|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » झोपडीधारकांचा मंत्रालयात ठिय्या

झोपडीधारकांचा मंत्रालयात ठिय्या 

ओंकार बिल्डर्सच्या विरोधात आंदोलन

शेकडो रहिवाशांना अपात्र ठरवल्याचा आरोप

मुंबई / प्रतिनिधी

मालाडच्या कुरार व्हिलेज येथील झोपडीधारकांनी गुरुवारी मंत्रालयात धडक देत त्रिमूर्तीच्या प्रांगणात ठिय्या आंदोलन केले. झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबवणाऱया ओंकार बिल्डर्सकडून होत असलेल्या अन्यायाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

कुरार व्हिलेज येथे सुरू असलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात विकासकाने शेकडो रहिवाशांना अपात्र ठरवले आहे. गेल्या चार वर्षापासून पुनर्विकासाचे काम सुरू आहे. एकूण सहापैकी तीन इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. परंतु, विकासकाने अनेकांना अपात्र म्हणून जाहीर केल्याने जवळपास 94 कुटुंब रस्त्यावर येणार आहेत.

ओंकार बिल्डर्सच्या विरोधात झोपडीधारकांनी नगरविकास विभाग आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाकडे वारंवार तक्रारी केल्या. मात्र, दोन्ही ठिकाणी खेटे मारूनही न्याय मिळत नसल्याने संतापलेल्या रहिवाशांनी आज थेट मंत्रालय गाठले.

आंदोलकांनी सुरुवातीला गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव संजयकुमार यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, सचिवांनी भेट नाकारल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेवटी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी झोपडीधारकांनी मंत्रालयाच्या तळमजल्यावरील त्रिमूर्ती प्रांगणात ठिय्या दिला. अचानक झालेल्या आंदोलनामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.