|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मिरजेत 47 लाखांच्या मांडूळासह दोघांना अटक

मिरजेत 47 लाखांच्या मांडूळासह दोघांना अटक 

प्रतिनिधी / मिरज

मांडूळ प्रजातीच्या दुर्मीळ सर्पाची तस्करी करणाऱया दोघांना शहर पोलिसांनी गजाआड केले. बाजारपेठेमध्ये या मांडूळाची किंमत सुमारे 47 लाख रुपये आहे. काळी जादू आणि महागडय़ा औषध निर्मितीसाठी या सर्पाचा वापर केला जात असल्याचे पोलीस उपाधीक्षक धीरज पाटील यांनी सांगितले. गुरूवारी रात्री आठच्या सुमारास खंडेराजुरी गावचे हद्दीत कवठेमहांकाळकडे जाणाऱया ओढय़ाजवळ सापळा लावून पोलिसांनी या दोघांना गजाआड केले. आरोपींनी खंडेराजुरी येथील विक्रम कांबळे यांच्याकडून सदरचे मांडूळ खरेदी केल्याचे स्पष्ट झाले आहे. यामागे मांडूळाची तस्करी करणारे मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता बळावली आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये हुसेन कोंडीबा तांबोळी (वय 64, रा. माधवनगर) आणि लतीफ हुसेन जमादार (वय 68, रा. संजोग कॉलनी, सांगली) या दोघांचा समावेश आहे. खंडेराजुरी येथील विक्रम कांबळे याने हा मांडूळ या दोघांना विकल्याचे पुढे आल्याने त्याच्यावरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. चीफ वाईड लाईफ वार्डन याची पूर्व परवानगी न घेता सदरचा मांडूळ प्रजातीचा दुर्मिळ सर्प जवळ बाळगून त्याची महागडे औषध तयार करण्यासाठी व काळी जादू करण्यासाठी विक्री करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांच्या विरुध्द वन्यजीव अधिनियम 1972 चे कलम 39 (3) सह कलम 51 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपाधीक्षक धीरज पाटील यांना बातमीदारांकडून माहिती मिळाल्याने त्यांनी शहर पोलीस ठाणेकडील उपनिरीक्षक बी.सी.गोसावी, हवालदार लक्ष्मण जाधव, चमनशेख, काळे, धोतरे यांना कारवाईच्या सुचना दिल्या होत्या. खंडेराजूरी गावचे हद्दीत कवठेमहांकाळ रोडवर ओढय़ाजवळ 60 ते 65 वर्षे वयाचे इसम एक जीवंत मांडूळ प्रजातीचा दुर्मीळ सर्प विकण्यासाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पुष्पकर विश्वनाथ कागलकर (रा. सिव्हील हॉस्पिटल, सांगली) आणि अशोक आप्पासाहेब लकडे (रा. सिध्दीविनायक शोरुम जवळ, मिरज) या दोघांना पंच म्हणून सोबत घेऊन घटनास्थळी सापळा लावला होता.

रात्रो आठच्या सुमारास मिळालेल्या माहिती प्रमाणे ओढय़ाच्या कडेला रस्त्यावर दोन इसम येऊन थांबले. यापैकी एका इसमाच्या हातात पिवळ्या रंगाची प्लास्टिकची पिशवी होती. मिळालेल्या माहितीनुसार दोन इसम घटनास्थळी थांबल्याने सापळा लावून बसलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱयांनी त्यांना घेरावो घालून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता, त्यांनी आपली नावे हुसेन कोंडीबा तांबोळी (रा. माधवनगर) आणि लतीफ हुसेन जमादार (रा. संजोग कॉलनी, सांगली) असे असल्याचे सांगितले. त्यांची झडती घेतली असता हुसेन तांबोळी यांच्या ताब्यात असलेल्या पिशवीत मांडूळ प्रजातीचा जीवंत सर्प मिळून आला. हा सर्प चॉकलेटी रंगाचा, चार फुट लांबीचा असून, दोन किलो, 700 ग्रॅम वजनाचा आहे. बाजारपेठेत त्याची सुमारे 47 लाख रुपये किंमत असल्याचे सांगण्यात आले. सदर इसमांनी हा सर्प खंडेराजूरी येथील विक्रम कांबळे यांच्याकडून विकत घेतला असल्याचे सांगितले.

हा मांडूळ प्रजातीचा दुर्मीळ जीवंत सर्प महागडी औषधे आणि काळ्या जादूसाठी वापरला जातो. ज्या पध्दतीने त्याचा वापर केला जातो, त्यापध्दतीने त्याची किंमत निश्चित होते. अशा सर्पाला मागणी असल्याने त्याची विक्री होते. सध्या अटक करण्यात आलेल्या आरोपींनी तो विनापरवाना कब्जात बाळगून त्याची अशाच पध्दतीच्या औषध निर्मितीसाठी किंवा काळ्या जादूसाठी विक्री करण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना अटक करण्यात आली असल्याचे उपाधीक्षक धीरज पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. या संशयित आरोपींनी अशा पध्दतीने यापूर्वीही काही सर्पाची विक्री केली आहे का? असल्यास कोणास विक्री केली? याबाबतचीही सखोल चौकशी सुरू झाली आहे, असेही ते म्हणाले.

Related posts: