|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पन्नास टक्क्यांवर नगरसेवक निवडणूक रिंगणाच्या बाहेर!

पन्नास टक्क्यांवर नगरसेवक निवडणूक रिंगणाच्या बाहेर! 

सुभाष वाघमोडे / सांगली

महापालिकेच्या निवडणुकीच्या मैदानातून विद्यमान नगरसेवकांपैकी तब्बल पन्नास टक्क्यांवर नगरसेवक बाहेर जाणार आहेत. यामध्ये सर्वाधिक सांगलीतील नगरसेवकांचा समावेश असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चार जणांचा प्रभाग, न्यायालयीन लढाई आणि आरक्षण, कामे न झाल्याने नाराजी या प्रमुख कारणांचा दणका नगरसेवकांना बसणार आहे.

 महापालिकेच्या निवडणुकीसाठी जूनअखेर किंवा जुलैच्या पहिल्या आठवडय़ामध्ये मतदान होण्याची शक्यता आहे. प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतरच खऱया अर्थाने निवडणुकीमध्ये कोण उभारणार हे स्पष्ट होणार आहे. निवडणुकीला कालावधी असला तरी काँग्रेस, भाजपा आणि राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांसह इतर पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. सर्वच पक्ष या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीनिशी उतरणार असून तशी तयारी सुरू केली आहे.

केंद्र, राज्य आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दोन्ही काँग्रेसला अस्मान दाखविलेल्या आणि सर्वच निवडणुकीमध्ये मोठे यश मिळाल्याने मोठा उत्साह असलेल्या भाजपाने कोणत्याही परिस्थितीत मनपावर झेंडा फडकवायचाच या हेतूने गेल्या काही महिन्यापासून तयारी सुरू केली आहे. असे असले तरी चार वार्डाचा एक प्रभाग, आरक्षण, आणि न्यायालयीन कचाटा या प्रमुख कारणांमुळे येत्या निवडणुकीतून मनपा क्षेत्रातील 50 टक्क्यांहून अधिक विद्यमान नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 या निवडणुकीमध्ये प्रथमच चार नगरसेवकांसाठी एक प्रभाग होणार आहे. मोठा प्रभाग असलेल्या उमेदवारांना निवडणुकीत प्रचार करेपर्यंत चांगलचा घाम फुटणार आहे. 20 ते 22 हजाराचा एक प्रभाग होणार असल्याने मोठय़ा प्रभागात सर्वत्र पोहोचण्यासाठी मोठी कसरतच करावी लागणार आहे. यासाठी पैशाचीही मजबूत तयारी करावी लागणार आहे. सिंगल आणि डबल प्रभाग असते तर दहा-वीस लाखाच्या आत निवडणूक पार पडत होती. आता हा आकडा पन्नास लाखांच्या घरात जाणार आहे.  एवढे पैसे आणायचे कोठून हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पक्षांकडून एवढी मत होणार नाही, पैसे घातल्यानंतर तो निघतही नाही. या आर्थिक कारणामुळेही काही विद्यमान नगरसेवक माघार घेण्याच्या तयारीत आहेत.

 दुसरी महत्वाची अडचण म्हणजे मिरजेतील काही दिग्गज नगरसेवक न्यायालयीन लढाईच्या कचाटय़ात सापडले आहेत. त्यामुळे या नगरसेवकांना निवडणूक लढविता येत नाही. यामुळे तीन ते चार नगरसेवक रिंगणात असणार नाहीत. याशिवाय काही नगरसेवक आरक्षणामुळे आऊट होणार आहेत. आरक्षणात दहा ते पंधरा नगरसेवकांना फटका बसण्याची शक्यता आहे. आरक्षण पुरूषांऐवजी माहिला पडले तरी घरातील महिलेला उमेदवारी देण्याची मनस्थिती नसल्यानेही काही पुरूष नगरसेवक अडचणीत येण्याची शक्यता आहे.

 याशिवाय काही विद्यमान नगरसेवक प्रभागातील कामे झाले नसल्याने नाराज आहेत. काही नगरसेवक पद मिळाले नसल्याने नाराज आहेत. या कारणांमुळेही चार ते पाच नगरसेवक निवडणुकीच्या मैदानातून आऊट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एकूणच मोठय़ा प्रभागामुळे दहा ते पंधरा, आरक्षणांमुळे दहा ते पंधरा, नाराजीमुळे चार ते पाच आणि न्यायालयीन लढाईच्या कचाटय़ामुळे तीन ते चार असे 78 पैकी तब्बल 39 विद्यमान नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Related posts: