|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पाक पंतप्रधानांशी बोलण्यास गनींनी दिला नकार

पाक पंतप्रधानांशी बोलण्यास गनींनी दिला नकार 

काबूल

 काबूलमध्ये मागील काही दिवसांमध्ये झालेल्या दोन हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचा हात असल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यांनंतर अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचे संबंध अत्यंत बिघडले आहेत. काबूल हल्ल्यांबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधन शाहिद खाकन अब्बासी यांनी अफगाणचे अध्यक्ष अशरफ गनी यांना फोन केला असता गनी यांनी त्यांच्याशी फोनवर संवाद साधण्यास नकार दिला. काबूलमध्ये या दोन हल्ल्यांमध्ये मिळून 143 जण मारले गेले होते. हे हल्ले पाकिस्तानी सैन्याने करविल्याचे आणि याचे पुरावे पाकिस्तानला पाठविल्याचा दावा अफगाणने केला आहे.

पाक पंतप्रधानांनी काबूल हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त करण्यासाठी फोन केला. शिष्टाचारानुसार अब्बासी यांनी फोन करण्याच्या अगोदर अफगाण अध्यक्षांच्या कार्यालयाला एक संदेश पाठविला. हा संदेश मिळताच गनी यांनी अब्बासी यांच्यासोबत संभाषण करण्यास स्पष्ट नकार दिला. या कृतीतून अफगाण अध्यक्षांनी पाकिस्तानबद्दल नाराजी व्यक्त केल्याचे मानले जाते.

पाकला पुरावे पाठविले

अफगाणच्या तपास यंत्रणांना दोन्ही हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआयचा हात असल्याचे महत्त्वपूर्ण पुरावे मिळाले आहेत. अफगाण सरकारने एक विशेष शिष्टमंडळ पाकिस्तानात पाठविले आहे. काबूलमध्ये झालेल्या दोन हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआयचा सहभाग दर्शविणारे पुरावे शिष्टमंडळ मांडणार आहे.