|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » तंबाखूजन्य पदार्थांसह चॉकलेट, वेफर्स विक्रीवरही बंदी

तंबाखूजन्य पदार्थांसह चॉकलेट, वेफर्स विक्रीवरही बंदी 

विजय गवळी/ कार्वे

चॉकलेटस्, वेफर्स या पदार्थांबरोबर तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय शासनाने घेतला असून याची अंमलबजावणी 4 फेब्रुवारीपासून राज्यात होणार आहे.

दुकानात नुडल्स, चॉकलेटस् तसेच चिप्ससारख्या लहान मुलांना आकर्षित करणाऱया खाद्यपदार्थांबरोबरच तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस ठेवण्याला बंदी घालण्यात येणार आहे.  यासंदर्भात राज्य शासनाने अन्न व प्रशासन विभागाला तसे आदेश नुकतेच दिले आहेत. जे खाद्यपदार्थ शालेय विद्यार्थी आणि किशोरवयीन मुलांमध्ये जास्त प्रिय आहेत, अशा खाद्यपदार्थांबरोबर तंबाखू, पान, सुपारीसारखे पदार्थ विक्रीस ठेवणे यापुढे दुकानदारांना महागात पडणार आहे. कारण किशोरवयीन मुलांमध्ये तंबाखूजन्य पदार्थ दृष्टीस पडल्याने त्यांचे आकर्षण निर्माण होते. पर्यायाने मुले अशा पदार्थांच्या आहारी जातात. हे होऊ नये व आरोग्यसंपन्न पिढी निर्माण व्हावी यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे.

कडक अंमलबजावणी होणार

याबाबत माहिती देताना औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पल्लवी दराडे यांनी सांगितले की, चॉकलेट किंवा चिप्ससारखे पदार्थ दुकानातून आणण्यासाठी गेल्यानंतर लहान मुलांना तेथे उपलब्ध असणाऱया तंबाखूजन्य पदार्थांचेही आकर्षण निर्माण होते. त्यामुळे राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे.

याचबरोबर सुगंधीत सुपारीच्या विक्रीवरही सहा महिन्यांसाठी बंदी घालण्यात आलेली आहे. या निर्णयाच्या कडक अंमलबजावणीसाठी राज्यात मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुकानामध्ये जलदरित्या विकल्या जाणाऱया खाद्यपदार्थांबरोबरच तंबाखुजन्य पदार्थांवर बंदी आणण्यासंदर्भात केंद्र शासनाने राज्याच्या मुख्य सचिवांना आदेश दिलेले होते. त्यानुसार राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे.