|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » ग्रंथालये माणसाला सुसंस्कृत करतात : माधवी कुंटे

ग्रंथालये माणसाला सुसंस्कृत करतात : माधवी कुंटे 

ईबुक्स काळात मुद्रित पुस्तके वाचली जात नाही. ग्रंथालये कमी होत आहेत अशी ओरड केली जात आहे. जेव्हा काळ बदलतो तेव्हा त्याप्रमाणे बदलावे लागते. तरी मुद्रित माध्यमाचे अस्तित्व अबाधित आहे. मुद्रित माध्यमाशी वाचकांचा भावबंध जुळलेला असतो. तो ईबुक्समध्ये अनुभवता येत नाही. पुस्तके वाचण्यासाठी ग्रंथालयाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ग्रंथालयांचे अस्तित्व अबाधित आहे. ग्रंथालये माणसाला सुसंस्कृत करतात, विचार देतात. मानवाच्या आयुष्यात ग्रंथालयांना महत्व आहे. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची विलेपार्ले शाखा आपले अस्तित्व टिकवून आहे. यंदा या ग्रंथालयाला 50 वर्षे पूर्ण होत आहे त्यानिमित्ताने एकदिवसीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने विलेपार्ले मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या प्रमुख ज्येष्ठ लेखिका माधवी कुंटे यांच्याशी ‘दैनिक तरुण भारत संवाद’ने केलेली खास बातचीत…

  मुद्रित माध्यमाचे अस्तित्व अबाधित आहे का?

मुद्रित माध्यमाला लोकांचा प्रतिसाद जास्त मिळतो. पुस्तक वाचनाची गोडी कमी होणार नाही. अनेक अहवाल प्रकाशित झाले. त्यामध्ये मुद्रित माध्यमांना मिळणारा प्रतिसाद अधिक असल्याचे नमूद झाले आहे. पुस्तके हातात घेऊन वाचायची मजा ही वेगळी असते. ‘तरुण भारत’मध्ये सय नावाचा स्तंभ प्रसिद्ध होत होता. त्या स्तंभाला मला तळकोकणापासून गोवा, सातारा, सांगली, इचलकंरजी आदी सर्व ठिकाणाहून वाचकांचा प्रतिसाद मिळाला. सय स्तंभाचे पुढे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. त्यामुळे लोक वाचत आहेत. पुस्तकांना मागणी आहे. किंडल, मोबाईलमध्ये ईबुक्स वाचतात. पण, त्याने पुस्तक आणि वाचकांमध्ये भावनिक बंध निर्माण होत नाही. जेव्हा पुस्तक हातात घेतो तेव्हा त्याचा स्पर्श तसेच ते आपण कोठेही कसेही वाचू शकतो. अगदी स्वयंपाक करतानाही पुस्तक हातात घेता येते. मुद्रित पुस्तकाशी वाचकाचा भावबंध जुळला जातो. पडद्यावर जेव्हा तुम्ही बघता तेव्हा तुमच्या कल्पनाशक्तीचा विकास होत नाही. पण, तेच जर तुम्ही पुस्तक वाचत असाल तर कल्पनाशक्तीचा विस्तार होतो.

पुस्तकांचे डिजिटायझेशन करणे आवश्यक आहे?

पीएचडी करणारी मुले आजही मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या मध्यवर्ती शाखेत अभ्यास करण्यास जातात. तिथे दुर्मीळ ग्रंथांचा स्वतंत्र विभाग आहे. तेथे 100 वर्षे जुनी पुस्तके आहेत. अशा पुस्तकांचे डिजिटायझेशन करणे आवश्यक आहे. पण, डिजिटायझेशन प्रक्रिया महाग आहे. आमच्या छोटय़ा ग्रंथालयाला डिजिटायझेशन करणे शक्य नाही. ग्रंथ हा मौल्यवान ठेवा आहे. त्यांच्या जतनासाठी लोकांनीही पुढे येणे अपेक्षित आहे. सगळे विचार ग्रंथांमध्येच आहेत. वेगवेगळे विचार मांडीला मांडी लावून बसलेले असतात. वाचकांना पुस्तके विचार देतात. विचार करणे, पफथ:करण करणे हे वाचकांचे काम आहे. या पुस्तकांतून वाचक घडत असतो. ग्रंथांना इतिहासातही महत्व होते आणि आजही आहे. त्यामुळे ग्रंथालयांना महत्व राहणारच.

पुढच्या पिढीला वाचन संस्कृतीकडे कसे वळवावे?

आज घरामध्ये पुस्तकांचा संग्रह करून ठेवण्यासाठी जागा मिळत नाही. त्यामुळे वाचकांना ग्रंथालयाशिवाय पर्याय नाही. ग्रंथालयाचे महत्व अबाधित आहे. वाचक पुस्तकांबाबत संवेदनशील होत आहे. आजची पिढी पुस्तक वाचत नाही असे म्हटले जाते. पण, आमच्या ग्रंथालयात असे काही गफहस्थ आहेत की ज्यांच्याकडे टीव्ही नाही. त्यांच्या घरात ते आणि त्यांची पत्नी पुस्तक वाचतात. इयत्ता चौथीत असलेली मुलगी आठ दिवसात 12 पुस्तके वाचून काढते. अशाप्रकारे प्रत्येक पालकाने नवीन पिढीला पुस्तकाबद्दल गोडी आणि त्यांची संवेदनशीलता जागरूक करणे आवश्यक आहे. एक काळ असा होता की ग्रंथालय कमी होतात की काय असे वाटत होते. तरीही ग्रंथालय आज त्या परिस्थितीतून बाहेर पडून आपले अस्तित्व टिकवून आहेत. ग्रंथालयालाही उर्जितावस्था येईल. विद्युत माध्यमातील पुस्तके जशी महत्वाची तशीच मुद्रित माध्यमातील पुस्तकेही महत्वाची आहे. ते पटवून देण्यासाठी ग्रंथालयाने वाचकांसाठी वाचनाचे विविध कार्यक्रम करून त्यांना त्याबाबत संवेदनशील गरजेचे अहे.

ग्रंथालयामध्ये वाचक वर्ग किती?

ग्रंथालयाची जागा छोटी असल्याने तेथे काहीच कार्यक्रम घेता येत नाही. ग्रंथालयाचा वाचकवर्ग अडीचशे आहे. पण, त्यातील 75 वाचक हे आजीव सभासद आहे. त्यांच्याकडून आपल्याला फी घेता येत नाही.  विलेपार्ले महिला संघाचे ग्रंथालय असून मुलांसाठीही त्यांचे वेगळे ग्रंथालय आहे. लोकमान्य सेवा संघ हे त्यांचे मोठे ग्रंथ संग्रहालय आहे. असे भौगोलिक परिसरात सर्व संपन्न ग्रंथालये आहेत. तरीही मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या विलेपार्ले शाखा तग धरून आहेत.

ग्रंथालयाचा खर्च कसा भागतो?

काळानुसार बदल होत आहे. त्याप्रमाणे पगारात वाढ होते. त्या वाढीव खर्चाचे नियोजन आम्हालाच करावे लागते. ग्रंथालयाचे भाडे, तिथे काम करणाऱया लोकांचा पगार, साफसफाई, बिले आदींचा खर्च ग्रंथालय स्वतंत्र भागवते त्यासाठी मध्यवर्ती संस्था सहकार्य करत नाही. हा सर्व खर्च स्वतंत्र शाखेने चालवायचा असतो.

ग्रंथालयांसमोरील अडचणी कोणत्या?

मुख्य समस्या अशी की, ग्रंथालयांना जागा मोठी मिळत नाही. ज्या पुस्तकांना मागणी नाही. पण, त्याचा संदर्भ म्हणून उपयोग होऊ शकतो. तरीही ती पुस्तके जागेच्या अभावी कधीना कधी काढून टाकावी लागतात. त्यावेळी जीव तुटतो. लोकांना पुस्तक आणि ग्रंथालयाबाबत संवेदनशील करण्यासाठी ग्रंथालयांना कार्यक्रम करावे लागतात. ग्रंथालयात पुस्तकांसाठी मुक्तद्वार ठेवू शकत नाही. त्यांच्यासाठी वाचकांना वेगळे प्रशिक्षण द्यावे लागते. एका विभागानुसार ठेवलेले पुस्तक त्या नंबरप्रमाणे त्याच ठिकाणी ठेवले गेले नाही तर ते शोधण्यात वेळ जाईल. त्यामुळे पुस्तकाची हानी होऊ शकते म्हणून वाचकांना ग्रंथालयामध्ये पॅटलॉगुसार पुस्तक वाचण्यास उपलब्ध करून दिली जातात. विलेपार्ले ग्रंथालयात संगणकीय पुस्तकांची नोंद यादी नाही. कारण त्यासाठी लागणाऱया सॉफ्टवेअरची किंमत ग्रंथालयाला परवडणारी नाही. आपल्या ग्रंथालयाला अनुदान मिळत नाही. ते मध्यवर्ती संस्थेला मिळते.

या अडचणीतून मार्ग कसा शोधतात?

ग्रंथालयातील छताचा काही भाग पडला होता त्यावेळी ग्रंथालयाचा सदस्य बिल्डर होता त्याने ते काम कमी खर्चात करून दिले. अशी ग्रंथालयातील सदस्य ग्रंथालयासाठी स्वत:हून पुढे येऊन मदत करत असतात. रमेश प्रभू यांच्या मुलाने ग्रंथालयाच्या कार्यक्रमासाठी मोफत हॉल, खुर्ची उपलब्ध करून दिले आहे. तसेच आर्थिक मदत म्हणून रोख रक्कमही मिळते. ते बँकेत एफडी करून ठेवले जातात.  त्यातून ग्रंथालयात नवीन पुस्तके आणली जातात. पण, आता बँकांचे व्याजदर कमी  झाल्याने अपेक्षित रक्कम हाती मिळत नाही. या सर्व अडचणींना ग्रंथालयाच्या प्रमुखास सामोरे जावे लागते. समाजाला सुसंस्कृत करण्याचे काम ग्रंथालय करते. पार्ल्यात संस्कृती भरभराटीस आली आहे. त्यामध्ये ग्रंथालयाचा वाटा मोठा आहे. उद्याचा सुसंस्कृत नागरिक घडवण्यासाठी ग्रंथालय तगवून धरली पाहिजेत.

नव लेखक निर्माण करण्यासाठी काय वेगळे प्रयोग केले पाहिजे?

आज जो तो ब्लॉग, सोशल मीडियावर लिहिताना दिसतो. आपण लेखक झाल्यासारखे मिरवतो. प्रत्येकजण व्यक्त होतो ते एकप्रकारे चांगले आहे. पण, या माध्यमावर कचऱयासारखे लेखन पडलेले असते. तेच वाचले तर नक्की काय आपण वाचतो असा प्रश्न पडतो. त्यामध्ये अनेक चांगले लेखनही सापडते. मी आणि डॉ. चारुशीला यांनी 8 वर्षापूर्वी कथालेखनाचे शिबीर घेतले होते. त्यामध्ये अनेक महिलांचा सहभाग होता. त्यांना अनेक विषय देऊन लिहिते केले. त्यातून अनेक चांगल्या लेखिका सापडल्या. लेखनासाठी वाचनाशिवाय पर्याय नाही. वाचनातूनच लेखक घडतो. अभिव्यक्त होण्यासाठी चांगले शब्द मिळणे आवश्यक आहे. तर ते लेखन वाचकाला भिडते. त्यासाठी लेखनाच्या विविध प्रकारांमध्ये काय लिहिले जाते ते ठाऊक असावे लागते. वाचन आणि लेखन या समांतर चालणाऱया प्रक्रिया आहेत. कथा शिबिरातून नव लेखक घडतात.

कथा क्लबचे काम कसे चालते?

दर महिन्याला बैठक होऊन त्यामध्ये विषय दिले जात. त्या त्या विषयावर सहभागी मुली कथा लिहून आणत. कधी नाटक, सिनेमा तर स्त्रीविषयक कथा पुरुषविषयक करून लिहिणे असे प्रयोग क्लबमध्ये केले. त्यातून चारचौघींची स्वतंत्र पुस्तके निघाली. तर काहींना लेखनाची वाट सापडली.

फेसबुक, ब्लॉग माध्यमाबद्दल तुमचे मत काय?

फेसबुक आणि ब्लॉगवर काही लिखाण चांगले असते. फेसबुकवर काहीही कवितांचा भडिमार केलेला दिसतो. त्यामध्ये यमक नसते. फेसबुक आणि ब्लॉगवर काहीही व्यक्त केलेले दिसते. त्यामुळे वाचणाऱयांचा वेळ वाया जातो. वेळेच्या बचतीसाठी येथे चांगले लेखन येणे अपेक्षित आहे.