|Sunday, July 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » सर्व संशयित आरोपींची नार्को करा

सर्व संशयित आरोपींची नार्को करा 

कमला मिल अग्निकांडप्रकरणी विखे-पाटील यांची मागणी

राज्यपालांना लिहिले पत्र

कमला मिल आगीचे प्रकरण

मुंबई / प्रतिनिधी

कमला मिल आग प्रकरणातील सर्व संशयित आरोपींची नार्को चाचणी करण्यात यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

सर्व संशयितांची नार्को चाचणी झाली तर कमला मिलमधील अग्नितांडवाला कारणीभूत असलेले राजकीय नेते आणि अधिकारी कोण? याची वस्तुस्थिती समोर येईल. मुंबई शहरात बेकायदेशीर आणि अनधिकृत व्यवसाय कोणाच्या आशीर्वादाने आणि कोणाच्या संरक्षणाखाली सुरू आहेत तसेच महापालिकेतील भ्रष्ट अधिकाऱयांच्या टोळीची संपूर्ण माहिती उघड होऊ शकेल, असे विखे-पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.

कमला मिलमधील ‘वन अबव्ह’ आणि ‘मोजोस बिस्ट्रो’ या दोन हॉटेल्सना लागलेल्या आगीत 14 जणांचा बळी गेला. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी हे प्रकरण सुरुवातीपासून लावून धरले आहे. महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या प्रकरणात न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याची तयारी त्यांनी चालवली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात कमला मिल प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणण्यासाठी सर्व संशयितांची नार्को चाचणी करण्याचे निर्देश राज्य सरकारला द्यावेत, अशी विनंती केली आहे.

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार समोर आणायचा असेल तर ‘वन अबव्ह’ आणि ‘मोजोस बिस्ट्रो’चे सर्व संचालक, कमला मिलचे संचालक तसेच महापालिका आयुक्तांनी विभागीय चौकशीची शिफारस केलेले 10 अधिकारी आणि अटकेत असलेले अग्निशमन अधिकारी राजेंद्र पाटील यांचीही नार्को करावी, असे विखे-पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.