|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » माथाडी मंडळाचे विलिनीकरण मागे

माथाडी मंडळाचे विलिनीकरण मागे 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

राज्यातील 36 माथाडी मंडळाचे विलीनीकरण करून, एकच माथाडी मंडळ गठीत करण्यासाठी, अभ्यास गटाची नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ, महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सस्पोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या आदेशाप्रमाणे कोल्हापूर जिल्हा हमाल पंचायतसह इतर हमाल माथाडी संघटनेच्या माथाडी कामगारांनी मंगळवारी लाक्षणिक बंद ठेवून, आपला निषेध व्यक्त केला होता. याची दखल घेऊन, बुधवारी मुंबई येथे झालेल्या, बैठकीत विलीनीकरणाचे हे परिपत्रक  मागे घेण्याचे जाहीर केले.                                     या निर्णयामुळे कामगारांनी दुपारी जल्लोष केला.

      मुंबईत सहयाद्री अतिथीगृहामध्ये संबधित मंत्री व संघटना प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत 36 माथाडी मंडळाच्या विलीनीकरनाचा आदेश मागे घेण्यात आला आहे. अशी माहीती कोल्हापूर जिल्हा हमाल पंचायतीचे सेक्रेटरी कृष्णात चौगुले यांनी सांगितले. 

  शहरातील लक्ष्मीपुरी धान्यबाजार, शाहूपुरी ट्रान्स्पोर्ट परिसर, मार्केट यार्डसह  शासकीय गोदाम व रेल्वे गुडस् येथील हमाल, माथाडी कामगारांनी मार्केट यार्ड येथील माथाडी कामगारांच्या कार्यालयासमोर एकत्र येऊन, फटाके वाजवून, पेढे व साखर वाटप करून जल्लोष केला.  मंगळवारी झालेल्या बंदमुळे हातावर पोट असणाऱया हमालांना, एक दिवसाचा लाखो रूपयाचा आर्थिक फटका बसला होता.

राज्यात 50 वर्षापूर्वी माथाडी कायदा अस्तिवात आणून, माथाडी मंडळाची स्थापना करण्यात आली. या माथाडी मंडळांचे विलीनीकरण करून, कामगारांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशामध्ये विविध ठिकाणी माथाडी कायदा सुरू असताना, राज्य सरकार व कामगार विभाग ही मंडळे गुंडाळण्याचा डाव आहे. या निषेधार्थ मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माथाडी ,कामगारांनी निदर्शने करून, या परिपत्रकाची होळी केली होती. त्याचबरोबर मार्केट यार्ड येथे बाजार समिती कार्यालयासमोर निदर्शने केलु होती.

माथाडी कायद्यामुळे मापाडी कष्टकऱयांना प्रॉव्हीडंड फंड, बोनस, विमा, हे कायद्याने मिळू लागले आहे. याची काटेकोरपणे अंमलबजावणी न करता ,उलट हा माथाडी कायदा संपवण्याचा  प्रयत्न सरकार करू लागला आहे. या  निर्णयाला संघटनेंचा विरोध होता.

कोल्हापूर जिल्हा हमाल पंचायतीचे सेंक्रेटरी कृष्णात चौगले  यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी आण्णाप्पा शिंदे, गोरख लेंडवे, विनोद बोरे, गणपती पाटील, नितीन दळवी, सुदर्शन शहाबादे, महादेव मुराळ, सुरेश पाटील, रूद्राप्पा तेली, परमेश्वर काकडे, सुरेश कोरे, दिलीप खोत, नामदेव बागल, साताप्पा जाधव आदींचा समावेश होता.