारण, द्वेषपूर्ण विचार, असमंजसपणा, विवेकहीनता यामुळे स्पष्ट भूमिका घेता येत नाही. घेतली, तर शाब्दिक वा शारीरिक हिंसा केली जाते. संवादाचा, सामंजस्याचा पवित्रा घेतला, तरी त्याचा काहीएक उपयोग होत नाही. तरीही भूमिका ही घ्यायलाच हवी, जशी ती गुणी अभिनेत्री स्वरा भास्करने घेतली आहे. ‘पद्मावत’ चित्रपटातून भन्साळी यांनी स्त्रीला केवळ तिच्या योनीशुचितेपुरतंच मर्यादित केलं आहे, अशी स्पष्ट व ठाम प्रतिक्रिया तिने ‘द वायर’ या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील लेखात व्यक्त केली आहे. ‘पद्मावत’ची ही बाजू तिने मांडली, हे कौतुकास्पदच.

यंदाचा ‘जेएलफ’ झाला 25 ते 29 जानेवारी दरम्यान. तर त्याचवेळी (27 ते 29 जानेवारी) पिंक सिटीत समांतर साहित्य उत्सव (पीएलएफ) झाला. साहित्याच्या बाजारीकरणाचा निषेध म्हणून आणि ‘जेएलफ’मध्ये ज्यांना स्थान नाही, अशा भारतीय लेखक-कवींना पर्याय म्हणून ‘पीएलएफ’ची सुरुवात झाली. पण समांतर झालं, म्हणून काय झालं, त्यात मतभेद होणार नाहीत, असं थोडंच आहे? कारण नामांकित कवी अशोक वाजपेयी (मध्य प्रदेशमधील ‘भार भवन’ नावारूपास आणलं ते त्यांनीच) यांनी ‘पीएलएफ’मधून अंग कढून घेतलं. कारण काय? तर समांतर साहित्य संमेलनाचे एक निमंत्रक कृष्णदेव कल्पित यांनी पूर्वी लेखिकांविषयी अत्यंत गर्हणीय उद्गार काढले होते. जेव्हा वाजपेयींनी महोत्सवाचं आमंत्रण स्वीकारलं, तेव्हा त्यांना या गोष्टीची माहिती नव्हती. ‘संयोजक एक ऐसा व्यक्ति है जो विशेषतः अन्य लेखिकाओं पर घोर अभद्रता और अश्लीलता की हद तक जाकर अत्यंत आपत्तिजनक टिप्पणियाँ करने के लिए बदनाम है’ असं वाजपेयी यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे.

अशोकजी हे ललित कला अकादमीचे अध्यक्ष राहिले आहेत. ते पूर्वी सनदी अधिकारी होते. ‘कहीं नहीं वहीं’ या काव्यसंग्रहाबद्दल त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार लाभला आहे. त्यांच्या पुस्तकांतून अशोकजींची साहित्य/कलासमीक्षा वाचायला मिळते. श्रीकांत महापात्र, केकी दारूवाला, जे. पी. दास, गोपीचंद नारंग, के. सच्चिदानंदन यांच्याप्रमाणे ते दिल्लीकेंद्रित साहित्य-सांस्कृतिक व्यवस्थेचं प्रतिनिधित्व करतात. मुशायऱयांमध्ये कविता सादर करताना वा समारंभातून बोलताना त्यांच्यातला सहृदय साहित्यिक रसिकांना पहायला मिळतो. त्यामुळे ‘पीएलएफ’वर बहिष्कार टाकण्याच्या त्यांच्या कृतीला महत्त्व आहे.

फक्त अशोक वाजपेयीच नव्हे, तर ज्ये÷ लेखक ओम थन्वी फेसबुकवर लिहितात- ‘अफसोस ही नहीं, देखकर कोफ्त होती है कि एक महिला कथाकार जिसने उनके उत्सव का हिस्सा बनने से मना कर दिया के बारे में प्रदेश प्रलेस (प्रगतिशील लेखक संघ) के गैर साहित्यकार महासचिव और उत्सव के ग्रस्त संयोजक कैसी भाषा का प्रयोग कर रहे हैं…’

गंमत म्हणजे कृष्णा कल्पित हे पूर्वी ‘जेएलफ’च्या आयोजनात सक्रिय होते. तिथे त्यांचं पटलं नसावं. पण आता ‘जेएलफ’ म्हणजे न्यू ईस्ट इंडिया कंपनी आहे, त्या कंपनीत व्यापारी हे व्यापारी म्हणूनच आले होते. पण ‘जेएलफ’मध्ये ते लेखकांच्या परिवेशात आले आहेत’ अशी टिप्पणी कृष्णा कल्पित यांनी केली आहे. त्यांच्या या दुहेरी नीतीवर बोट ठेवणाऱया थन्वी यांना ‘पीएलएफ’मधून अर्थातच कटाप करण्यात आलं आहे ! महाराष्ट्रात अ. भा. मराठी साहित्य संमेलन हा मुख्य प्रवाह मानला जाते. उलट या संमेलनास महत्त्व न देता ठिकठिकाणी मुस्लिम, गुराखी वगैरे विविध प्रकारच्या समाजघटकांची व प्रवाहांमधील लोकांची संमेलनं होतात. ज्यांना आजवर आवाज मिळाला नव्हता, व्यासपीठ प्राप्त नव्हतं झालं, त्यांना तिथे स्थान मिळतं. विद्रोही संमेलनं होतात. अर्थात त्यातही गटतट आहेतच. पण दिवसेंदिवस तथाकथित मुख्य धारेतल्या संमेलनाच्या मर्यादा स्पष्ट होत असताना, समांतर साहित्य प्रवाह खळाळत आहे. पूर्वी अ. भा. मराठी साहित्य संमेलनवाले या मंडळींची टवाळी करायचे. मात्र काही संमेलनाध्यक्षांनी समांतर/विद्रोहीवाल्यांचेही स्वागत केले. कधीतरी त्यांच्या संमेलनासही हजेरी लवली. मात्र पर्यायी साहित्य संमेलनांना अधिकाधिक मोकळे होऊ दिले पाहिजे. त्यात गटबाजी, क्षुद्र हेवेदावे नसावेत. मात्र राजकीय-सामाजिक-साहित्यिक भूमिकांवरून वाद झडलेच पाहिजेत. अशोक वाजपेयींनी मार्ग दाखवला आहे. लेखिकांची प्रति÷ा जपण्यासाठी त्यांनी कृती करून दाखवली आहे. मराठी लेखक भूमिका घेत नहीत, म्हणून अलीकडेच राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भूमिका खरंतर अनेकजण घेत आहेत. इतरांनीही ती घ्यावी, मगच ‘सीढियाँ शुरू हो गई हैं’ असं म्हणता येईल!