|Sunday, April 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » संशोधनाची व्याप्ती वाढवण्यासाठी समन्वयाची गरज

संशोधनाची व्याप्ती वाढवण्यासाठी समन्वयाची गरज 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

मानवाचे सारे जीवन रसायनशास्त्राने व्यापलेले आहे. या पार्श्वभूमीवर रसायनशास्त्राच्या विविध शाखांमध्ये आधुनिक संशोधन सुरू आहे. या संशोधनाची व्याप्ती वाढविण्यासाठी या सर्व शाखांमध्ये समन्वय साधण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन दक्षिण कोरियातील हॅनयांग विद्यापीठातील वरिष्ठ रसायनशास्त्रज्ञ प्रा. देऑन शॉन यांनी केले.

शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र अभिविभागाच्या वतीने ‘ऍडव्हान्सेस इन केमिकल सायन्सेस’ या विषयावरील तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाच्या वि.स. खांडेकर भाषा भवन सभागृहात झालेल्या परिषदेच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. पी. एस. पाटील यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली. याप्रसंगी शिवाजी विद्यापीठाने तैवान येथील नॅशनल तैवान सायन्स ऍन्ड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी या जगातील आघाडीच्या दोनशे विद्यापीठांत समाविष्ट असणाऱया विद्यापीठाशी शैक्षणिक सामंजस्य करार केला. तसेच मान्यवरांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले.

प्रा. शॉन म्हणाले, जागतिक स्तरावर रसायनशास्त्राच्या विविध शाखांमध्ये समन्वय निर्माण करून आधुनिक संशोधनाला प्रोत्साहन देण्याची गरज निर्माण झाली आहे. त्या दृष्टीने या आंतरराष्ट्रीय परिषदेला मोठे महत्त्व आहे. शिवाजी विद्यापीठ आणि हनयांग विद्यापीठांमध्ये झालेल्या सामंजस्य करारांतर्गत जागतिक स्तरावर उच्च दर्जाचे संशोधन करणे शक्य झाले आहे. शिवाजी विद्यापीठातील प्रा. सी. डी. लोखंडे, प्रा. एस. आर. पाटील, प्रा. विजय फुलारी, प्रा. एस. एस. कोळेकर या संशोधकांनी विविध प्रकारचे आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्प हॅनयांग विद्यापीठाच्या सहकार्याने राबवले आहेत. त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठाचे तत्कालीन विद्यार्थी व सध्या नांदेड विद्यापीठात कार्यरत असलेले डॉ. आर. एस. माने पोस्ट डॉक्टरेट करण्यासाठी हॅनयांग विद्यापीठात आले असताना त्यांनी त्या कालावधीत शंभरहून अधिक आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशित केले, हा हॅनयांग विद्यापीठाच्या इतिहासातील विक्रम आहे. आजही ते या विद्यापीठाशी संयुक्त प्रकल्पाद्वारे जोडलेले आहेत, ही अभिमानाची बाब असल्याचेही डॉ. शॉन यांनी सांगितले.

Related posts: