|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » यश मिळवणे प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क : स्वामी स्वरुपानंद यांचे प्रतिपादन

यश मिळवणे प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क : स्वामी स्वरुपानंद यांचे प्रतिपादन 

प्रतिनिधी/ फातोर्डा

जीवनात जे हवे ते मिळवा व आनंदी रहा. हेच जीवनाचे खरे यश आहे. यश मिळवणे हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे. त्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. शिक्षणातून ज्ञान मिळवा. फक्त गुण मिळवण्यासाठी शिकू नका. पालकांनीसुद्धा आपल्या पाल्यावर गुण मिळवण्यासाठी दबाव घालू नये. मुलांना आपल्या आवडीचे क्षेत्र निवडू द्यावे व त्यांना यश मिळवण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.

मुलांनी आवडीच्या क्षेत्रात चमक दाखवावी. मुलांनी स्वतःला कधी कमी लेखू नये. आपण काही करू शकणार नाही ही भावना सोडा व प्रयत्न करत रहा आणि उंची गाठा. एकदा उंची गाठली ही मागे वळून नका, यशाची पायरी चढत रहा. स्वतःबद्दल आत्मविश्वास बाळगा, कष्ट करण्याची तयारी ठेवा, जिद्दीने ध्यैय गाठा. शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या, जीवनात प्रेरणा मिळवा, आपली क्षमता ओळखा आणि यशस्वी व्हा, असा सल्ला चिन्मय मिशनचे मुख्य स्वामी स्वरुपानंद यांनी युवकांना दिला.

घोगळ गृहनिर्माण वसाहतमधील चिन्मय कृष्ण आश्रमात खास युवकांसाठी ‘आपली क्षमता ओळखा’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. पालकांसाठी ‘जीवनाचे व्यवस्थापन’ या विषयावर स्वामीचे व्याख्यान विद्या निकेतनमध्ये झालेल्या प्रवचनच्या वेळी आयोजित करण्यात आले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, पालन पोषण करणारे पालक खूप मोठे असतात. मुलांवर योग्य संस्कार माता-पित्यांकडून मिळतात. आमचा जीव म्हणजे इश्वराचा अंश आहे. मुले हे देवाची देणगी असते. संपूर्ण सृष्टी ही मुलांप्रमाणे असते, असे सांगताना स्वामी स्वरुपानंद यांनी हनुमानच्या पिता पवन आणि माता अंजनीची अनेक उदाहरणे दिली.

पालक चांगले गुण मुलांना देतात. देवाकडे पाहुन त्यांचे गुण समजून घ्यावे. शंकरापासून भक्ती करूणा मिळते. यशोदा ही यशाचे प्रतिक आहे, तर राधा कीर्ती आहे. पालकांकडे घरची जबाबदारी असते. पालकांमुळे घर सुरक्षित रहाते, असे ते म्हणाले. पालक म्हणजे देवाचे प्रतिकच असते, शिक्षणाने ज्ञान मिळते, ज्ञानामुळे उद्धार होतो. परंतु आज उच्च शिक्षण घेताना संस्काराचा विसर पडत चालला आहे, अशी खंत त्यांनी शेवटी व्यक्त केली.