|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » जॅक सिक्वेरांच्या पुतळय़ाचे राजकारण

जॅक सिक्वेरांच्या पुतळय़ाचे राजकारण 

उपसभापतींचा खासगी ठरावाचा प्रस्ताव सादर

प्रतिनिधी/ पणजी

एका महत्त्वपूर्ण घडामोडीत भाजपचे कळंगूटचे आमदार व उपसभापती मायकल लोबो यांनी विधानसभा परिसरात माजी विरोधी पक्षनेते जॅक सिक्वेरा यांचा पुतळा उभारण्यात यावा, अशा आशयाचा खासगी ठराव विधानसभा सचिवाकडे सादर करून भाजपला जोरदार धक्का दिला. या प्रश्नावरून आता भाजपमधील गृहकलहाने शिखर गाठले.

गेल्याच महिन्यात भाजपने विधिमंडळ आणि पक्षाच्या गाभा समितीच्या संयुक्त बैठकीत उपसभापती मायकल लोबो यांना पक्षाच्या ध्येयधोरणाविरुद्ध जाऊ नका, असा इशारा दिला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून गोवा फॉरवर्ड नेते आणि कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी मायकल लोबो यांनी विधानसभेत ठराव मांडावा. आम्ही त्याचे समर्थन करू व सभागृहात ठराव संमत करून घेऊ, असे जाहीर केले होते. त्यातच काँग्रेसने शुक्रवारी विधिमंडळ बैठकीत जॅक सिक्वेरा यांचा विधानसभा आवारात पुतळा उभारण्यासाठी खासगी ठराव मांडण्याचा निर्णय घेतला.

मायकल लोबो यांनी मात्र भाजपच्या नेत्यांचा इशारा झुगारून लावून बुधवारी ठराव विधिमंडळ सचिवांकडे सादर केला. मायकल लोबो यांनी ठराव मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले. हा ठराव सभागृहात घ्यावा लागेल व तो सर्वानुमते संमत होईल, अशी आशा व्यक्त केली.

भाजपमध्ये गृहकलह

मायकल लोबोंच्या या निर्णयामुळे अखेर भाजपमधील गृहकलह पुन्हा एकदा उघड झाला आहे. गोवा फॉरवर्डने काँग्रेसऐवजी मायकल लोबो यांच्या ठरावाचे समर्थन करण्याचे ठरवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते चर्चिल आलेमाव यांनी देखील अशाच आशयाचा एक खासगी ठराव विधिमंडळ सचिवाकडे पाठविला आहे.

विधानसभेचे अधिवेशन महिनाभर चालणार असल्याने हा ठराव मागाहून कधीही चर्चेस येऊ शकतो. दर शुक्रवारी खासगी कामकाजाच्या दिवशी खासगी ठराव चर्चेस घेतले जातात. हा ठराव खुद्द सत्ताधारी भाजपच्या आमदारानेच आणल्याने भाजपसाठी हा विषय आता डोकेदुखी बनला आहे. भाजपच्या बंडखोर आमदाराने ठराव आणल्याने काँग्रेसदेखील आता त्यांच्या ठरावाचे समर्थन करण्याच्या विचारात आहे. तथापि पक्षाच्या दबावाखाली उपसभापती मायकल लोबो ठराव मागे घेण्याची शक्यता असल्याने काँग्रेसने सोमवारी ठरावाचा प्रस्ताव सादर करण्याचे ठरवले आहे. उपसभापतींच्या या प्रस्तावामुळे भाजपमध्ये गृहकलह वाढला आहे. यामुळे आता राज्य विधानसभेचे 19 फेब्रुवारीपासून होणारे अधिवेशन चांगलेच रंगणार अशी चिन्हे आहेत.

भाजपची अडचण

तथापि भाजपने या ठरावाच्या वेळी सभात्याग करण्याचा निर्णय घेतला व व्हिप जारी केला तर उपसभापतींना ठरावाच्या वेळी सभागृहाबाहेर जावे लागेल. उपसभापतींनी ठराव सादर करून सत्ताधारी भाजप व  आघाडी सरकारच्या डोकेदुखीत वाढ केली आहे. भाजपने आग्रह करून ठराव मागे घेण्यास भाग पाडले तरी चर्चिल आलेमाव व काँग्रेसतर्फे आलेक्स रेजिनाल्ड यांचेही  दोन ठराव असतील. तूर्तास भाजपची अडचण या प्रस्तावामुळे वाढली आहे.