|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शेतकऱयाचा 10 लाखाचा बेदाणा परस्पर विकला

शेतकऱयाचा 10 लाखाचा बेदाणा परस्पर विकला 

कुपवाड एमआयडीसीतील गौरी कोल्ड स्टोअरेजमधील प्रकार : पती, पत्नी विरोधात गुन्हा

वार्ताहर/ कुपवाड

कुपवाड एमआयडीसीलगतच्या सावळी हद्दीतील गौरी कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवलेला सोलापूर जिह्यातील शेतकऱयाचा दहा लाखांचा बेदाणा परस्पर विकून शेतकऱयाची फसवणूक केल्याचा प्रकार रविवारी उघड़कीस आला आहे.

    याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी स्टोअरेजचे मालक रमण गोवर्धन अरोरा व त्याची पत्नी संगिता अरोरा या दोघा पती, पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात शेतकरी सतीश नरसिंग जगताप यानी फिर्याद दिली आहे.

     पोलिसांच्या माहितीनुसार, सोलापूरचे शेतकरी सतीश नरसिंग जगताप (51,रा.सोहाळे, ता.मोहोळ ) यांनी 16 हजार 170 किलो इतका दहा लाख रूपये किंमतीचा बेदाणा (10 हजार 78 बॉक्स)  कुपवाड एमआयडीसीतील गौरी कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवला होता. त्यानंतर या कोल्ड स्टोअरेजचे मालक रमण अरोरा व त्याची पत्नी संगीता अरोरा या दोघांनी संगनमत करून संबंधित शेतकयाची परवानगी न घेता एप्रिल ते जून 2017 या काळात बेदाण्याची परस्पर विक्री केली. याबाबत  शेतकरी सतीश जगताप यांनी कोल्ड स्टोअरच्या मालकाकडे वेळोवेळी चौकशी केली असता मालक रमण अरोरा यांनी शेतकऱयाला वेळोवेळी बेदाणा मालाच्या दराबाबत बनावट पावत्या त्याच्या मोबाईलवर पाठविल्या. त्यामुळे शेतक-याने मालक अरोरावर विश्वास ठेवला होता. परंतु गेल्या काही दिवसापापूर्वी शेतकरी सतीश जगताप यांनी गौरी कोल्ड स्टोअरेजमध्ये जाऊन प्रत्यक्ष बेदाण्याची चौकशी व पाहणी केली असता बेदाणा कोल्ड स्टोअरेच्या मालकाने बेदाण्याची परस्पर विक्री करून फसवणूक केल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी मालक अरोरा यांच्याशी संपर्क साधून चौकशी केली तर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे शेतकऱयाने स्टोअरेजचे मालक पती पत्नी विरोधात शनिवारी रात्री कुपवाड पोलिसात फसवणुकीची तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला. मात्र, अद्याप कोणालाही अटक केली नाही. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब माने करीत आहेत.